पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेउन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्या मार्गाने चालत (किंवा हळू चालणाऱ्या वाहनातून) मुठा नदीच्या तीरावर येतात व पूजनमूर्तीचे विसर्जन करून उत्सवमूर्ती घेउन परत जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारी ही मिरवणूक जवळपास ३० तास चालू असते व दुसऱ्या दिवशी मध्यान्हापर्यंत चालते. ही मिरवणूक पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा परमोच्च बिंदू समजली जाते.[१]
इतिहास
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. मिरवणुकीचा प्रारंभ श्रीमंत भाऊ रंगारी यांनी केल्याचे मानले जाते.[२]
मार्ग
कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता अशा विविध मार्गांनी शेवटी अलका टॉकीज चौकात मिरवणूकीची सांगता होते. या, तसेच इतर मार्गांवर येणारा ताण टाळण्यासाठी २००९ सालापासून जंगली महाराज रस्ता तसेच लाल बहादूर शास्त्री रस्ता या मार्गांवर देखील मिरवणूका सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांच्या विचाराधीन आहे.
मानाचे गणपती
मिरवणूकीतील मंडळांचा क्रम दरवर्षी बदलत असला तरीही काही मंडळांचा क्रमांक ठरलेला आहे व तो काटेकोरपणे पाळला जातो. या मंडळांच्या गणपतींना मानाचे गणपती म्हणून संबोधतात. सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती असतो. या गणपतींच्या आगमनाने मिरवणूकीची सुरुवात होते. यानंतर क्रमाने तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी गणपती या मंडळांचे गणपती मिरवणूकीत येतात.[३] केसरीवाड्याच्या गणपतीनंतर इतर मंडळे आपले गणपती आधी ठरवून दिलेल्या क्रमाने मिरवणुकीत आणतात.
मिरवणुकीत संध्याकाळी अखिल मंडई मंडळ गणपती आणि रात्री उशीरा दगडूशेट हलवाई गणपतीसहभागी होतात. त्यांचे देखावे पहायला गर्दी होते.[४]
मिरवणुकीतील आकर्षण
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत मनाच्या गणपती मंडळांच्या समोर विविध पथके सहभागी होतात. नगारा वादन, शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींची बॅंड आणि घोषपथके, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आपापल्या कार्याचे फलक घेऊन सहभागी होतात. पारंपरिक पोशाखात स्त्री पुरुषआणि आबाल वृद्ध, घोड्यावर बसलेल्या युवती, दांडपट्टा ,तलवारबाजीजे खेळ करणारे युवक हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असते.ढोल ताशांची पथके हा या मिरवणुकींचा केंद्रबिंदू झाला आहे.[५]
वाहतूक व सुरक्षा व्यवस्था
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी कोणतेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते देखील पोलिसांना याकामी सहकार्य करतात. विसर्जन मिरवणूक बराच वेळ (साधारणतः ३० तास) चालत असल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेतही आवश्यक बदल केले जातात.
वादविवाद
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० वाजता मिरवणूकीतील सर्व ध्वनिवर्धक बंद करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. मात्र गणेशोत्सवात अपवाद म्हणून विसर्जनाच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी मिळते. मात्र त्यापुढे पोलिसांकडून ध्वनिवर्धक बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. मात्र यावेळी बऱ्याच मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी सहकार्य केले जात नाही आणि न्यायालयाच्याच नियमांचे उल्लंघन केले जाते.[६]
हे सुद्धा पहा
चित्रदालन
- पुण्यातील मानाचा तिसरा गणपती. गुरुजी तालीम मंडळ
- तुळशीबाग मनाचा चौथा गणपती
- पुण्यातील मानाचा पाचवा गणपती. केसरीवाडा
- गणपती विसर्जन मिरवणुकीतील झांज पथक
संदर्भ
- ^ "पुण्यात दिमाखदार मिरवणूक, मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन". लोकसत्ता.
- ^ "भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सवाचे 'जनक', तर टिळक 'प्रसारक'; मंडळाचा वादग्रस्त फलक (५. ९. २०१७)". लोकसत्ता.
- ^ "जाणून घ्या पुण्यातील मानाच्या पाच गणपतींविषयी… ( १. ९. २०१८)". लोकसत्ता.
- ^ "पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन". लोकसत्ता.
- ^ "मानाच्या मंडळांच्या दिमाखदार मिरवणुका". लोकसत्ता.
- ^ "विसर्जन मिरवणुकीत डीजेवर तूर्त बंदी". महाराष्ट्र टाइम्स. 2018-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-22 रोजी पाहिले.