Jump to content

पुणे प्राईड

पुणे प्राईड ही पुण्यात आयोजित केली जाणारी वार्षिक प्राईड परेड आहे. समलिंगी, द्विलिंगी लैंगिकता असणारे स्त्री-पुरुष, हिजडे, आणि इतर विषमलिंगी लैंगिकतेशिवाय इतर लैंगिकता असणारे आणि त्यांच्या हक्कांना पाठिंबा देणाऱ्या अनेक व्यक्ती, कार्यकर्ते आणि संघटना मिळून ही प्राईड आयोजित करतात. पुण्याची प्राईड परेड ही मुंबईमध्ये होणाऱ्या क्विअर आझादी मुंबई प्राईड मार्च नंतर महाराष्ट्रात होणारा दुसरा प्राईड मार्च आहे.

पुणे प्राईड परेडचा इतिहास

२०११

पुण्याच्या इतिहासात अशा प्रकारची प्राईड परेड ११ डिसेंबर २०११ रोजी पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. ह्या प्राईड परेडचे आयोजन समपथिक ट्रस्ट, पुणे या समलिंगी, हिजडे/तृतीयपंथी. आणि पुरुषांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या तसेच लैंगिकता हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेचे प्रमुख बिंदुमाधव खिरे यांनी केले होते.[] ही प्राईड पुणे येथे आयोजित होणारी पहिलीच प्राईड असल्याने आणि पुण्याच्या सनातनी आवेशात मिसळण्यासाठी मुद्दामच साधे कपडे घालून आणि कसल्याही प्रकारचे मुखवटे (अश्या परेडमध्ये अनेकदा सहभागी आपला चेहेरा लपवून सहभागी होतात) न परिधान करता सहभागी झाले होते. पाथफाईंडर इंटरनॅशनल, पुणेच्या संचालिका दर्शना व्यास ह्या या प्राईड परेडच्या ग्रॉंड मार्शल होत्या. ह्या पुण्याच्या पहिल्या-वहिल्या प्राईडमध्ये ८०-९० जण हजर होते.[] मुंबईच्या क्विअर आझादी मार्चमध्ये भाग घेणारे अनेकजण ह्या पुण्याचा प्राईडमध्ये सहभागी झाले होते. त्या अनेकांनी पुणे प्राईडचे वेगळेपण आणि साधेपणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. (Source: Indian Express, 8 November 2012).

२०१२

९ डिसेंबर २०१२ रोजी समपथिक ट्रस्टने पुण्याची दुसरी प्राईड परेड आयोजित केली. ह्यावेळच्या प्राईड परेडमध्ये गे समाजाबद्दल जनसामान्यांमध्ये असलेले, खास करून टीव्ही-मालिकांमध्ये दाखवले जाणाऱ्या ठोकळेबद्ध विद्रूप कल्पनांनी निर्माण केलेले आणि अाधीच प्रचलित असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याबद्दलची जाणीव ह्या प्राईडच्या निमित्ताने करण्यात आली. या प्राईड परेडचे ग्रॉंड मार्शल हमसफर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक राज आनंद हे होते.[]

२०१३

२४ नोव्हेंबर २०१३ रोजी पुण्याच्या समपथिक ट्रस्टद्वारे तिसरी प्राईड आयोजित करण्यात आली. ह्या प्राईडमध्ये जवळपास १५० च्या वर लोकांनी भाग घेतला. यावेळी समलिंगी आणि त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे मित्र, नातेवाईक, पालक यांचा सहभाग जास्त प्रमाणात होता.[] ह्या प्राईड परेडचे ग्रॉंड मार्शल मुंबई येथील उमंग ह्या गटाच्या सोनल गियानी ह्या होत्या.[] या प्राईडचे वैशिष्ट्य म्हणजे या प्राईड परेडचे स्वागत पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन केले, त्यामध्ये तेव्हाचे फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे (सध्याचे उपायुक्त, दहशतवाद विरोधी कक्षाचे) यांनी लैंगिकता हक्कांच्या चळवळीला पाठिंबा म्हणून पुढाकार घेतला होता.

२०१४

पुण्याची चौथी प्राईड परेड रविवार ९ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली.. [] या वर्षीच्या प्राईडचा उद्देश यंगिस्तान झिंदाबाद असा होता.[] ह्या वर्षीची प्राईड नव युवक/युवतींच्या लैंगिकितेच्या प्रश्नांकडे, त्यांना स्वतःची लैंगिकता स्वीकारण्यास मदत करण्यासाठी, त्यांच्या हक्कांबाबत जागरुक होण्यासाठी म्हणून समर्पित होती.[] या परेडच्या ग्रॉंड मार्शल हमसफर ट्रस्टच्या तृतीयपंथी कार्यकर्त्या सौम्या या होत्या. जास्त नव युवतींनी सहभाग घ्यावा या साठी या वर्षीपासून प्राईडचा मार्गही बदलण्यात आला. आता पर्यंतच्या प्राईड पुणे सार्वजनिक सभा, बुधवार पेठ येथून निघून शनिवार वाड्यासमोरून फिरून दगडूशेठ चौकातून परत पुणे सार्वजनिक सभेपाशी, समपथिक ट्रस्टचे कार्यालय आहे तेथे परत येत असत. पण ह्या वर्षीपासून संभाजी बागेपासून जंगली महाराज रस्त्याने सुरुवात करून गरवारे पुलावरून फिरून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने, शिरोळे रस्त्याने परत संभाजी बागेला परत असा नवा मार्ग निवडण्यात आला. पुण्यातील पेठ भागांतील पारंपारिक भागांत चालण्यापेक्षा डेक्कन भागात चालणे नवयुवकांना मोकळेपणाचे वाटेल असा अंदाज आयोजन कर्त्यांना होता.[]

२०१५

२३ ऑगस्ट २०१५ रोजी पाचवी पुणे प्राईड झाली, याचे आयोजन समपथिक ट्रस्ट पुणे यांनी केले होते.[] या वेळच्या प्राईडमध्ये दरवर्षीपेक्षा सहभागींची संख्या लक्षणीय जास्त होती, तसेच वेगवेगळ्या शहरांतून मुला-मुली आणि त्यांच्या पालक, आप्तांनी सहभाग घेतला होत. या वेळी परेडचे ग्रॉंड मार्शल म्हणून नेतृत्व उमंग एल.जी.बी. ग्रुप, मुंबई यांनी केले. दरवर्षी पेक्षा सहभागी लोकांच्या वेशभुषांमुळे, रंगित छत्र्यांमुळे यावर्षीची प्राईड बरीच रंगबिरंगीही झालेली दिसली. ३७७ च्या कायद्यामुळे आणि समाजातील कलंकाच्या भावनेने हिजडा समुदायाला जो त्रास सहन करावा लागतो, त्याविषयीची जाणिव जागुती करणे, हिजड्यांच्या हक्कांविषयी आवाज उठवणे हे या वर्षीच्या प्राईडचा उद्देश होते. मुंबईवरून प्राईडमध्ये सहभागी होणाऱ्या सहभागींसाठी मुंबईच्या हमसफर ट्रस्ट या संस्थेने मुंबई-पुणे प्रवासासाठी एका खास बसची व्यवस्था केली होती, त्यामुळे मुंबईवरून अनेक जण सहभागी झाले होते.[]

२०१६

७ ऑगस्ट २०१६ रोजी पुण्याची सहावी प्राईड परेड झाली.[]  या वर्षीचा उद्देश समलिंगी मुला-मुलींना कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव आणि छळ याविरुद्ध आवाज उठवणे हा होता.[१०] या वेळी ग्रॉंड मार्शल म्हणून परेडचे नेतृत्व समलिंगी कार्यकर्ते सौविक घोष यांनी केले. सतत पाऊस चालू असतानाही परेडमध्ये पूर्वीपेक्षा जास्त संख्येने लोक आले होते. आय.बी.एम, सिमेन्टेक आणि थॉटवर्क्स अश्या कंपन्यांनी कंपन्यांच्या नावाच्या फलकांसह त्यांच्या प्रतिनिधींना कंपनीचे टी-शर्ट्‌स घालून पाठवलेले होते. अशा प्रकारे कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती.[११]

२०१७

सातवी परेड ११ जून २०१७ला झाली, यावेळी सहभागी लोकांची संख्या लक्षणयीरीत्या वाढून ती ७०० पेक्षा जास्त झाली होती.[१२] ह्या प्राईडचे आयोजनही समपथिक ट्रस्टच्या बिंदूमाधव खिरे यांनी केले होते.[१३] या वर्षीही आय.बी.एम, ए.डी.पी, थॉटवर्क्स, सीमेनटेक,ॲक्सेन्चर, बी. एन. वाय. मेलन या कंपन्यांनी आपला खुला पाठिंबा दर्शवला होता. ह्या वर्षींच्या प्राईडचा उद्देश समलिंगी मुला-मुलींना पाठिंबा देणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या पालक, मित्रमंडळी, नातेवाईक यांना धन्यवाद देणे हा होता. म्हणून या वर्षीच्या प्राईडचे नेतृत्व भावंडे, मित्र-मैत्रिणी यांनी केले.[१४] या वर्षीच्या प्राईडवर सनातनी असल्याचेही आरोप झाले होते, अनेक सहभाग्यांनी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे अत्यंत कमी कपड्यांत सहभागी होण्यास परवानगी न दिल्यामुळे आयोजकांवरती नाराजी व्यक्त केली होती.

संदर्भ

  1. ^ "LGBT community holds rally in city". Times of India. 12 December 2011. 2012-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-20 रोजी पाहिले.
  2. ^ Kaumudi Gurjar (2011-12-12). "Pune's first LGBT pride parade low on pageantry, but outlook bright". Mid-day.com.
  3. ^ "Pune to witness 2nd queer pride parade on Dec 9". mid-day (इंग्रजी भाषेत). 2017-06-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Delhi, Bangalore & Pune hold Pride marches - Pink Pages". Pink Pages (इंग्रजी भाषेत). 2013-11-25. 2018-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Police Distribute Roses To Marchers In Pune's Third Gay Pride - Gaylaxy Magazine". www.gaylaxymag.com (इंग्रजी भाषेत). 2017-06-17 रोजी पाहिले.
  6. ^ a b c d "Times of India". 2018-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-20 रोजी पाहिले.
  7. ^ "Pune to host 5th LGBT Pride March on 23rd August - Gaylaxy Magazine". www.gaylaxymag.com (इंग्रजी भाषेत). 2017-06-17 रोजी पाहिले.
  8. ^ gaybombaywp (2015-08-19). "Gay Bombay Goes to Pune Pride". Gay Bombay. 2018-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-17 रोजी पाहिले.
  9. ^ "'Azadi' Slogans Raised at Pune's LGBTI Pride March". The Quint (इंग्रजी भाषेत). 2017-06-17 रोजी पाहिले.
  10. ^ "LGBT activists take out march against workplace discrimination in Pune". hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2016-08-07. 2017-06-17 रोजी पाहिले.
  11. ^ "Corporate sector marks its presence in Pride March in Pune". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-08-08. 2017-06-17 रोजी पाहिले.
  12. ^ "700 people rally for support from allies at Pune Pride 2017 - Times of India". The Times of India. 2017-06-17 रोजी पाहिले.
  13. ^ "Family, friends and Pune's LGBTI: The Pride Walk for 2017". hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2017-06-10. 2017-06-17 रोजी पाहिले.
  14. ^ "'Wear decent clothes': Pride goers told in India". Gay Star News (इंग्रजी भाषेत). 2017-06-14. 2017-06-17 रोजी पाहिले.[permanent dead link]