पीतकंठी चिमणी
शास्त्रीय नाव | Petronia xanthocollis Gymnoris xanthocollis, |
---|---|
कुळ | चटकाद्य (Ploceidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Yellow-throated Sparrow, Chestnut-shouldered Petronia |
संस्कृत | पीतकंठ कुलिंग |
हिंदी | जंगली चिडिया |
मातकट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या फक्त नराचा कंठ पिवळ्या रंगाचा असतो आणि पंखावर दोन पांढरे पट्टे येवढा फरक सोडला तर चिमणीसारखाच दिसणारा, साधारण १४ सें. मी. आकाराचा हा पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून बांगलादेशपर्यंत आणि श्रीलंका येथेही आढळतो. याच्या किमान दोन उपजाती आहेत एक फिकट रंगाची तर दुसरी जास्त गडद रंगाची.
पीतकंठी चिमणी रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारी आहे. हा पक्षी मनुष्य वस्तीजवळ राहणे पसंत करतो पण चिमणी इतक्या जवळ तो येत नाही. विरळ जंगलांचा भाग, पानगळीचा प्रदेश, शेतांच्या जवळ पीतकंठी चिमणी हमखास दिसून येते.
कीटक, फुलपाखरे, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य असून शेतातील उभ्या पिकात ते थव्याने येतात.
एप्रिल ते जून हा यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे गवत, पिसे आणि किरकोळ वस्तुंपासून बनविलेले, कधी झाडांच्या ढोलीत स्वतः तयार केलेले किंवा बरेचदा सुतार किंवा अन्य पक्ष्यांचे तयार घरटे असते. मादी एकावेळी ३ ते ४ हिरवट पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर-मादी पिलांची देखभाल करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.
डॉ. सलीम अली यांनी त्यांच्या लहानपणी एक पीतकंठी नर चिमणी मारल्यावर त्याचे निरिक्षण केले व हा पक्षी साध्या चिमणीपेक्षा वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांच्यातील शास्त्रज्ञ जागा झाला.