Jump to content

पीटर हेवूड

पीटर हेवूड
जन्म ६ जून १७७२ (1772-06-06)
डग्लस, आईल ऑफ मान
मृत्यू १० फेब्रुवारी, १८३१ (वय ५८)
लंडन, इंग्लंड
शिक्षण सेंट बीज शाळा, इंग्लंड, इंग्लंड
पेशा रॉयल नेव्हीमधील अधिकारी
जोडीदार फ्रांसेस जॉलिफे
अपत्ये एक मुलगी
वडील पीटर जॉन हेवूड
आई एलिझाबेथ हेवूड


पीटर हेवूड (इंग्लिश: Peter Heywood) (६ जून, इ.स. १७७२ - १० फेब्रुवारी, इ.स. १८३१) हा एक ब्रिटिश नौसेनाधिकारी[श १] होता. तो २८ एप्रिल, इ.स. १७८९च्या एच.एम.एस. बाउंटी या नौकेवर झालेल्या बंडाळीदरम्यान बोटीवर होता. त्या बंडाळीत त्याने सहभागही घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली व बंडखोर म्हणून फाशीची शिक्षा झाली होती. पण नंतर त्याला माफी देण्यात आली. तो नौसेनेवर परत रुजू झाला व २९ वर्षे तेथे नौकरी करून, तो पोस्ट-कॅप्टन या पदावर पोहोचून निवृत्त झाला.

बाउंटीवर दाखल

नौसेनेशी संबंधित आईल ऑफ मान येथील एका प्रतिष्ठित घरात त्याचा जन्म झाला. त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी एच.एम.एस. बाउंटी नौकेवर लेफ्टनंट विल्यम ब्लाय यांच्या नेतृत्वाखाली रुजू झाला. त्याला काही पद नसतांनाही एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याचे विशेषाधिकार त्याला देण्यात आले होते. बाउंटी नौका इंग्लंडवरून इ.स. १७८७ मध्ये निघाली. पॅसिफिक समुद्रातील बेटांवरील ब्रेडफ्रुट[श २] गोळा करून् इंग्लंडमध्ये आणण्याची ती मोहीम होती. ए.स. १७८८ च्या उत्तरार्धात मध्ये नौका ताहिती येथे पोहोचली. पण तेथे विल्यम ब्लाय व त्याच्याखाली कामाला असणारे अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला. या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने फ्लेचर क्रिस्टियन याच्यासोबत लेफ्टनंटचे संबंध बिघडले व नौकेच्या ५ महिन्याच्या ताहितीवरील मुक्कामात ते अधिक बिघडतच गेले.

बंडाळी

मग नंतर नौकेचा परतीचा प्रवास चालू झाला. पण लवकरच क्रिस्टियन व त्याच्या सहकारी अधिकाऱ्यांनी लेफ्टनंट ब्ल्यायला पकडले आणि नौका आपल्या नियंत्रणाखाली आणली. ब्लाय व त्याच्या १९ निष्ठावंत अधिकारी यांना एका उघड्या छोट्या बोटीत बसवून समुद्रात सोडून देण्यात आले. हेवूड इतरांसोबत बोटीवरच थांबला होता. नंतर त्याने इतर १५ जणांसोबत बाउंटी सोडली व ते ताहितीला परतले. बाउंटी आपल्या इंग्लंडकडील प्रवासावर पुढे निघाली व काही काळाने पिटकैर्न बेटावर पोहोचली. त्या छोट्या बोटीतून प्रदीर्घ व असाद्ध्य प्रवासानंतर ब्लाय इंग्लंडला पोहोचला. तिथे त्याने बंडखोरांवर खटला भरला. त्यात बंडाला चिथावणी देणाऱ्यांमध्ये हेवूडसुद्धा होता. एच.एम.एस. पॅंडोरा नौकेला त्याच्या शोधात पाठविण्यात आले व इ.स. १७९१ मध्ये त्याला व त्याच्या सोबत्यांना पकडण्यात आले. त्यांना बेड्या घालून पॅंडोरावर आणले गेले. मात्र परतीचा प्रवास मोठा कठीण ठरला. पॅंडोरा ग्रेट बॅरियर रीफवर आदळून फुटली. हेवूडसोबतचे चार कैदी बुडून मरण पावले मात्र हेवूड सुदैवाने वाचला.

फाशीची शिक्षा व माफी

हेवूडवर लष्करी न्यायालयात खटला भरला गेला व त्याला व इतर पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र हेवूडसाठी न्यायालयाने माफीची शिफारस केली. इंग्लंडचा राजा तिसऱ्या जॉर्जने त्याची माफी मंजूर केली. लवकरच त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली. अनेक वरिष्ठ नौसेनाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे त्याने परत नौसेनेत नौकरी परत चालू केली. त्याला अनेक बढत्या मिळाल्या व वयाच्या २७व्या वर्षी तो त्याच्या पहिल्या बोटीवर कॅप्टन बनला आणि वयाच्या ३१व्या वर्षी पोस्ट-कॅप्टन बनला. तो एक जलमापचित्रक[श ३] म्हणून प्रसिद्ध झाला. नौसेनेत तो इ.स. १८१६पर्यंत राहिला व नंतर निवृत्त झाला.

टीका

बाउंटीवरील बंडाळीत हेवूड खरोखरच दोषी होता की नव्हता ते अनेक परस्परविरोधी विधानांमुळे व न्यायालयात दिलेल्या खोट्या साक्षीमुळे पूर्णपणे उघडकीस नाही आले आहे. त्याच्या परिवाराचे प्रतिष्ठित समाजातील लोकांशी असणारे लागेबांधे याची त्याला नक्कीच मदत झाली. फ्लेचर क्रिस्टियनच्या परिवाराने लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, ब्लायचे चारित्र्य वाइट होते व त्याच्या अत्याचारांमुळे बंड करण्याशिवाय इतर काही पर्यायच नव्हता. या प्रयत्नांचापण हेवूडला उपयोग झाला. अनेक समकालीन व आधुनिक पत्रकारांनी व टीकाकारांनी हेवूडला दिलेली वागवणूक त्याच्या त्याच्यापेक्षा गरीब असणाऱ्या सहकाऱ्यांना मिळालेल्या वागवणुकीपेक्षा किती वेगळी होती हे मांडले आहे. त्या सर्वांकडे हेवूडइतकी संपत्ती नव्हती तसेच प्रभावशाली परिवार नव्हता. त्या सर्वाना फाशीवर चढविण्यात आले.

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ नौसेनाधिकारी (इंग्लिश: Naval Officer, नेव्हल ऑफिसर)
  2. ^ ब्रेडफ्रुट, फणसासारखे एक फळ (इंग्लिश: Breadfruit, ब्रेडफ्रुट)
  3. ^ जलमापचित्रक, बेटांचे व समुद्री मार्गांचे नकाशे बनविणारा (इंग्लिश: Hydrographer, हायड्रोग्राफर)