Jump to content

पी. बाळू

बाळू बाबाजी पालवणकर तथा पी. बाळू (१९ मार्च, इ.स. १८७६: धारवाड, कर्नाटक - ४ जुलै, इ.स. १९५५: मुंबई, महाराष्ट्र) हे मुंबईच्या हिंदू जिमखान्यातर्फे क्रिकेट खेळणारे एक फिरकी गोलंदाज होते.

पी. बाळू हे भारतातील पहिल्या काही फिरकी गोलंदाजांपैकी एक होते. विजय मर्चंट यांच्या मते नवानगरचे महाराजा असलेले फलंदाज रणजितसिंह आणि दलित चांभार कुटुंबात जन्मलेल्या गोलंदाज बाळू पालवणकर ह्यांनी भारतीय क्रिकेटला पहिल्यांदा प्रतिष्ठा मिळवून दिली.

१८७६मध्ये जन्मलेल्या बाळूला चरितार्थासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी महिना चार रुपये पगारावर तेव्हाच्या केवळ युरोपीयांसाठी राखीव पूना क्‍लबमधे क्रिकेटच्या मैदानाची निगा राखण्याची नोकरी लागली. तेथे फावल्या वेळात नेटवर गोलंदाजी करत फिरकीत पारंगत झाला. इंग्रज चमूच्या कप्‍तानाने फावल्या वेळात केलेल्या सरावादरम्यान बाळू त्याला जितक्या वेळी बाद करी त्या प्रत्येक वेळेला तो कप्‍तान त्याला आठ आणे भत्ता देत असे.[ संदर्भ हवा ]

काही काळाने पालवणकरांना हिंदू जिमखान्याच्या संघात खेळायला बोलावले गेले. त्याच्या कर्तबगारीच्या जोरावर हिंदू संघाने १९०५ मध्ये प्रथमच मुंबई इलाख्यातली स्पर्धा जिंकली. मग बाळूला आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घ्यायची संधी मिळाली. १९११ च्या अखिल भारतीय चमूच्या इंग्लंडच्या दौऱ्यात त्यांनी पहिल्या श्रेणीच्या सामन्यात सरासरी १९ धावा देत ७५ जणांना बाद करत सर्वांहून सरस कामगिरी करून दाखवली. तरीही कप्‍तान बनवायचे सोडाच, पण बाकीचे खेळाडू त्याला आपल्या पंक्तीत जेवूही द्यायचे नाहीत. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे बाळूचा सत्कार केला.[ संदर्भ हवा ]

पी. बाळू हे संघनायक झाले नाही. त्यांचा धाकटा भाऊ विठ्ठ्ल पालवणकर हा हिंदू जिमखान्याच्या संघाचा कप्‍तान झाला.[ संदर्भ हवा ]

सन्मान

  • मुंबईतील प्रभादेवी भागातल्या एका रस्त्याला पी. बाळू यांचे नाव दिले आहे.
  • आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धच्या कामगिरी बद्दल लोकमान्य टिळकांकडून जाहीर सत्कार.