पिंगलाक्षी देवी मंदिर, रिसोड
पिंगलाक्षी देवी मंदिर रिसोड
रिसोडला देवी देवतांचे महत्त्व मोठेच आहे. नवरात्राच्या कालावधीत पिंगलाक्षी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केल्यास येणारा आकडा रिसोडच्या लोकसंख्ये एवढा येईल हे नक्की. या काळात पहाट, सकाळ, दुपार व संध्याकाळी भाविकाची गर्दी लोटलेली असते. देवीच्या परिसरात असणाऱ्या सुंदर व प्रशस्त तलावावर हात पाय धुऊन दर्शन घेणे, त्या नंतर घरून डब्यात आणलेले खाणे , वडाच्या पारंब्यांना लटकणे, हुंदडणे, तलावात पोहणे, फरशीच्या पाण्यात पाय मोकळे सोडून डबा धुता धुता मासे पकडणे (हौशेखातर-विरंगुळा वगैरे म्हणून) असा उपक्रम चालतो. या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व व संबंधीत घडामोडी यथावकाश रिसोड कट्ट्यावर प्रकाशीत होतीलच.
दसऱ्याचे दिवशी तर संध्याकाळी सीमोल्लंघन करण्यासाठी अमाप जनसमुदाय लोटला असतो. दसऱ्याला पिंगलाक्षी देवीला जाऊन सीमोल्लंघन करणे म्हणजे रिसोडकरांच्या जीवनातल्या अविस्मरणीय आठवणींपैकी एक आहे. काही लोक ज्यांचे कडे स्वयंचलित वाहने आहेत भरच्या आसरा मातेला (रिसोड-भर अंतर ६ किमी)सुद्धा जाऊन सीमोल्लंघन करतात. हा अनुभव सुद्धा खूप सुखद आहे. संध्याकाळच्या वेळी भरहून परत येताना मनाला वाटणारी अनामिक हुरहुर खूप हवीहवीशी वाटते.
ता.क.-सध्या समाजातील काही स्वयंसेवकांचे पुढाकाराने पिंगलाक्षी देवीच्या प्रांगणात विश्वशांती साठी महाजप व हवन सुरू आहे. निश्चित केलेली जपाची संख्या पूर्ण करण्यासाठी हे कार्य सतत वर्ष भर करावे लागणार आहे. त्यापैकी ३/४ कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांना शुभेच्छा!