पारोळा तालुका
?पारोळा (झांशीच्या नेवाळकरांची जहागीर) | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जळगाव |
तालुका/के | पारोळा |
पारोळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
पारोळा येथे एन्.ई.एस. हायस्कूल आहे. येथे पोलीस स्टेशन आहे. पारोळा येथे झाशीच्या नेवाळकरांचा किल्ला आहे. झांशीचे राजघराणे नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. कोकणस्थ तांबे हे कालांतराने येथे स्थायिक झाले म्हणून ह्या गावाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असल्याचे सांगितले जाते. तसेच राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव नेवाळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ साली ह्याच गावात झाला. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते.
शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजाचा सुंदर असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे सुंदर गाव आहे. या गावात गणपतीचे पुरातन मंदिर आहे. त्याचे आता बांधकाम सुरू आहे. पारोळा अतिशय सुंदर शहर आहे. पारोळा आता शैक्षणिक केंद्र झाले आहे. पुरातन बालाजी मंदिर आता बांधले जात आहे.
त्या गावाचे नाव शिरोळे आडनाव असणाऱ्या लोकांनी गावाचे नाव पारोळे ठेवले. नंतर काही दिवसात ते नाव पारोळा झाले. "शिरोळे ते पारोळे" असे शिरोळे कराचे ब्रीद वाक्य आहे.
ऐतिहासिक वारसा
झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव गंगाधरराव नेवाळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ साली इथेच झाला. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते.
पारोळा किल्ला
पारोळ्याचा भुईकोट किल्ला व राणी लक्ष्मीबाईंची जहागीर
जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा तालुका आहे. पारोळा हे गाव तेथील भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पारोळा हे तालुक्याचे ठिकाण जळगाव, धुळे, मालेगाव, अमळनेर, एरंडोल, भडगाव आदी गावांशी गाडीमार्गाने जोडले गेलेले आहे. हा किल्ला हरी सदाशिव दामोदर यांनी सन १७२७ मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी या भुईकोट किल्याची बांधणी केली होती.
"माझी झांशी नाही देणार" हा बाणेदार उदगार काढणारी मर्दानी झाशींची राणी उर्फ मनकर्णिका तांबे ह्यांचे पारोळा ही जहागीर. याच गावात खंदकांनी वेढलेला बळकट भुईकोट आज काहीश्या पडीक अवस्थेत उभा आहे. याच भुईकोटाची या धाग्यात माहिती घेणार आहोत. केळी, सोन्याच्या पेठा आणि चित्रपटांच्या वितरणाचे केंद्र अश्या विविध कारणासाठी प्रखात्य असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातून धुळे-नागपुर महामार्ग जातो. याच महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी पारोळे गाव वसलेले आहे. पूर्वी या गावातील रस्त्यावर अधूनमधून पिंपळाचे अनेक ' पार ' ओळीने बांधलेले दिसायचे. त्यामुळे या गावाची ओळख पारांच्या ओळी म्हणजेच 'पारोळी' म्हणून झाली. नंतर अपभ्रंशाने पारोळीचे ' पारोळे ' नाव पडले.
पारोळा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. पारोळा किल्ला जळगाव जिल्ह्यातील दगडी बांधकामाचा सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे.याच किल्ल्याजवळ बोरी नदीवर बांधलेले सुंदर धरण आहे. अठराव्या शतकात म्हणजे पेशवाईत उभारलेल्या या भुईकोटाचा इतिहास मोठा दैदिप्यमान आहे. पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ.स.१७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर नेवाळकर (राणी लक्ष्मीबाई यांचे आजे सासरे) यांनी बांधल्याची नोंद आहे. या गावाची उभारणी किल्ला बांधणीच्या वेळी सुमारे २९० वर्षांपूर्वी झाली असावी. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत उर्जीतावस्थेला आणले. किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला व हिंदवी स्वराज्य लयास गेले. संपुर्ण भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा वेळी इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचा प्रयत्न झाला. याचा ठपका लालाभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे इ.स.१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरून इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. राणीचे कुटुंब म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले व १८६० मध्ये जहागीरी खालसा केली. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिली. शिवाय किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही आढळतात. राणी लक्ष्मीबाई माहेरचे वंशज म्हणजे कोकणस्थ तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. म्हणून गावाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणतात.
पुर्वी गावाला चारही बाजूंनी तटबंदी असुन तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील पूर्वेकडील दरवाजास दिल्ली दरवाजा तर अन्य दरवाजांना धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी नावे होती. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गावाजवळ येताच मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे दर्शन घडते. १७व्या शतकाच्या सुरुवातीस पारोळा भुईकोट बांधण्यात आला. पारोळा बसस्थानकाहुन काही अंतरावर असल्याने किल्ल्यापर्यंत पायी जाता येते. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार असुन किल्ल्याला चारही बाजूला तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला २० फुटी खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव आहे. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगरी सोडल्या जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नसे.
सध्या या खंदक व तलावाच्या काठावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही पण आतील बाजूने पाहिल्यास मात्र पाण्यात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो.
या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे आतील अवशेष सुस्थितीत आहे
पण किल्ल्याची देखरेख नसल्याने किल्ल्यात अस्वछता आहे. काही स्थानिक आजही किल्ल्याचा शौचालय म्हणुन वापर करतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणाऱ्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.
गडाच्या नव्याने बसवलेल्या उत्तराभिमुख दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. किल्ल्याच्या खंदकावरून जाणाऱ्या या प्रवेशद्वारासमोर पूर्वी उचलता येणारा लाकडी पूल होता असे सांगितले जाते.
आत आल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यासाठी देवड्या दिसतात तर समोर २० फूट उंच तटबंदी दिसते.
या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या असुन वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. हे गडाचे रणमंडळ असुन गडाच्या मुख्य दरवाजावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी ही रचना आहे
सपाट भुभागावर बांधलेल्या चौकोनी आकाराच्या या भुईकोट किल्ल्याची लांबीरुंदी ४८० x ४५० फूट असुन किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत अकरा बुरुज आहेत.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच गडाच्या मध्यभागी बालेकिल्ला दिसून येतो.
इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे. बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २० फूटी भव्य बुरुज असुन या बुरुजांच्या मध्ये एक ३० फूटी चौकानी बुरुज व त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात.
या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी.डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी व तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या कमानींजवळ वरील बाजुस षटकोनी तर आतील बाजुस चौकोनी आकार असणारी विहीर आहे. कमानी पाहुन पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी एकमेव जिना आहे. या जिन्याने वर चढुन संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते पण उतरण्यासाठी पुन्हा येथेच यावे लागते. गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी असुन तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. आहे.
पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाच्या खाली आतील बाजुला दारुकोठार आहे. तटबंदीवरून पूर्ण किल्ल्याचे चोहोबाजूंनी दर्शन घेता येते. किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाची कामे निधीअभावी अर्धवट आहेत. पूर्वेकडील या तटबंदीच्या बाहेरील बाजूस तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी तटबंदीत दोन ठिकाणी दरवाजे आहेत. असेच दरवाजे तलावाच्या विरुद्ध बाजूस दिसून येतात.
या तटबंदी समोर जमिनीच्या खालील पातळीत महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे एक भुयार असून ते ८ कि.मी.वरील नागेश्वर मंदीरात उघडते अशी समजूत आहे. गडावर अजुन दोन ठिकाणी या भुयाराचा मागोवा दिसतो. एक म्हणजे दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुस व बालेकिल्ल्याच्या चौकोनी बुरुजाच्या पुढे. या ठिकाणी बारकाईने पाहिल्यास या भुयाराचा आतील भाग खुप मोठा दिसतो यावरून हे भुयार नसुन तळघर असावे असे वाटते.
किल्ल्याच्या दक्षिणेला कोपऱ्यात हमामखान्याचे अवशेष असुन या तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेऱ्या असाव्यात. या कचेऱ्याच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते त्याचे अवशेष पहायला मिळतात. त्याकाळात या कोनाड्यात दिवे लावून हा महाल उजळला जात असेल. महादेव मंदिराच्या पुढे जहागीरदार यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत.
बालेकिल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी जे पुर्वाभिमुख महाद्वार आहे, त्याचा मुळ दरवाजा नष्ट झाला आहे, त्यामुळे नवीन लोखंडी महाद्वार बसवले आहे.
येथेच पूर्वेला बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असुन पश्चिमेला लहान दरवाजा आहे.
बालेकिल्ल्याच्या एका मोठया बुरुजाचा आतील भाग झाडामुळे ढासळून गेला असून बुरुजाच्या बाहेरील भाग शिल्लक आहे. किल्ल्यात एकूण दहा विहिरी असुन मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर चार उजव्या बाजुला तर एक डाव्या बाजुला असुन चौकोनी बुरुजाच्या समोर एक, तर दोन दक्षिणेकडे तटबंदीजवळ व दोन विहीर बालेकिल्ल्यात आहे. बालेकिल्ल्यात असलेल्या विहीरीतील पाणी हौदात ओतून ते हमामखान्यापर्यंत खेळवण्यात आले होते ते चर आजही पहायला मिळतात. याशिवाय बालेकिल्ल्यात पाण्याचा अजुन एक हौद दिसून येतो. पाण्याबाबत हा किल्ला संपन्न असल्याचे दिसून येते पारोळ्यामधील भुईकोट किल्ला उत्तम बांधणीचा आहे. जळगाव जिल्ह्यात एवढ्या चांगल्या बांधणीचा दुसरा भुईकोट किल्ला नाही. पारोळा किल्ला साधारण १६० मी. लांबीला असून रुंदीला १३० मी. एवढा आहे. याची तटबंदी खणखणीत बांधणीची असून भोवताली रुंद असा खंदक आहे.
किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी केलेली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून ८ कि. मी दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगतात. या भुयारातून घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे ते भुयार असल्याची समजूत आहे.
बाहेरच्या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या (छिद्रे) केलेल्या आहेत. तटबंदीवरून बाहेरील खंदक पहाता येतो. खंदक काही ठिकाणी जास्त रुंद आहे. त्यात पाणीही भरलेले असते. किल्ल्याभोवतालीच गावाची वस्ती आहे. या वस्तीच्या रेट्यामुळे किल्ल्याचे देखणेपण नाहीसे झाले आहे. गावची बाजारपेठ ही किल्ल्याला लागून आहे. दरवाजा जवळील खंदकामधे काही टन प्लॅस्टीकचा कचरा तरंगताना दिसतो.
हा देखणा भुईकोट किल्ला झाशीच्या राणीने बांधला अशी अनेक स्थानिकांची समजूत आहे. वास्तविक हा किल्ला राणी लक्ष्मीबाई यांच्या सासरच्या पुर्वजांनी बांधला. राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव तांबे होते. ते मुळ कोकणातले पण कालांतराने ते पारोळ्यात आले म्हणून गावाला राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास लाभला. तांबे यांचे वंशज अजून पारोळ्यात वस्ती करून असल्याचे सांगतात.
पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ. स. १७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी बांधल्याची नोंद आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र दामोदरराव यांचा जन्म इथेच झाला.