Jump to content

पानिपतची पहिली लढाई

पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.

बाबराने प्रचंड तयारी करून भारतावर आक्रमण केले. बाबराने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदीचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबराचा उत्साह प्रचंड वाढ़ला. बाबराने दिल्ली जिंकून घेण्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला ‌‍‌ दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला. इतिहासकार श्रीवास्तवांच्या मते बाबर जवळ २५ हजाराचे तर इब्राहिम लोदी जवळ ४० हजाराचे सैन्य होते. २१ एप्रिल १५२६ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. .हे युद्ध सकाळी ९ वाजता सुरू झाले व दुपारी तीन वाजता संपले. बाबरने स्वतःच सैन्य रचना केली. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता. बाबरने राखीव फौज ठेवली होती.

इब्राहिम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. झालेल्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पूर्ण पराभव करून त्याला युद्धात १५,००० सैन्यासह ठार मारले. जेव्हा इब्राहिम लोदीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सैनिक पळू लागले. त्यांचा पाठलाग करत बाबराने दिल्ली गाठली. या युद्धात इब्राहिमला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही मारला गेला.