पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान (पुस्तक)
कोणत्याही भाषेतील ज्ञानकोशात (भाषाविज्ञानविषयक नोंदीमध्ये किंवा विशेषतः भाषाविज्ञानाच्या ज्ञानकोशात) पाणिनी आणि संस्कृत व्याकरण परंपरेचा अत्यंत गौरवपूर्ण संदर्भ दिसून येतो. उदा. The Routledge Linguistics Encyclopediaच्या प्रास्ताविकातील नोंद – “ The need to improve language pedagogy was one motivation for the reorientation of linguistic studies in Europe in the early nineteenth century, but so too was the renewal of contact with other traditions, most importantly that of the Sanskrit scolars whose objectivity and sharpness of focus on the linguistic (rather than literary) aspects of the subject seemed to accord with contemporary intellectual trends influenced by the methods and procedures of the natural sciences.”
किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या “Indian Language Traditions and their Influence on Modern Linguistics” या लेखात Laura Craggs यांनी केलेली नोंद अशी आहे, “ Motivated by the to preserve the ritual properties of their sacred texts, phoneticians provided accurate descriptions of the sounds of Sanskrit, while grammarians such as Panini created systematic grammars for the language (Bhargava P.M. & Chakrabarti,C. 1989. ‘Of India, Indians and Science’ in Daedalus Vol. 118 no.4, pp 145). Only in recent times – and as a direct result of the West’s discovery of Sanskrit and its grammarians – has a modern science of linguistics emerged with the capabilities to rival this ancient system.”
अशा संदर्भांमुळे संस्कृत व्याकरण – परंपरेविषयी जिज्ञासा जागी होते. या दृष्टीने मराठीत फारच कमी पुस्तके आहेत. त्यापैकी एक मौलिक पुस्तक आहे, वा. बा. भागवत यांचे ‘पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान’. त्या पुस्तकाचा हा परिचय आहे.
ग. ना. जोशी, दे. द. वाडेकर व सुरेंद्र बारलिंगे अशा तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ व जाणत्या प्राध्यापकांनी वामनशास्त्री भागवतांकडून सदर पुस्तक लिहवून घेतले. मराठीतून संस्कृत व्याकरणाची परंपरा समजून घेण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व अनन्य म्हणावे लागेल.
प्रकरणे
यामधील पहिले प्रकरण ‘उगम’ हे आहे. या प्रकरणात इन्द्र या तथाकथित पहिल्या व्याकरणकाराने वर्ण व पदे या दोन वाक्य - घटकांचा प्राथमिक विचार केला. तसेच त्यामध्ये सायणाचार्यांच्या विवेचनावरून वाक्यातील पदे, व पदांचे नाम, क्रियापद, उपसर्ग, अव्यय असे वर्गीकरण इंद्राने केले, असे नमूद आहे. वाक्याची घटक पदे व पदांचे घटक वर्ण यांच्या विचारातून पुढे व्याकरणशास्त्राच्या शिक्षा (वर्णविचार), निरुक्त (व्युत्पत्ती) आणि व्याकरण अशा तीन शाखा, परस्परपूरक पण स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून वाढीस लागल्या.
“पदे म्हणजे सुबन्त व तिङ्न्त व त्यावर आधारलेले समास, तद्धित-साधित-प्रातिपादिके इत्यादी विषय मुख्यत्वेकरून व्याकरण शास्त्राकडे राहिले व इतर दोन विषय वर्णविचार व व्युत्पत्ती हे अनुक्रमे शिक्षा आणि निरुक्त यांचेकडे गेले. तथापि हे विषय-वर्गीकरण म्हणजे वायुबंद डब्यासारखे पक्के नाही. त्यामुळे एकमेकांचे विषय जरुरीनुसार कमी अधिक प्रमाणात त्यांनी हाताळले आहेत.” असेही भागवत नमूद करतात.
मुण्डकोपनिषदात शिक्षा, निरुक्त व व्याकरण ह्यांचा ‘अपरा विद्या’ म्हणून उल्लेख आहे, असेही या प्रकरणात नमूद आहे. अर्थात् या सगळ्यामागे वेदांच्या अभ्यासाचे कारण होते.
त्यामुळे व्याकरणशास्त्र ते व्याकरणदर्शन या दुसऱ्या प्रकरणात तर स्पष्ट म्हटलेले आहे की, ‘पद, वाक्य, प्रमाण व प्रमेयशास्त्र या चार प्रकारच्या शास्त्रांच्या मालिकेत पदशास्त्र म्हणजे व्याकरणशास्त्र हा पाया आहे व प्रमेय म्हणजे वेदान्तशास्त्र हा कळस आहे.’
भाषेवर कोणाचाच खास हक्क अगर वहिवाट नसते. ती सूर्यचंद्रादींच्या प्रमाणेच दैवी कृपा आहे, अशा स्वरूपाच्या तत्कालीन चर्चेत व्याकरणाला दोन कान असल्याचे रूपक आहे. ‘दोन डोळ्यांनी जशी कोणतीही वस्तू एकच दिसते, दोन वेगळ्या वस्तु दिसत नाहीत, तसेच माणसांच्या कानांचेही आहे. व्याकरणशास्त्राला मात्र एका कानाने ऐकू येणाऱ्या शब्दापेक्षा दुसऱ्या कानाने कळून येणारा शब्द अगदी वेगळा असतो, असे व्याकरणाच्या दोन कानांचे आगळेपण आहे. एका कानाने त्याला शब्दांचे बाह्य स्वरूप म्हणजे शरीर कळते तर दुसऱ्या कानाने शब्दांचे अंतरंग म्हणजेच आत्मा कळतो.’ या प्रकरणात शब्दप्रक्रिया, अर्थप्रक्रिया या संदर्भातील चर्चा आहे.
‘शब्दस्वरूप’ या तिसऱ्या प्रकरणात लक्षणांचे प्रकार, भाषा व शब्द, लिपीरूप शब्द, लिपी शब्द नव्हे, वेद-निरुक्त-पाणिनी, वार्तिककार यांचे मौन, महाभाष्यातील दोन लक्षणे, महाभाष्य लक्षणातील विसंगती, विसंगतीचा परिहार, शब्दनित्यत्व वार्तिकमत , त्यावरील आक्षेप, प्रतिपदपाठ, शब्दरूपांचा अनियमितपणा, वैयाकरण व नैयायिक संघर्ष, शब्दनित्यत्वावर आक्षेप, आक्षेपांचे निरसन, रेखागवयन्याय, सिद्ध म्हणजे नित्य, ‘शब्द नित्य’ ह्याबद्दल उपपत्ती, भर्तृहरीचे मत, स्फोटवादावर आक्षेप, कैपटोपाध्याय मत, नागोजीभट्टांचे समर्थन, प्रतिबंदी, प्रत्यभिज्ञा, शब्दस्वरूपासंबंधी सिद्धांत अशा शीर्षकान्वये केलेली चर्चा आहे. या प्रकरणात स्फोट या संकल्पनेची सुरू झालेली चर्चा पुढील प्रकरणात अधिक आहे.
‘शब्द, वाणी व स्फोट’ या प्रकरणात सूक्ष्मतम, सूक्ष्मतर, सूक्ष्म व व्यक्त अशा चार प्रकारच्या वाणींना अनुक्रमे परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी अशा असलेल्या संज्ञांचे स्वरूप, व्याकरणशास्त्राचा खास विषय म्हणून स्फोट संकल्पनेची चर्चा व स्फोटाचे प्रकार यांची चर्चा आहे.‘प्रमाण’ या प्रकरणात महाभाष्याचे कैयटकृत विवरण, त्यावरील आक्षेप, आक्षेप निरसन असे मुद्दे आहेत. येथेही स्फोट या संकल्पनेची मीमांसा आहे.
‘शब्दार्थ’ या प्रकरणात संशय व प्रयोजन, अधिकरण या संकल्पनांची चर्चा आहे. अधिकरणाची विषय, संशय, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष व सिद्धांत ही अंगे असतात हे नमूद करून त्या आधारे शब्दार्थस्वरूप या विषयाची चिकित्सा केली आहे. त्यानंतर बौद्ध अर्थ, शब्दार्थ ही जाती का व्यक्ती, भाषाज्ञानाची प्रक्रिया या मुद्द्यांची चर्चा आहे.
‘संबंध’ या प्रकरणात शब्द व अर्थ यांच्या संबंधांची चर्चा आहे. या संदर्भात नैयायिक , मीमांसक, वैयाकरण यांची मते विशद केली आहेत. समारोप करताना अर्थाची (व्यावहारिक वस्तूची) व शब्दाची कार्यकारिता, परिणाम यांच्या या चर्चेत पाणी व अग्नी यांचे उदाहरण आहे. ‘ पाण्याने तहान भागेल, दुसऱ्या वस्तूत ओलेपणा येईल. ते कार्य अग्नीने शक्य नाही. तसे पाणी व अग्नी ह्या शब्दांचे नाही. कोणी पाणी हा शब्द दाहक वस्तू ह्या अर्थी वापरायचे ठरविले व त्या वापराला लोकांची मान्यताही मिळाली तर त्यात काहीच बाधा येणार नाही. खुशाल ‘पाण्याने सारे रान जळून गेले,’ असे म्हणावे.
अर्थात शब्दाची कार्यकारिता त्याच्या स्वरूपावर, लिंगावर किंवा शब्दसिद्धीच्या प्रक्रियेवर अवलंबून नाही. तर ती कार्यकारिता म्हणजे म्हणजेच बोधकता, ही केवळ वापर व सामाजिक मान्यतेवर अवलंबून असते, हा समारोप आधुनिक भाषाविज्ञानातील भाषेबाबतच्या ‘सामाजिक संस्था’, ‘यादृच्छिकता’ अशा संकल्पनांची प्राचीन जाणकारी स्पष्ट करतो.
‘संगम’ या अखेरच्या प्रकरणात ‘व्याकरणशास्त्रातील तत्त्वविचारामध्ये, वैदिककवींचा शब्दसृष्टीवाद, वार्तिककार महाभाष्यकारांचा शब्दनित्यवाद, भर्तृहरीचा शब्दाद्वैतवाद, बौद्ध अर्थवाद, तादात्म्यसंबंधवाद व ह्या सर्वांचा व त्यावरील अन्य शास्त्रकारांनी घेतलेल्या आक्षेपांचा परामर्श घेऊन नागोजीभट्टांनी मांडलेला समन्वयवाद इतक्या वादांचा म्हणजे विचारधारांचा सुंदर संगम झालेला आहे.’ असा समारोप आहे.
यातील चर्चेच्या ओघात आलेल्या रूपके, कहाण्या, दृष्टांत यामुळे रुक्ष विषय सहज आकलनाचा होऊ शकतो. तसेच पाणिनीची अष्टाध्यायी मुळातून वाचावी, असे वाटत राहते. पण ती मराठीत नसल्याची खंतही वाटते.
पुस्तकाचे नाव - पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान (ले.) पंडित व्याकरणरत्न वामनशास्त्री बा. भागवत, (प्रका.) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई-३२, (१ली आ.) १९८५.
वा. बा. भागवतांच्या पुस्तकातील एक कहाणी
दिशास समर्पित● म्हणजेपर्यायानंमाझंमलाचसमर्पितअसंहोतंयखरंपणत्यालाइलाजनाही
(अर्पणपत्रिका, ‘वैखरी : भाषा व भाषाव्यवहार’- अशोक केळकर)
वरील अर्पणपत्रिकेतील वाक्य सलग एकच शीर्षरेषा देऊन (एका शब्दाप्रमाणे) लिहिले आहे. व्यासंगी व्रतस्थ भाषातज्ज्ञ केवळ चूष वा वैचित्र्य यासाठी असे काही करणार नाही, असा विश्वास होता. त्यामुळे मग आठवली, वा. बा. भागवतांच्या पुस्तकातील एक कहाणी. “ फार प्राचीन काळी अखंड, अविभक्त, अव्यक्त अशी भाषा बोलत असत. ती भाषा बोलणारे देव इन्द्राला म्हणाले,“ही आमची भाषा अलग-विभक्त कर.” इन्द्र म्हणाला, “त्या बदल्यांत माझे एक मागणे आहे. मला व वायूला सोमरस एकाच वेळी द्या.” म्हणून इन्द्र व वायू यांना सोमरस एकाच वेळी दिला जातो. इन्द्राने देवांच्या वाणीला विभक्त केली म्हणून ही भाषा विभक्त अशी बोलली जाते.” ‘त्या’ देवांपुढील अखंड, अविभक्त भाषा वरीलप्रमाणे होती, हे त्यापुढील सायणाचार्यांचे मत वाचून कळले. पण इन्द्र या तथाकथित पहिल्या व्याकरणकाराविषयीची ही कथा गमतीची वाटली. सहपानासाठी वायूला घेऊन सोमरस पिऊन (꞊ प्रयोगाच्या धुंदीत?) इन्द्राने तत्कालीन रूढ भाषेची व्यवस्था शब्दबद्ध केली. वैखरी या स्तरावरील (भाषेच्या उच्चारण स्तरावरील) वायूच्या (श्वासाच्या) नियमनाचे (नियंत्रणाचे) निर्णायक महत्त्व; तसेच बीजगणिताच्या आवडीतून ज्यांनी अधिक अवघड गणिताचा ध्यास अनुभवला असेल, अशांना (सोमरसाचा, पर्यायाने) धुंदीचा अर्थही सहजच कळू शकतो. तर असो.