Jump to content

पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत

ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत

अनुक्रमणिका

२० उद्दिष्टे

२.१ प्रास्ताविक

२.२ विषय विवेचन

२.२.१ पहिला सिद्धांत ग्रंथ उपयोगासाठी असतात. २.२.२ दुसरा सिद्धांत प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ २.२.३ तिसरा सिद्धांत प्रत्येक ग्रंथासाठी वाचक २.२.४ चौथा सिद्धांत वाचकाचा वेळ वाचवा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा २.२.५ पाचवा सिद्धांत ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे २.२.६ पंचसूत्रीचे विस्तृत संदर्भात आकलन

२.३ स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे

२.४ सारांश

२.५ अधिक वाचनासाठी पुस्तके पाच

२.० उद्दिष्टे

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांनी घालून दिलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत (फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स) म्हणजे ग्रंथालयाच्या प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाचे व सदैव मार्गदर्शक ठरणारे असे पाच मूलभूत सिद्धांत आहेत. केवळ ग्रंथालयाचे कामकाज करतानाच नव्हे तर प्रलेखन (डॉक्युमेंटेशन) तसेच माहिती वितरणाच्या इतर प्रगत क्षेत्रांतही या पाच सिद्धांतांचा उपयोग नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक होतो. ग्रंथालयशास्त्राचे सारच जणू या पाच सिद्धांतांमध्ये सूत्ररूपाने थोडक्यात सांगण्यात आले आहे.

या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हांला ★ ग्रंथालय, माहितीकेंद्र किंवा प्रलेखन केंद्र यांमधील प्रत्येक कृतीला कार्यपद्धतीला या पंचसूत्रीचा कसा तात्त्विक आधार आहे हे सांगता येईल. ★ या क्षेत्रातील कोणतेही नवे संशोधन, नवीन प्रगतिपर सुधारणादेखील या पाच सिद्धांतांपैकी एखाद्या किंवा अधिक सूत्रांमध्ये किती चपखलपणे व सुसंगतरित्या बसते, हे स्पष्ट करता येईल.

२.१ प्रास्ताविक

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक असा ज्यांचा सार्थ लौकिक आहे त्या डॉ. शि. रा. रंगनाथन यांनी सर्वप्रथम सन १९२८ मध्ये ग्रंथालयशास्त्राचे सुप्रसिद्ध पाच सिद्धांत किंवा पंचसूत्री प्रतिपादन केली. त्या वेळी ते मद्रास विद्यापीठाचे प्रमुख ग्रंथपाल होते. १९२८ सालच्या डिसेंबर महिन्यात त्या वेळच्या मद्रास राज्यातील चिंदबरम येथे झालेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेत त्यांनी आपले हे विचार मांडले. पुढे हेच विचार ग्रंथालयशास्त्रात सुप्रतिष्ठित झाले. त्यांना मोठी मान्यता मिळाली. ग्रंथालय व माहितीशास्त्रकोणासाठी आहे, ते कशा प्रकारे कार्य करते, त्याचे एकूण तत्त्वज्ञान काय, इत्यादी प्रश्नांचे अत्यंत मोजक्या शब्दांत व सूत्ररूपाने दिग्दर्शन या पाच सिद्धांतांमध्ये आपणास मिळते, म्हणूनच हे पाच सिद्धांत रंगनाथन यांची पंचसूत्री म्हणून प्रसिद्ध आहेत.

डॉ. रंगनाथन हे १९२४ मध्ये ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले होते. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लायब्ररीयनशिपमध्ये त्यांनी ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडमधील अनेक ग्रंथालयांना भेटी देऊन त्यांनी तेथील कामकाज पद्धतींचे निरीक्षण केले. क्रॉयडन येथील ग्रंथालयात त्यांनी काही काळ प्रत्यक्ष काम केले. हे सर्व करीत असताना त्यांच्या संशोधक मनात असा विचार येई की, ग्रंथालयातील या सान्या कामकाज प्रक्रियेला निश्चित अशा काही सूत्रांमध्ये शब्दांकित करता येईल काय? अशी सूत्रे किंवा सिद्धांत हे सर्वसमावेशक असले पाहिजेत, त्यायोगे ग्रंथालयीन सेवांची व कार्यपद्धतींची सुसंगत, तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. या सिद्धांतांच्या प्रकाशात ग्रंथालयीन सेवा सार्वत्रिक रितीने व कार्यक्षमपणे सर्वांना उपलब्ध करून देता आली पाहिजे. या विचारचक्रातूनच डॉ.

रंगनाथन यांना पाच सिद्धांतांची प्रेरणा मिळाली. त्यांचे हे पाच सिद्धांत किंवा पंचसूत्री पुढीलप्रमाणे आहे: (१) ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात. (Books are for use.) (२) प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे. (Every Reader his/her book.) (३) प्रत्येक ग्रंथासाठी वाचक आहे. (Every Book its Reader) (४) बाचकाचा वेळ वाचवा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा. (Save the time of the Reader Save the time of library staff.) (५) ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. (Library is a growing Organism.)

ग्रंथालयातील प्रत्येक कृतीचा अंतर्भाव वरीलपैकी एका किंवा सर्व सिद्धांतांमध्ये अवश्य झालेला आपणांस दिसेल. त्याचप्रमाणे या सिद्धांतांमध्ये जे सांगण्यात आले आहे, त्या व्यतिरिक्त ग्रंथालयीन व्यवहारात काही असू शकते का, हेही आपणांस तपासून पाहता येईल. या पाच सिद्धांतांची व्याप्ती अशी सर्वसमावेशक असल्याने या पंचसूत्रीने ग्रंथालयांच्या एकूण अस्तित्वाला एक प्रकारची पायाभूत अशी तात्त्विक बैठक मिळवून दिली आहे.

२.२ विषय विवेचन

२.२.१ पहिला सिद्धांत ग्रंथ उपयोगासाठी असतात

ग्रंथ हे उपयोगासाठी असतात यात वेगळे सांगण्यासारखे ते काय, असे तुम्हांला वाटेल. परंतु ग्रंथालयांचा इतिहास पाहिला तर तशी स्थिती नसल्याचे आपल्या ध्यानात येईल. पूर्वीच्या काळी ग्रंथनिर्मिती. ही आजच्याप्रमाणे सोपी नव्हती. पुस्तके म्हणजे मातीच्या विटा, ताडाची किंवा कमळाची पाने किंवा तत्सम पृष्ठभागावर कोरलेला किंवा रेखाटलेला मजकूर असे. साहजिकच अशी पुस्तके मोकळेपणी वापरण्याऐवजी ती जपून ठेवण्याकडे लोकांचा कल असे. मध्ययुगीन युरोपातील राजघराण्यात हे ग्रंथ साखळीने बांधून ठेवीत असत. त्यांचा वापर अत्यंत काटेकोरपणे, विशिष्ट व्यक्तींपुरताच केला जात असे. मुद्रणाचा शोध इसवी सन १४५४ साली लागला. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या अनेक प्रती छापण्याची कला अस्तित्वात आली. तरीही अनेक ग्रंथालयांमधून पुस्तकांच्या वापरावर अनेक नियंत्रणे असल्याचे दिसून येईल. तो काळ आजच्यासारखा विचारांच्या मुक्त आदान-प्रदानाचा नव्हता. बहुसंख्य समाज लेखन-वाचनासारख्या गोष्टींपासून दूर राहिलेला होता. लिहिणे, वाचणे, पुस्तके सांभाळणे हा उद्योग काही थोडे विशिष्ट लोक बहुधा उच्चवर्णीय आणि राजघराण्यातील व्यक्तीच करीत असत. बहुसंख्य समाज निरक्षरच होता. आजकाल मात्र ही स्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. पुस्तके कपाटात जपून ठेवण्याचे दिवस इतिहासजमा झाले असून आता त्यांचा मुक्तपणे वापर करण्याचा काळ आलेला आहे. पुस्तके ही आता सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागली आहेत. ग्रंथालयाच्या सर्व कामकाजाचा प्रधान हेतूदेखील पुस्तके केवळ जपून ठेवण्यापेक्षा त्यातील ज्ञान व माहिती लोकांपर्यंत जावी, हाच असतो. पुस्तके उपयोगासाठी असतात. या सूत्राचे उपयोजन किंवा अंमलबजावणी ग्रंथालयात कशा रितीने होते, हे आता पाहू.

पहिल्या सिद्धांताचे उपयोजन

(क) ग्रंथालयाची जागा

पहिला सिद्धांत आपणास बरेच काही सांगून जातो. ग्रंथालयाची जागा किंवा ठिकाण निश्चित करताना हा नियम ध्यानात ठेवावा लागतो. ग्रंथालयाची जागा अशाच ठिकाणी असली पाहिजे की जेथे बहुसंख्य वाचकांना सहजपणे संपर्क ठेवता येईल. ग्रंथालय हे सहसा मध्यवर्ती ठिकाणी असावे, म्हणजे वाचकांना, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करून घेणे सुलभ जाते. त्याचबरोबर या ठिकाणी शांतता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण शांतता नसेल तर वाचन किंवा अध्ययन शक्य होणार नाही. हा नियम जसा सार्वजनिक ग्रंथालयांना लागू आहे, तसाच शाळा-महाविद्यालये अथवा विद्यापीठाच्या ग्रंथालयांसही लागू आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपत्तीचा उपयोग किंवा वापर व्हावयाचा असेल तर ग्रंथालयाचे ठिकाण हे जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करू शकेल, त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकेल, असे मध्यवर्ती व संपर्कास सुलभ हवे. दूर, एकांतात असू नये.

(ख) ग्रंथालयाची वेळ

जागेप्रमाणेच ग्रंथालयाच्या कामकाजाची वेळ हीसुद्धा वाचकांना सोयीस्कर अशीच असली पाहिजे. आपल्या देशातील अनेक ग्रंथालये या बाबीकडे पुरेशा गांभीर्याने पाहत नाहीत असे दिसून येते. विशेषतः शालेय, महाविद्यालयीन व सार्वजनिक ग्रंथालये या नियमांकडे काळजीपूर्वक पाहत नाहीत. ती नेमकी अशा वेळी उघडी असतात, की ज्या वेळी त्यांचा वाचकवर्ग दुसऱ्या कामात गुंतलेला असतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक ग्रंथालये सकाळी, संध्याकाळी व रविवारी उघडी असावीत.

(ग) ग्रंथालयाची इमारत व फर्निचर

ग्रंथालयाची जागा, कामकाजाची वेळ यांप्रमाणेच ग्रंथालयाची इमारतदेखील ग्रंथसंग्रह करण्यास व वाचन व्यवहारास सोयीची अशीच असावी. ग्रंथसंपदेचे धूळ, कीड, पाऊस यांपासून रक्षण करू शकेल अशी इमारत ही ग्रंथालयाची प्राथमिक गरज आहे. ग्रंथालयातील विविध विभागांची कामे इमारतीमध्ये सोयीस्कर रितीने व्हावीतच; परंतु स्त्रिया, मुले अशा विविध वर्गातील वाचकांनाही ही इमारत येण्या-जाण्याच्या तसेच वाचनाच्या दृष्टीने सोयीची असावी.

इमारतीप्रमाणेच फर्निचरही अद्ययावत आकर्षक व उपयुक्त असले पाहिजे. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील कपाटांची उंची ६-७ फुटांपेक्षा अधिक असू नये. कपाटे यापेक्षा उंच असतील तर तेथील पुस्तके हाताळणे अवघड जाईल आणि अशा पुस्तकांकडे वाचक सहसा वळणारच नाहीत. त्यांचा वापर होणार नाही, हे योग्य नव्हे. विशेषतः छोटे वाचक, स्त्रिया यांनाही सहज वापरता येईल असे फर्निचर ग्रंथालयात असावे. इमारतीची रचनाही तशीच असावी. ग्रंथालयातील फर्निचर सोयीचे, सुबक, वाचकांना आरामशीरपणे वाचन करता येण्यासारखे असेल तर नक्कीच वाचकास त्या ग्रंथालयात पुन्हा यावेसे वाटेल. त्यामुळे ग्रंथांचा उपयोगही अधिक प्रमाणात होईल, हे स्पष्ट आहे.

(घ) कर्मचारीवर्ग

ग्रंथालयशास्त्राच्या पहिल्या सिद्धांताच्या पूर्ततेसाठी ग्रंथालयातील कर्मचारीही विशिष्ट पात्रतेचे व गुणांचे असावेत, अशी अपेक्षा असते. सर्वप्रथम त्यांनी ग्रंथालयशास्त्राचे योग्य प्रशिक्षण घेतलेले असणे महत्त्वाचे आहे. कारण योग्य शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असली तरच आपले काम ते जाणकारीने करू शकतील. आपल्या कामात वाकबगार असतील.

परंतु एवढे पुरेसे नाही. ग्रंथालयातील कर्मचारी हे उत्साही, सेवातत्पर व सौजन्यशील स्वभावाचे असले पाहिजेत. आपले प्रत्येक काम हे अखेरीस वाचकांच्या सेवेसाठीच असते व तेच आपले ध्येय आहे, ही गोष्ट त्यांनी सदैव लक्षात ठेवली पाहिजे. वाचकांना शक्य तेवढे जास्तीत जास्त साहाय्य करण्याची त्यांची भूमिका हवी. एखादी वाचनप्रेमी व्यक्ती ग्रंथालयात आली आणि तिला जर ग्रंथालय सेवकांकडून योग्य सहकार्य मिळाले नाही, तर ती व्यक्ती ग्रंथालयाबद्दल गैरसमज करून घेईल व पुन्हा कदाचित ग्रंथालयाकडे वळणारही नाही, अशी भीती असते. म्हणून ग्रंथालयातील कर्मचारीवर्ग हा वाचकांना साहाय्य करण्यास तत्पर, उत्साही असावा. तरच ग्रंथव्यवहार वाढेल व ग्रंथालय लोकप्रिय होईल. ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात', या सिद्धांताचे पालनही मग आपोआपच होईल.

२.२.२ दुसरा सिद्धांत प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ

प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे, हा डॉ. रंगनाथन यांनी घालून दिलेला दुसरा महत्त्वाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ असा, की पुस्तके ही सर्वांसाठी असतात. विशिष्ट वा मर्यादित लोकांसाठीच नसतात. सर्व प्रकारच्या सर्व थरांमधील वाचकांना त्यांच्या विभिन्न गरजांनुसार ग्रंथ मिळाले पाहिजेत. म्हणजेच पर्यायाने त्यांना ग्रंथालयीन सेवा मिळाली पाहिजे, यावर हे सूत्र भर देते. ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीप्रमाणे, गरजेप्रमाणे पुस्तक मिळावे, या आग्रहामध्ये ग्रंथालयीन सेवेचे लोकशाहीकरण तसेच सार्वत्रिकीकरण अपेक्षित आहे. एके काळी ग्रंथालयाचा वापर करणे हा केवळ काही खास उच्चभ्रू वर्गातील लोकांचाच अधिकार आहे, असे मानले जात असे. सर्वांना निरपेक्ष रितीने तो हक्क नव्हता. परिणामी बहुजन समाज ज्ञानापासून वंचित राहिला. ही परिस्थिती नंतरच्या काळात झपाट्याने बदलली. ज्ञान हे सर्वांसाठी खुले झाले.लोकशाही राज्यपद्धतीने शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करणे व त्यासाठी ग्रंथालयांसारख्या व्यवस्थांचा लाभ घेणे हा मूलभूत अधिकार ठरवून तो प्रत्येक लहानथोर व्यक्तीला निरपवादपणे बहाल केला. म्हणूनच प्रत्येक वाचकासाठी पुस्तक या सिद्धांतामध्येसुद्धा ग्रंथालयसेवा ही प्रत्येक नागरिकास हक्क या स्वरूपात उपलब्ध व्हावी, कोणीही त्यापासून वंचित राहू नये, यावर भर देण्यात आला आहे.

( १ ) दुसऱ्या सिद्धांताचे उपयोजन

दुसरा सिद्धांत राज्यशासन, ग्रंथालयाचे चालक, कर्मचारीवर्ग, तसेच वाचक यांना ग्रंथालयाच्या संदर्भात कोणती कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, याचे दिग्दर्शन करतो.

(क) राज्यशासनाची कर्तव्ये

राज्यामध्ये ग्रंथालयीन सेवा जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देणे, हे राज्यशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. हे करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये ग्रंथालय कायदा असावा आणि ग्रंथालय कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे आणि त्यायोगे शक्य तितके जास्तीत जास्त अर्थसाहाय्य ग्रंथालयांसाठी उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. हे करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ग्रंथालयांमुळे समाजाचे अधिक हित साधू शकेल, याचा विचार करून त्या पद्धतीच्या ग्रंथालयांचे जाळे राज्यात निर्माण करणे आवश्यक ठरते. राज्यशासन प्रामुख्याने सार्वजनिक ग्रंथालयांसाठीच अनुदान देत असते. परंतु सार्वजनिक ग्रंथालयांद्वारे सर्वच वाचकांची गरज पूर्ण होत नसते. उदाहरणार्थ, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक या वर्गाची गरज सार्वजनिक ग्रंथालयाद्वारे भागू शकत नाही. म्हणून अशा वर्गांसाठी शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठीय तसेच विशेष ग्रंथालयांची (स्पेशल लायब्ररीज) उभारणी करणे हेदेखील राज्यशासनाचे कर्तव्य ठरते. (ख) ग्रंथालमचालकांची कर्तव्ये

ग्रंथालयशास्त्राच्या दुसऱ्या सिद्धांताच्या संदर्भात ग्रंथालय चालविणाऱ्या ( पदाधिकारी किंवा अधिकारी) वर्गावर जी जबाबदारी पडते, ती मुख्यतः दोन संबंधांत असते- (१) ग्रंथनिवड करणे आणि (२) योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणे.

(१) ग्रंथनिवड : आपल्या वाचकांच्या आवडीची सर्वच पुस्तके कोणतेही ग्रंथालय खरेदी करू शकत नाही. त्या दृष्टीनेच असे म्हणले जाते की कोणत्याही ग्रंथालयाचे बजेट किंवा आर्थिक तरतूद ही गरजेच्या मानाने नेहमीच मर्यादित असते. म्हणून ग्रंथखरेदी करण्यापूर्वी ग्रंथाची योग्य प्रकारे निवड करण्याची आवश्यकता असते. उपलब्ध असलेल्या थोड्या पैशांमध्ये जास्तीत जास्त उपयुक्त पुस्तके घेतल्यास अधिकाधिक वाचकांचा दुवा मिळविता येतो. म्हणून ग्रंथालयचालकांनी पुस्तकांची निवड अत्यंत दक्षतेने केली पाहिजे. भिन्नभिन्न स्वरूपाच्या ग्रंथालयांनी आपले उद्दिष्ट तसेच वाचकवर्गाची गरज यांचा विचार करून ग्रंथनिवड करावी. शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये क्रमिक, त्यास पूरक अशी संदर्भपुस्तके व संदर्भग्रंथ (शब्दकोश विश्वकोश इत्यादी) असावेत; तर सार्वजनिक ग्रंथालयात ललित साहित्याबरोबरच जीवनोपयोगी माहिती, ज्ञान देणारी पुस्तके असावीत. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेती, पशुपालन, पूरक उद्योगधंदे यांची माहिती गावातील सार्वजनिक ग्रंथालयात मिळाली पाहिजे. महिलांना आहारशास्त्र, आरोग्य, शिवणटिपणासारख्या उपयुक्त कला, बालसंगोपन यांचे शिक्षण ग्रंथालयातील पुस्तकांद्वारे उपलब्ध झाले पाहिजे. असे झाले तर ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक वाचकासाठी पुस्तक असते हा सिद्धांत व्यवहारात आणला जाईल.

असा विविधांगी ग्रंथसंग्रह करण्यापूर्वी आपल्या वाचकांना नेमकी कोणत्या पुस्तकांची गरज आहे, त्यांची आवड काय आहे, यांबाबतची पाहणी (सर्वेक्षण) करण्याचे तंत्र हल्ली आधुनिक ग्रंथालयात वापरले जाते. त्यानुसार ग्रंथ खरेदी करण्यासाठी धोरण आखले जाते. त्याचा चांगला उपयोग होतो. वाचकवर्गही पसंतीची पुस्तके मिळाल्याने संतुष्ट राहतो. सार्वजनिक, शैक्षणिक ग्रंथालयात प्रादेशिक भाषेतील ग्रंथ घेतले पाहिजेत. बालवाचकांसाठी बालवाङ्मयाची खरेदी केली पाहिजे. ही दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे.

(२) योग्य कर्मचाऱ्यांची निवड ग्रंथालय चालविणाऱ्या पदाधिकारी मंडळाने किंवा अधिकाऱ्यांनी

'प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे' हा दुसरा सिद्धांत पूर्णपणे अमलात आणण्यासाठी वेचक ग्रंथसंग्रह करण्याबरोबरच ग्रंथालयातील कर्मचारीवर्गही कर्तव्यनिष्ठ व सेवातत्पर असाच निवडला पाहिजे. तसे नसल्यास, ग्रंथसंग्रह उत्कृष्ट दर्जाचा असूनही वाचकांना त्याचा लाभ मिळणार नाही. एखाद्या वाचकाला हवी असणारी माहिती किंवा संदर्भ ग्रंथालयातील कोणकोणत्या पुस्तकांमध्ये आहेत. हे कर्मचाऱ्यांनी त्या वाचकाच्या निदर्शनास आणले पाहिजे. तरच ग्रंथालयाचा हेतू साध्य होईल.

(ग) कर्मचाऱ्यांची कर्तव्ये

ग्रंथालयाच्या चालकांनी ग्रंथालयासाठी पुरेसा व सक्षम कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिला एवढ्यानेही कार्यभाग साधत नाही. कर्मचाऱ्यांनी वाचकांना सदैव सेवा देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येक चाचकासाठी ग्रंथ आहे. हा सिद्धांत ग्रंथालय सेवकांकडून वाचकांस दिल्या जाणान्या संदर्भसेवेवर भर देतो. ग्रंथालयात एखाद्या वाचकाला हवी असणारी माहिती पुरविणारी एकापेक्षा जास्त • पुस्तके असू शकतात. त्या सर्व पुस्तकांची वाचकाला माहिती असतेच असे नाही. अशा वेळी वाचकाने मागणी केलेले एखादेच पुस्तक ग्रंथालय सेवकांनी पुरविले तर ग्रंथालयशास्त्राच्या या दुसऱ्या सिद्धांताचे पूर्णांशाने पालन झाले नाही, असेच म्हणावे लागेल. याउलट, वाचकाने उत्सुकता दाखविलेल्या विषयावर आपल्या ग्रंथालयात कोणकोणती पुस्तके आहेत, त्यांचे लेखक कोण आहेत, या पुस्तकांची वैशिष्ट्ये काय यासंबंधी थोडीफार माहिती देऊन तसेच वाचकांचा प्रतिसाद अजमावून यांपैकी काही पुस्तके ग्रंथालय सेवकांनी त्या वाचकापुढे प्रत्यक्ष हजर केली तर वाचकाला हवी ती माहिती त्वरित मिळू शकेल. तो आनंदित होऊन कृतज्ञ भावनेने ग्रंथालयाचा निरोप घेईल. वाचकाचे असे समाधान करणे हेच ग्रंथालयाचे खरे उद्दिष्ट आहे व दुसऱ्या सिद्धांतामध्ये तेच अपेक्षित आहे.

काही वेळा असेही घडते, की एखाद्या वाचकाला हवा असणारा विषय एखाद्या पुस्तकात एखाद्या प्रकरणापुरता किंवा काही थोड्या पृष्ठांमध्येच वर्णन केलेला असतो. त्यामुळे वाचक त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्याच्याकडून हा संदर्भ नजरेआड होण्याची खूप शक्यता असते. असे होऊ नये म्हणून ग्रंथालयातील तालिकेमध्ये या विषयाचाही उल्लेख असणारी वर्गीकृत अथवा उलट संदर्भ नोंद (क्रॉस रेफरन्स एंट्री) असावी. ती वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकेल आणि वाचकाला आवश्यक ती माहिती मिळेल. त्याची निराशा टळेल. 'प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे' या सूत्रामध्ये पुस्तक या शब्दाच्या स्थूल अर्थाप्रमाणे केवळ पुस्तकांचाच समावेश होतो असे नाही, तर वाचकाला हवी असणारी माहिती देणारे ग्रंथालयातील इतर प्रकारचे वाचनसाहित्यही त्यात येते. उदाहरणार्थ, एखादे नियतकालिक असेल, विशिष्ट लेख असेल. आजकाल ज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नित्यनवीन भर पडत असते की विविध ठिकाणांहून प्रसिद्ध होणाऱ्या अशा माहितीची अचूक नोंद ठेवणे व ती वेळेवर उपलब्ध करून देणे हे मोठेच अवघड कार्य झालेले आहे. परंतु ग्रंथालयशास्त्र हा दुसरा सिद्धांत ग्रंथालयातील सेवकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी ग्रंथालयातील विविध प्रकारच्या ग्रंथसूची, सारसंग्रह, अहवाल इत्यादी संदर्भसाधनांचा उपयोग करून वाचकाला हवी असणारी माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे.

(घ) वाचकाची कर्तव्ये

दुसऱ्या सूत्रानुसार वाचकाचीही काही कर्तव्ये आहेत. विशेषतः वाचायला नेलेले पुस्तक वेळेवर परत करण्यासंबंधात वाचकाने दक्ष राहिले पाहिजे. तसे न केल्यास इतर वाचकांचा ते पुस्तक वाचण्याचा हक्क हिरावून घेतला जातो व दुसऱ्या सिद्धांताचा भंग होतो. काही वाचक पुस्तके, इतरांना मिळू नयेत म्हणून मुद्दाम चुकीच्या जागी ठेवतात. पाने फाडतात. एवढेच नव्हे तर पुस्तके चोरूनदेखील नेतात. परिणामी ते पुस्तक वाचण्याची इतरांची संधी नष्ट होते. हे सर्वया चुकीचे असून प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. यासाठीच आजकाल वाचकांचे प्रशिक्षण ही कल्पना रूढ होत आहे. त्यात वाचकांनी ग्रंथालयाचा सुयोग्य वापर कसा करावा, या संदर्भात वाचकाला माहिती दिली जाते.

(२) साधनसामग्रीचा उपयोग

कोणतेही ग्रंथालय हे परिपूर्ण असू शकत नाही. ज्ञान व माहितीचे प्रकाशन दररोज नवनवीन स्वरूपात आपल्यासमोर येत असते. त्यामुळे कोणत्याही ग्रंथालयास प्रसिद्ध होणारे सर्वच वाचनसाहित्य खरेदी करून आपल्या वाचकांना उपलब्ध करून देणे हे सर्वस्वी अशक्य असते. अगदी लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन किंवा लेनिन स्टेट लायब्ररी, मॉस्को यांसारख्या जगविख्यात ग्रंथालयांनाही आपल्या बाचकांना हवे ते पुस्तक स्वतःच्या संग्रहातून नेहमीच देता येत नाही. यासाठी काही ग्रंथालयांनी एकत्र येऊन एकमेकांस सहकार्य करण्याची कल्पना पुढे आली. एखाद्या ग्रंथालयात जे पुस्तक नसते, ते शेजारच्या दुसऱ्या ग्रंथालयात असू शकते. वाचकाची गरज भागविण्यासाठी दुसरीकडून ते पुस्तक काही मुदतीसाठी उसने आणून आपल्या वाचकास पुरविणे हा त्यावरील एक मार्ग होय. यालाच साधनसामग्रीचा परस्पर सहकार्याने उपयोग (रिसोर्स शेअरिंग) असे म्हणले जाते. अशा प्रकारचे परस्पर सहकार्य एका गावातील 'सर्व ग्रंथालयांमध्ये होऊ शकते. त्याचप्रमाणे राज्य, विभागीय देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही सहकार्ण केले जाऊ शकते. ग्रंथालयांनी अशा तऱ्हेने साधनसामग्रीचा एकमेकांच्या सहकार्याने उपयोग करून आपापल्या वाचकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काही निश्चित व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न यापूर्वीच सुरू झालेले आहेत. प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे. या ग्रंथालयशास्त्राच्या दुसऱ्या सिद्धांताच्या परिपूर्तीच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.२.२.३ तिसरा सिद्धांत प्रत्येक ग्रंथासाठी वाचक

ग्रंथालयशास्त्राचा तिसरा सिद्धांत आहे प्रत्येक ग्रंथासाठी वाचक असतो.' पहिल्या सिद्धांताप्रमाणेच या ठिकाणीही पुस्तकाच्या बाजूने विचार केलेला दिसून येतो. ग्रंथालयात असलेल्या प्रत्येक पुस्तकाला त्यातील माहिती व विषयाला अनुसरून योग्य असा वाचक मिळाला पाहिजे आणि त्या ग्रंथाचा वापर झाला पाहिजे. न वापरल्या जाणाऱ्या ग्रंथांवर झालेली गुंतवणूक हा व्यर्थ खर्च असतो. ग्रंथालयात तसा तो होऊ नये, निदानपक्षी कमीत कमी व्हावा, असा दृष्टिकोन या सिद्धांतामागे आहे.

तिसऱ्या सिद्धांताचे उपयोजन

(क) मुक्त प्रवेश

तिसऱ्या सूत्राची ग्रंथालयात अंमलबजावणी करताना वाचकांना पुस्तकापर्यंत मुक्तपणे प्रवेश मिळेल,अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. या व्यवस्थेमध्ये ग्रंथसंग्रह हा विषयानुसार वर्गीकृत करून उघड्या शेल्फांवर ठेवलेला असतो. आपल्या गरजेनी पुस्तके या ठिकाणी वाचकाला मोकळेपणाने पाहता, हाताळता येतात. अशा रितीने उघड्या कपाटांमधील पुस्तके शोधताना वाचकाला त्याच्या आवडीचे एखादे पुस्तक अचानकपणे पाहायला मिळते, जे एरवी त्याला माहीतही नसते. म्हणून तिसऱ्या सिद्धांताची अंमलबजावणी करताना वाचकांचा पुस्तकांपर्यंत मुक्त प्रवेश (ओपन अॅक्सेस) अत्यंत आवश्यक ठरतो.

मुक्त प्रवेशाची पद्धत योग्य रितीने राबवायची झाली तर ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांवर काही जबाबदारी निश्चितपणे पडते. त्यापैकी सर्वप्रथम म्हणजे या पद्धतीमध्ये ग्रंथसंग्रहाची विषयवार मांडणी कायम ठेवावी लागते. एकमेकांशी संबंधित असे विषय एकमेकांशेजारी ठेवावे लागतात. वाचकांच्या संपर्कामुळे किंवा पुस्तके मुक्तपणे हाताळण्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या जागा बदलू शकतात. पुस्तके या विभागातून त्या विभागात जाऊन पडण्याचीही शक्यता असते. कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घेऊन पुस्तके वारंवार नीटपणे, विषयवार, विभागवार जागेवर लावली पाहिजेत. वाचकांच्या मार्गदर्शनासाठी ग्रंथसंग्रहामध्ये स्थान यादी, विषयांची / विभागांची नावे, पाट्या, फलक (बोर्ड) ठळकपणे दिसतील अशी लावली पाहिजेत.

वाचकांवरही या व्यवस्थेत काही जबाबदारी नक्कीच आहे. त्यांनी पुस्तके हाताळताना काळजी घेतली पाहिजे. वारंवार पुस्तके बाहेर काढून नंतर ती कुठेतरी ठेवणे टाळले पाहिजे. नेमके हवे तेच पुस्तक घ्यावे व ते शक्यतो कपाटावर त्याच जागी ठेवण्याचा प्रयत्न करावा. शिवाय काही अपरिपक्व विचारांचे वाचक एखादे पुस्तक फक्त आपल्यालाच पुन्हा मिळावे म्हणून मुद्दाम चुकीच्या ठिकाणी ठेवतात. इतकेच नव्हे तर पुस्तकाची पाने फाडतात किंवा पुस्तक चोरून नेण्याचाही प्रयत्न करतात. अशा असामाजिक प्रवृत्तींना प्रतिकार करण्याची दक्षता जाणत्या वाचकांनी घेतली पाहिजे व ग्रंथालयाची व्यवस्था बिघडू नये यासाठी सहकार्य केले पाहिजे. मुक्त प्रवेश पद्धतीचे काही फायदे तर काही तोटेही आहेत. परंतु दक्षता घेऊन तोटे कमी केले व फायदे वाढविले, तर 'प्रत्येक ग्रंथासाठी वाचक' या सिद्धांताचे उत्तम प्रकारे पालन करणे शक्य होईल व पुस्तकांचा उपयोग वाढविता येईल.

मुक्त प्रवेश पद्धतीमध्ये वाचकांच्या दृष्टीने एक मोठा फायदा असा होतो की, त्यांच्या आवडीच्या पुस्तकांशेजारी असणारी त्या विषयावरील इतरही अनेक पुस्तके त्यांना पाहायला मिळू शकतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित अशा इतर विषयांवरील पुस्तकेही ते पाहू शकतात. हा लाभ नियंत्रित किंवा बंद प्रवेश पद्धतीमध्ये मिळत नाही.

या पद्धतीत सर्वात मोठा त्रास असा होतो की, काही वाचक पुस्तके मुद्दाम मलतीकडेच ठेवून देतात. पाने फाडणे, प्रसंगी पुस्तकच ग्रंथालयाबाहेर चोरून नेणे असे प्रकार होण्याचीही शक्यता असते. हे प्रकार नियंत्रित करणे शक्य असले तरी संपूर्णपणे बंद करणे कठीणच असते. तथापि असे असते तरी वाचक व पुस्तक यांची कोणाही मध्यस्थाशिवाय समक्ष गाठभेट पडणे हा मोठा फायदा असल्य काही बाबतीत काळजी घेतली तर ही पद्धत उपयुक्त होऊ शकते व त्यामुळे पुस्तकांना त्यांचा योग्य वाचक मिळू शकतो. वाचकालाही त्याच्या आवडीची पुस्तके मिळतात.

नवीन पुस्तकांची यादी ग्रंथालयात नव्याने आलेल्या पुस्तकांच्या याद्या नियमितपणे तयार करून त्या वाचकांसाठी वितरित केल्या पाहिजेत. त्यायोगे नवीन पुस्तकांची माहिती पुस्तकप्रेमी वाचकांना मिळू शकेल व त्यांच्याकडून अशा पुस्तकांना मागणी येईल. पुस्तके प्रदर्शित करणे : ग्रंथालयात नवीन आलेली पुस्तके एखाद्या दर्शनी ठिकाणी प्रदर्शित करून ठेवावीत. अशा रितीने आकर्षकरित्या प्रदर्शित केलेल्या नव्या पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष चटकन वेधले जाते. ज्यांना ती पुस्तके आवडतात ते वाचक पुस्तकांसाठी आपली मागणी नोंदवितात. अशा नवीन घेतलेल्या पुस्तकांची आकर्षक मांडणी अनेक ग्रंथालयांत हल्ली करून ठेवतात.

ग्रंथप्रदर्शन ठरावीक कालावधीनंतर ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करावे. त्यामुळे अनेक पुस्तकांना त्यांचे वाचक भेटतात, असा अनुभव आहे. कारण प्रदर्शनामुळे वाचक व पुस्तक यांची समोरासमोर भेट होत असते. प्रदर्शनात वाचक पुस्तक हाती घेऊन पाहू शकतो, चालू शकतो. अनुक्रमणिका पुस्तकाची मांडणी, इत्यादी पाहू शकतो. हा पुस्तकाचा वाचकाला होणारा संक्षिप्त परिचयच होय. प्रयत्नामधूनही अनेक पुस्तकांना त्यांचे जिज्ञासू वाचक मिळू शकतात. वाचकांना कोणती विविध प्रकारची पुस्तके ग्रंथालयात आहेत, हे प्रदर्शनामुळे चटकन समजून येते.

(ख) ग्रंथालय तालिका

दुसऱ्या सिद्धांताप्रमाणेच तिसऱ्या सिद्धांताचे पालनही ग्रंथालयातील तालिका अद्ययावत व नीटस असण्यामुळे होऊ शकते. ग्रंथालय तालिका (कॅटलॉग) शास्त्रशुद्ध व परिपूर्ण असली तर विविध दृष्टिकोनातून तालिका हाताळणाऱ्या जिज्ञासू वाचकाचे लक्ष त्याला हव्या असणाऱ्या नेमक्या पुस्तकाकडे वेधले जाते.

२.२.४ चौथा सिद्धांत वाचकाचा वेळ वाचवा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ

वाचवा

ग्रंथालयामध्ये काही वाचनसाहित्य मिळविण्यासाठी येणारे वाचक हे उद्योगी व अभ्यासू नागरिक असतात. एखादे पुस्तक किंवा संदर्भ मिळविण्यासाठी ते ग्रंथालयात येतात. त्या वेळी त्यांना अकारण जास्त वेळ वाट पाहावी लागू नये. तसे झाले तर त्यांचा ग्रंथालयाबाबत गैरसमज होऊ शकेल व ते पुन्हा क्वचितच ग्रंथालयाकडे येतील, म्हणून कोणत्याही वाचकाला ग्रंथालयात त्वरित व जलद गतीने सेवा मिळाली पाहिजे.

काही वेळा वाचकाला एखाद्या बौद्धिक गोष्टीत वाटणारे स्वारस्य हे तात्कालिकही असू शकते. उदाहरणार्थ, 'रुपया परिवर्तनीय झाला म्हणजे काय? हे त्याला लगेच समजावयास हवे. ही माहिती देण्यासाठी उशीर झाला तर तो सारा विषयच विसरून जाईल. असे होऊ नये म्हणूनही वाचक ग्रंथालयात दाखल झाल्यावर त्याची जशी मागणी असेल त्यानुसार त्याला सत्त्वर वाचनसाहित्य मिळाले पाहिजे. तरच ग्रंथालयाविषयी त्याचे मत चांगले होईल.

चौथ्या सिद्धांताचे उपयोजन

(क) मुक्त प्रवेश

ग्रंथालयशास्त्राच्या तिसऱ्या सिद्धांताप्रमाणेच चौथा सिद्धांतदेखील मुक्त प्रवेश पद्धतीचाच पुरस्कार करतो. ज्या ग्रंथालयात मुक्त प्रवेश पद्धतीऐवजी वाचकांस ग्रंथ हाताळण्याची सुविधा नसते. तेथे वाचकांची बरीच गैरसोय होते, त्यामुळे हवी ती पुस्तके मिळविण्यात त्यांचा वेळही बराच वाया जातो. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील तालिका पाहून आपल्या गरजेच्या पुस्तकांची यादी केली व ती ग्रंथालयातील कर्मचान्याकडे दिली तर प्रथम कर्मचारीही यादी घेऊन ग्रंथसंग्रहाकडे जातो व त्या यादीपैकी उपलब्ध असतील तेवढी पुस्तके स्वतः घेऊन बाहेर येतो. वाचकाने ती पुस्तके पाहिल्यावर त्यातली सर्वच पुस्तके आपल्याला वाटली होती तेवढी उपयुक्त नाहीत असे वाचकाच्या ध्यानी येते. काही पुस्तकांत विषयाची त्रोटक माहिती असते. काही पुस्तकांत त्या वाचकाने पूर्वी अन्यत्र मिळविलेलीच माहिती असते. या कारणांमुळे बाचकाला ग्रंथालय कर्मचाऱ्याने दाखविलेली सर्वच पुस्तके न्यावीत, असे वाटत नाही. मग तो पुन्हा तालिकेकडे वळून दुसरी यादी करायला प्रवृत्त होतो. पुन्हा पूर्वीप्रमाणेच सारी प्रक्रिया होते. अशा चुका आणि शिका पद्धतीमुळे उभयपक्षी गैरसोयच अधिक होते व त्यामध्ये वाचकाचा वेळही वाया जातो.

वाचकाचा वेळ दोन प्रकारचा असू शकतो. एक प्रत्यक्षपणे खर्च होणारा म्हणजेच वस्तुनिष्ठ वेळ तर दुसरा विषयनिष्ठ व्यक्तिनिष्ठ (Subjective) वेळ. अर्थात जेवढा वेळ खर्च झाला असे वाचकाला वाटते, तो वेळ म्हणजे आपण बसची वाट पाहात मिनिटे थांबलो तर हा वस्तुनिष्ठ वेळ, पण ही १० मिनिटे अनेकदा ३० मिनिटांप्रमाणे वाटतात. हा विषयनिष्ठ (व्यक्तिनिष्ठ) वेळ होय. बंद प्रवेशपद्धतीमध्ये या दोन्ही प्रकारे वाचकाचा वेळ खर्च होत असतो.

उलटपक्षी, मुक्त प्रवेश पद्धतीमध्ये वाचक स्वतः ग्रंथसंग्रहामध्ये जाऊन विविध पुस्तके हाताळीत असल्याने त्याला आपला वेळ वाया गेल्यासारखे वाटत नाही. त्यातून जर पुस्तके विषयवार, वर्गीकरण करून लावलेली असतील तर त्याचा प्रत्यक्ष खर्च होणारा वेळही वाचतो. अशा प्रकारे वाचकाचा वस्तुनिष्ठ व विषयनिष्ठ / व्यक्तीनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह) दोन्ही प्रकारचा वेळ मुक्त प्रवेश पद्धतीत वाचू शकतो. म्हणूनच चौथ्या सिद्धांताचे पालन करण्यासाठी मुक्त प्रवेश पद्धती उपकारक ठरते. (ख) वर्गीकरण व तालिका

वाचकाचा वेळ वाचविण्यासाठी आणखीही काही महत्त्वाची तांत्रिक साधने ग्रंथालयशास्त्राने निर्माण केलेली आहेत. पुस्तकांचे विषयवारीने योग्य प्रकारे वर्गीकरण केल्याने एका विषयावरील सर्व पुस्तके एकत्र येतात. वाचक विविध प्रकारे म्हणजे पुस्तकाच्या नावानुसार, लेखकाच्या नावानुसार किंवा विषयानुसार, ग्रंथालयातील तालिकेमध्ये आपल्या गरजेच्या पुस्तकांचा शोध घेत असतो. म्हणून तालिका ही वरीलप्रमाणे ग्रंथनामानुसार, लेखकनामानुसार किंवा विषयानुसार तयार केलेली असल्यास हवे ते पुस्तक शोधण्यात वाचकाचा वेळ वाया जात नाही. त्याचप्रमाणे संदर्भसेवा हीदेखील वाचकाला त्वरित हवी ती माहिती पुरविणारी व मार्गदर्शन करणारी महत्त्वाची ग्रंथालयीन सेवा होय. माहितीचे संकलन करणारे विविध ज्ञानकोश, शब्दकोश नियतकालिके, वार्षिके, अहवाल यांचा उत्तम संग्रह ग्रंथालयात असेल तर वाचकांना अत्यंत कमी वेळात हवी ती माहिती देता येते व त्यांचा वेळ वाचतो. खेरीज, ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह दालनामध्ये विविध विषय संग्रह यांचा निर्देश करणारे फलक, बोर्ड, पाट्या, सूचना ठिकठिकाणी लावण्यामुळेही वाचकांस योग्य मार्गदर्शन होते व त्यांचा वेळ वाया जात नाही. इतकेच काय, पण ग्रंथ, नियतकालिके वा अन्य वाचनसाहित्य यांची वेळेवर खरेदी बांधणी करून घेण्यामुळेही वाचकांना आपण या गोष्टी वेळेवर पुरवू शकतो व त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागत नाही.

(ग) देवघेव पद्धती

ग्रंथालयात पुस्तके देण्याघेण्यासाठी पूर्वी बराच वेळ खर्ची पडत असे. जुन्या रजिस्टर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्यात प्रत्येक पुस्तकाचे नाव नोंदणी क्रमांक लिहावे लागत व वाचकाची सही घेतली जात असे. पुस्तके जमा करतानाही हीच प्रक्रिया उलट दिशेने करावी लागत असे. या पद्धतीत वाचकाचा. बराच वेळ जात असे. अजूनही काही ठिकाणी ही पद्धती प्रचलित आहे.

आजकाल मात्र, तिकीट पद्धती अस्तित्वात आली आहे व तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. याही पुढे जाऊन काही अत्याधुनिक ग्रंथालयांमध्ये फोटो चार्जिंग, कॉम्प्युटर चार्जिंग म्हणजे देवघेव नोंद (बार कोड सिस्टीम) या पद्धतींचा अंमल सुरू झालेला असून यामुळे काही क्षणात वाचकाने परत दिलेल्या किंवा घेतलेल्या पुस्तकांची नोंद केली जाते. परिणामी वाचकांना अत्यंत जलद गतीने सेवा मिळू शकते.

२.२.५ पाचवा सिद्धांत ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे

ग्रंथालयशास्त्राचा डॉ. रंगनाथनप्रणीत पाचवा सिद्धांत आहे ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. या ठिकाणी डॉ. रंगनाथन यांनी संस्था या अर्थाने 'ऑर्गनायझेशन' असा शब्द न वापरता 'ऑर्गॅनिझम्' असा जीवशास्त्रीय शब्द मुद्दाम वापरला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामागे ग्रंथालय हेदेखील एखाद्या सजीव आकृतिबंधाप्रमाणे स्वयंभू आहे आणि सजीवाची वाढ जशी नैसर्गिक विकासक्रमाप्रमाणे होते, तद्वत ग्रंथालयसुद्धा स्वतःच्या सहज स्वाभाविक प्रेरणेने वाढत असते असा आशय आहे. ती केवळ एक कृत्रिम औपचारिक संघटना नाही तर जिथे ज्ञान-विज्ञानाचे, भावना आणि विचारांचे प्रतिमा आणि कल्पकता यांचे साक्षात स्पंदन आहे, अशी ती एक नवनवोन्मेषशाली संस्था आहे आणि मानवाचे जीवन बदलण्यास ती कारण होऊ शकते, असे डॉ. रंगनाथन यांना सुचवावयाचे आहे.

सजीवामध्ये बाढ किंवा विकास हा दोन प्रकारे होत असतो. लहान मुलाची वाढ जसे, उंची शारीरिकदृष्ट्या झपाट्याने होत असते व आपण ती स्पष्टपणे पाहू शकतो. याउलट प्रौढ व्यक्तीची वाढ ही अशी दृश्यमान नसते. तर त्याच्या शरीरात पेशींचे पुनरुत्पादन होत असते. त्यायोगे त्याची गुणात्मक वाढ होत असते. ग्रंथालयाच्या विकासामध्ये आपणास ही सारीच लक्षणे पाहावयास मिळतात. प्राथमिक अवस्थेत ग्रंथालय सर्व बाजूंनी (ग्रंथसंग्रह, वाचक, इमारत, सेवक) वाढत असते. ही वाढ आपल्या डोळ्यांना जाणवत असते. एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र ग्रंथालय अंतर्गतरित्या समृद्ध होत जाते. म्हणजे ग्रंथांची समावेशकता, सेवेतील विविधता, गुणात्मक विकास या गोष्टी ग्रंथालयात दिसून येऊ लागतात. एक मात्र खरे की सर्वकाळ ग्रंथालय हे वाढत व विकसित होत असते. त्याला थांबणे माहीत नसते. म्हणूनच ग्रंथालय ही एक वर्धिष्णू (सतत विकास पावणारी) संस्था आहे, असे पाचवा सिद्धांत सांगतो.

ग्रंथालयाचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे असतात : (१) ग्रंथसंग्रह (२) सेवकवर्ग, (३) वाचकवर्ग, आणि (४) इतर साधनसामग्री, जसे, इमारत, फर्निचर, अन्य साधने, इत्यादी ग्रंथालय वाढते असे ज्यावेळी आपण म्हणतो, त्या वेळी हे सर्वच घटक वाढत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

पाचव्या सिद्धांताचे उपयोजन

(क) ग्रंथसंग्रह

ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह, नियतकालिके यांमध्ये प्राथमिक अवस्थेत अत्यंत वेगाने वाढ होत असते.परिणामी ग्रंथसंग्रह ठेवण्याची जागा (स्टँक रूम) तालिकेच कॅबिनेट, कॅबिनेट रूम तसेच पुस्तके ठेवण्यासाठी असणारी कपाटे यातही स्वाभाविक वाढ असते. ही वाढ लक्षात येण्यासारखीच असते. ग्रंथसंग्रह वाढल्यावर त्याची ठेवण्याची व्यवस्थाही वाढत्या प्रमाणात होणे साहजिकच असते. त्यामुळे ग्रंथालयातील सेवकांना पुनःपुन्हा कपाटांवर मार्गदर्शक फलक लिहून त्यांच्या जागा (पुस्तक संख्या वाढल्यामुळे) बदलून वाचकांची सोय करणे क्रमप्राप्त असते.

(ख) वाचकवर्ग

ज्या ग्रंथालयामध्ये ग्रंथालयशास्त्राचे पहिले चार सिद्धांत जाणीवपूर्वक अमलात आणले जातात, तेथील वाचकांची संख्यादेखील साहजिकच वाढत राहणार, हे उघड सत्य आहे. ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढला की ग्रंथालयाची असलेली जागा अपुरी पडू लागते. कार्यक्षम ग्रंथालयांची वाचकसंख्या ( वाचकवर्गाची संख्या) ही सामान्यतः वाढतच असते, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. (ग) सेवकवर्ग

ग्रंथालयातील ग्रंथसंपदा वाढत जाते तसतसा वाचकवर्गही वाढत जातो आणि वाचकांची संख्या वाढल्यास त्यांच्या गरजेनुसार व मागणीनुसार ग्रंथालयीन सेवेचे स्वरूपही बदलू शकते. ग्रंथालयाच्या कामात वाढ होते. ही वाढ संख्यात्मक तसेच गुणात्मक अशा दोन्ही प्रकारची असते. वाचकांना अधिक प्रमाणात संदर्भसेवा द्यावी लागते. साहजिकच त्यासाठी कर्मचारीवर्गही वाढवावा लागतो.

तो कामाच्या स्वरूपानुसार संख्यात्मक तसेच गुणवत्तेच्या दृष्टीनेही योग्य असा असावा, अशी साहजिकच अपेक्षा असते. थोडक्यात, ग्रंथालयाचा विस्तार जसजसा वाढत जातो तसतसे तेथील ग्रंथालयीन सेवेचे स्वरूपही विकसित होत जाते. हल्ली अनेक संशोधन ग्रंथालयांत प्रलेखन सेवा, झेरॉक्सद्वारे मजकुराच्या प्रती करून देणे, अनुवाद सेवा, इत्यादी प्रकारे सुविधा दिल्या जातात. त्यामुळे काम वाढतेच परंतु कामात म्हणजेच ग्रंथालयीन सेवेत विविधताही येते. साहजिकच त्या प्रमाणात आवश्यक तेवढा व प्रशिक्षित असा कर्मचारीवर्गही नेमावा लागतो.

(घ) वर्गीकरण व तालिका

ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ मोठ्या प्रमाणावर आले म्हणजे योग्य वर्गीकरण पद्धतीचा अवलंब करण्याची महत्त्वाची निकड उत्पन्न होते. आजकाल शास्त्रीय संशोधनातील प्रगतीमुळे एकेका विषयाच्या अनेक शाखा-उपशाखा विकसित होत आहेत. नव्या ज्ञानाची सतत भर पडत आहे. दोन विषयांमधील परस्परसंबंध, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणारेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत. ज्ञानाच्या या सर्व पातळ्या योग्य प्रकारे वर्गीकृत करणारी ग्रंथवर्गीकरण पद्धती ग्रंथालयात अवलंबिली गेली पाहिजे. ठोकळेबाज, स्थूल वर्गीकरण करण्यामुळे वर्गीकरणाची प्रक्रिया अचूकपणे होणार नाही व एखादा ग्रंथ चटकन काढून देणे ग्रंथालय सेवकास कठीण होईल. म्हणून वर्गीकरण पद्धती ही ग्रंथालयाचे व ग्रंथसंपदेचे स्वरूप लक्षात घेऊन त्यास अनुरूप व उपयुक्त होईल, अशीच ठरविली पाहिजे. एवढेच नव्हे तर स्वीकृत वर्गीकरण पद्धतीच्या नवीन आवृत्तीचा ग्रंथपालाने वापर केला पाहिजे, संशोधन ग्रंथालयात इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, गणकयंत्रशास्त्रे यांसारख्या नवीन विषयांसाठी विशेष वर्गीकरण पद्धतीचा वापरही करावा लागेल ग्रंथालयाची वाढ होत असताना, ग्रंथालयातील तालिकाही सुव्यवस्थित काळजीपूर्वक तयार करावी लागते. विशेषतः पत्ररूप तालिका (कार्ड-कॅटलॉग) करताना नोंदी हरवू नयेत, त्यांची रचना बदलू नये व त्यामुळे वाचक गोंधळून जाऊ नयेत, याची दक्षता घेणे आवश्यक ठरते. तालिका हे वाचकांना मार्गदर्शन करणारे एक महत्त्वाचे ग्रंथालयीन साधन आहे.

(च) आधुनिकीकरण

मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या ग्रंथालयांमध्ये विशेषतः ग्रंथालयाचा आकार व ग्रंथालयीन सेवा यांचा विस्तार बराच वाढता असेल तेथे आधुनिकीकरणाचा अवलंब करणे अपरिहार्य ठरते. उदाहरणार्थ, संगणकाचा वापर करून ग्रंथालयातील बरीचशी कामे जलद गतीने व बिनचूकपणे करता येतात. जसे, ग्रंथखरेदी, देवघेवीच्या नोंदी अचूक करणे, इत्यादी.

(छ) भविष्यासाठी तरतूद ग्रंथालयाची वाढ होत असताना ग्रंथालयाच्या इमारतीच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे भावी काळातील इमारतीचा विस्तार. त्यासाठी ग्रंथालयाची इमारत बांधण्याच्या वेळीच योग्य ती तरतूद जागेच्या बाबतीत तसेच ग्रंथालयाच्या इमारतीच्या आराखड्याच्या बाबतीतही करावी लागते. कारण इमारतीचा विस्तार करण्याची गरज कित्येकदा अपेक्षेपेक्षा लवकरच निर्माण होते. म्हणून ऊर्ध्वगामी म्हणजे मजल्यांच्या संदर्भात तसेच जमिनीवर आडव्या स्वरूपातही इमारतीचा अधिक विस्तार गृहीत धरून त्यानुसार इमारतीचे नियोजन करणे आवश्यक ठरते.

(ज) जुनी पुस्तके रद्द करणे

ग्रंथालयाची वाढ होताना, विशिष्ट मर्यादिनंतर ती एखाद्या प्रौढाच्या वाढीप्रमाणे गुणात्मक रितीने समृद्ध होते असे यापूर्वी म्हणले आहे. त्यामुळे ग्रंथालयातील कालबाह्य व तुलनेने निरुपयोगी अशी पुस्तके वेळोवेळी रद्दबातल करणे व त्याजागी नवीन उपयुक्त पुस्तके खरेदी करणे ही प्रक्रिया ग्रंथालय वाढीमध्ये आवश्यक होऊन बसते. असे केल्यामुळे ग्रंथालयाचे संदर्भमूल्य वाढते व ते बदलत्या काळाबरोबर राहते. परिणामी वाचकांच्या दृष्टीने ते अधिक उपयुक्त ठरते, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

काही ग्रंथपालांचा दृष्टिकोन असा आहे की, ग्रंथालय विकासाच्या एका विशिष्ट टप्यानंतर रद्दबातल करावयाच्या पुस्तकांची संख्या व नवीन येणाऱ्या पुस्तकांची संख्या ही साधारणतः सारखीच असावी. म्हणजे ग्रंथालय आपोआपच सम प्रमाणात नित्यनूतन होत राहील. पुस्तके रद्दबातल करण्याची प्रक्रिया सातत्याने केली गेली तर एका विशिष्ट टप्यानंतर ग्रंथालयाच्या वाढीची गती ही पुष्कळ अंशी नियंत्रित होते, असे सर्वसामान्यपणे म्हणावयास हरकत नाही.

पुस्तके ग्रंथालयामधून रद्दबातल करणे याचा अर्थ ती अक्षरशः दाखल नोंदवहीवरून कमीच केली पाहिजेत, असा नाही. ज्यांची उपयुक्तता तादृश कमी झाली आहे, अशी पुस्तके निवडून ती मुख्य संग्रहापासून वेगळी काढून बाजूला ठेवली तरी वेळप्रसंगी वापरता येतात. असे केल्यामुळे नव्या पुस्तकांना जागा उपलब्ध होते. ग्रंथालय अद्ययावत राहते.

एखाद्या शहरातील भूप्रदेशातील काही ग्रंथालयांनी एकत्र येऊन आपली अशा प्रकारे संग्रहातून कमी केलेली सर्व पुस्तके एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवली तर त्यांचा गरजेनुसार उपयोग करता येतो. ग्रंथालयांच्या परस्पर सहकार्याचे (रिसोर्स अरिंग) एक उदाहरण म्हणून सांगता अशा प्रकारे ग्रंथालय हे ग्रंथसंग्रह, वाचकवर्ग, कर्मचारी तसेच इतर साधनसामग्री अशा विविधांगांनी सतत वर्धिष्णू असते, हे आपल्या लक्षात येऊ शकेल.