पाइक (मासा)
पाईक हे मासे एसॉसिडी मत्स्यकुलातील असून त्यांच्या कित्येक जाती आहेत. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव एसॉक्स ल्यूसिअस असे आहे. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतील नद्या व सरोवरे यांत आढळतात.
शरीररचना
पाइक याचे शरीर लांबट, दोन्ही बाजूंनी दबलेले असून हिरवट तपकिरी वा हिरवट करड्या रंगाचे असते व त्यावर फिक्कट रंगाचे ठिपके असतात. पक्षांवर (परांवर) काळे डाग असतात. शरीर लहान खवल्यांनी झाकलेले असते. डोके लांब, मुस्कट कलथ्याच्या अथवा चमच्याच्या आकाराचे आणि तोंड पुष्कळ मोठे असते. जबड्यांमध्ये मजबूत व लांब दात असतात आणि टाळू व जीभ यांवर लहान दातांचे पट्टे असतात. दात मागे वळलेले असल्यामुळे भक्ष्य बाहेरून तोंडात सहज जाऊ शकते; परंतु सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) आणि गुदपक्ष बरेच मागे शेपटावर असतात, त्यामुळे हा फार वेगाने पोहू शकतो.
आहार
गोड्या पाण्यातील माशांमध्ये पाइक हे अत्यंत खादाड आहेत. लहान मासे, कीटक आणि जलचर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी यांवर ते उदरनिर्वाह करतात. मोठे पाइक चिचुंदऱ्या आणि पाणकोंबड्या पकडून खातात; ते कोल्हे आणि लहान कुत्रे यांवर देखील हल्ला करतात असे म्हणतात.