पांडुरंग पाटणकर
पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत.
पाटणकर यांनी दुर्गभ्रमंतीपासून ते विदेशीभ्रमंतीपर्यंत मार्गदर्शन करणारी १८ पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक दैनिकांतून पर्यटनावर एक हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. पाटणकरांच्या वाङ्मयात सह्याद्री आणि हिमालय यांपासून गल्फ प्रदेश, युरोप, आल्प्स, इ.च्या पर्यटनविषयक पुस्तके आणि लेख आहेत. त्यांच्या वडिलांची पोस्टातील फिरतीची नोकरी होती. यानिमित्ताने अनेक ठिकाणी राहिलेल्या पाटणकरांनी त्या प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक माहिती तसेच गड, कोट, किल्ले यांची निरीक्षणे करून लेखन सुरू केले. पाटणकरांनी आपले आजोळ असलेल्या नेरळबद्दलचा लेख सुरुवातीस लिहिला. त्यांचा व्यवसाय आणि नोकरीही पर्यटनाला उपयोगी पडणारी होती.
पाटणकरांनी तामिळनाडूमधील महाबलीपुरम बद्दल विशेष लेख लिहिला आहे. महाबलीपुरम येथील बहुतेक शिल्पे ही एकाश्म दगडातील आहेत म्हणजे एकाच दगडात शेकडो मूर्ती कोरलेल्या असतात. महाबलीपुरम् ही मूर्तिनिर्माण, मंदिरनिर्माण आणि शिल्पनिर्मिती यांची काशी समजली जाते. हजारो वर्षांपूर्वींची ही कला तेथे अद्ययावत पद्धतीने जोपासली जाते. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांचे शिलास्मारक आणि तेथेच शेजारी असणारा तिरुवलूवरचा पुतळा ही महाबलीपुरम् येथील स्थापत्यशास्त्राची निर्मिती आहे. बारा वर्षांपूर्वीच्या त्सुनामी लाटेत पूर्वेकडील एक हजार किमी लांबीच्या किनाऱ्यावरील एकही वास्तू वाचली नाही पण आत समुद्रात असणाऱ्या या वास्तू मात्र वाचल्या.
पाटणकरांच्या पर्यटनात अष्टविनायकासारखी धार्मिक पर्यटने, एक दिवसाची आजूबाजूच्या ठिकाणांची पर्यटने, ट्रेकिंग, चाकोरीबाहेरील पर्यटने, अभ्यास पर्यटने, हिमालय पर्यटने व आखाती देशातील पर्यटने यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील औंध येथील भूषणगड येथे झालेली फजितीही त्यांनी लिहिली आहे. तेथे पोहोचविण्यास आलेली एसटी पुरेसे प्रवासी मिळत नाहीत, हे बघितल्यावर वेळेआधीच निघून गेली. भंडारदऱ्याजवळचा रतनगड हा कसा रत्नगड आहे, हे पाटणकरांनी विषद केले आहे. २०१७ च्या सुमारास वयाच्या सत्तरीत असतानाही ते पर्यटन करीत असतात.
पांडुरंग पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके
- चला ओडिशाला
- चला दक्षिण भारताच्या सहलीला
- चला दुबईला - संयुक्त अरब अमिरातींच्या देशाला
- चला मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सहलीला
- साद मराठवाड्यातील किल्ल्यांची
पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दि.बा. मोकाशी पुरस्कार
- महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा कमलाबाई घाणेकर पुरस्कार
- स्नेहल प्रकाशनाचा अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्नेहांजली पुरस्कार