पर्जन्यवृक्ष
पर्जन्यवृक्ष | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||
सामनिया सामन |
पर्जन्यवृक्ष हा एक गुलाबी फुलांचा विशाल वृक्ष आहे. यालाच रेन ट्री किंवा विलायती शिरीष असे म्हणतात. वर्षावृक्ष, खोटा शिरीष ही त्याची आणखी काही नावे आहेत. या झाडाची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. हा वृक्ष वर्षभर हिरवा दिसतो. ह्या झाडावर सिकाडा नावाच्या किड्यांचा अधिवास असतो. त्या किड्यांच्या शरीरातील पाणी झाडाची पाने हलल्यावर खाली पडते. झाडाखालील जमीनही ओलसर आढळून येते.[१] पर्जन्यवृक्ष हे नाव त्यावरूनच आलेले आहे.[२]
पर्जन्यवृक्ष हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील[३] म्हणजे ब्राझील, पेरू, मेक्सिको ह्या उष्णकटिबंधीय देशातील. पण आता भारतात उष्ण हवामानाच्या प्रदेशात सर्वत्र आढळणारा आणि झपाट्याने वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष विशिष्ट उंचीपर्यंत सरळ वाढतो, मात्र त्यानंतर ह्याच्या फांद्या छत्रीसारख्या पसरतात. पसरलेल्या फांद्यांवरील छत्रीसारख्या पर्णसंभारामुळे हा वृक्ष डौलदार व शोभिवंत दिसतो. दाट पानांमुळे त्याची सावलीही दाट असते. त्यामुळे मोठ्या रस्त्यात दुतर्फा आणि सार्वजनिक उद्यानांत हा लावला जातो. पूर्ण वाढलेला हा वृक्ष साधारण २५ मीटर उंच आणि ३० मीटर व्यास इतका पसरू शकतो. हा वृक्ष खूपच विशाल होत असल्यामुळे घराच्या आसपास किंवा आवारात लावला जात नाही.[४]
पर्जन्यवृक्षाचे खोड खडबडीत आणि गर्द करड्या रंगाचे असते. तळाशी खूपच मोठ्या असलेल्या खोडाला वर गेल्यावर अनेक फांद्या फुटतात आणि अशा फांद्यांचेही खोड जाड असते. झाडाची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत तर वरवरच पसरलेली आढळतात.[३]
पर्जन्यवृक्षाची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त (bipinnate) प्रकारची असतात. पर्णिका गडद हिरव्या रंगाच्या असून त्यांच्या ४ ते ८ जोड्या असतात. त्यावर ३ ते ७ उपपर्णिकांच्या जोड्या असतात. उपपर्णिकांचा आकार लंबगोलाकार असतो. चांगल्या सूर्यप्रकाशात पर्णिका पूर्ण विस्तारलेल्या असतात. पण उन्ह कमी झाल्यावर तसेच रात्री त्या मिटून खाली झुकतात. वर्षाऋतूतही प्रकाश पुरेसा नसल्यास पर्णिका मिटून खाली झुकतात.[१]
पर्जन्यवृक्षाला उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते एप्रिल आणि शरद ऋतू संपताना म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बहर येतो आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाची गोंड्यासारखी असंख्य फुले दिसू लागतात. झाडावर दिसणारी कळी म्हणजे प्रत्यक्षात फारच लहान लहान कळ्यांचा समूह असतो तद्वतच दिसणारे फुलही लहान लहान फुलांचा समूह असतो. फुलाचा देठ नलिकाकृती आणि रंग फिकट हिरवा तर पाकळ्या गुलाबी असतात. त्यातून बाहेर आलेले सूक्ष्म आणि नाजूक तंतूसारखे लांब असंख्य पुंकेसर लक्ष वेधून घेतात. हे पुंकेसर तळाकडे पांढरे तर वरील बाजूस गुलाबी असे दुरंगी असतात. बहराच्या काळात सुकलेल्या पुंकेसरांचा सडा झाडाखाली पडलेला दिसतो.
फुले येऊन गेल्यावर त्या जागी पर्जन्यवृक्षाला शेंगा येतात. शेंगा साधारण १५ ते २० सेंमी लांब आणि दोन सें मी रुंद असतात. त्यांचा रंग गडद तपकिरी असतो. शेंगात चिकट, गोड गर आणि कठीण चकचकीत बिया असतात. अनेक प्राणी विशेषतः खारी शेंगा आवडीने खातात.[३] अशा अनेक चिकट शेंगा झाडाखालील रस्त्यावर पडलेल्या आढळतात. रस्ता डांबरी किंवा सिमेंटचा असल्यास अशा शेंगांवरून वाहने गेल्यास शेंगा रस्त्याला चिकटतात. पावसाळ्यात ह्याच्या बिया सहज रुजतात. छाट कलमाद्वारे फांद्या लावूनही ह्या झाडाचे संवर्धन करता येते.
चित्रदालन
- भव्य पर्जन्यवृक्ष
- पर्जन्यवृक्षाचा विस्तार
- पर्जन्यवृक्षाच्या कळ्या, फुले व पुंकेसर
- पर्जन्यवृक्षाचा बहर
- पर्जन्यवृक्षाची मिटलेली पाने
- पर्जन्यवृक्षाच्या शेंगा
संदर्भ
- ^ a b फुलझाडे - एम एस रंधावा अनु - व्यंकटेश वकील. New Delhi: National Book Trust, India. 2004. p. 137. ISBN 81-237-3640-1.
- ^ Field Guide to the common trees of india - P V Bole, Yogini Vaghani. Mumbai: Oxford University Press. 1986. p. 93.
- ^ a b c प्रमुख भारतीय वृक्ष - पिप्पा मुखर्जी अनु - शैलजा ग्रब. Mumbai: Oxford University Press. 1993. p. 51.
- ^ फुलझाडे - एम एस रंधावा अनु - व्यंकटेश वकील. New Delhi: National Book Trust, India. 2004. p. 139. ISBN 81-237-3640-1.