परेश प्रभू
परेश प्रभू
दैनिक नवप्रभा (पणजी - गोवा)चे संपादक. गोव्यातील एक तरुण संपादक. दैनिक नवप्रभा ह्या गोव्यातील जुन्या प्रतिष्ठित दैनिकाचे ते गेली १५ वर्षे संपादक आहेत. गोमन्तक, गोवादूत आदी दैनिकांमधील विविध पदांचा त्याना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित आहेत. गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा संपूर्ण इतिहास त्यांनी पुस्तकरूपाने लिहिला आहे. बा भ बोरकर यांना मान्यवर साहित्यिकांनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह त्यांनी बाकी संचित या नावाने, तर कविवर्य शंकर रामाणी यांचा पत्रसंग्रह एकट्याचे गाणे या नावाने संपादित केला आहे. कै गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य, मी नाटकवाला हे पं प्रसाद सावकार यांच्या नाट्यजीवनाच्या आठवणींचे संपादन, प्रभुदेव हे पं प्रभुदेव सरदार यांच्यावरील पुस्तक, नन्दादीप या दा अ कारे यांच्या काव्यसंग्रहाच्या नव्या आवृत्तीचे संपादन. भारत कार हेगडे देसाई यांच्या अग्रलेखांच्या दुसऱ्या खंडाचे संयुक्त संपादन, गोमंतकीय मराठी पत्रकारिता आणि भारतकारांचा वारसा, सोन्याचा पिंपळ या गोपाळराव मयेकर सद्भाव ग्रंथाचे संपादन अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. साहित्य आणि पत्रकारितेतील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. महाराष्ट्र सरकारचा सयाजीराव गायकवाड पुरस्कार / सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा रा. अ. कुंभोजकर विशेष ग्रंथकार पुरस्कार यांचाही त्यात समावेश आहे.