परिसा भागवत
संत परिसा भागवत हे संत नामदेवांचे प्रथम शिष्य म्हणून परिसा भागवतांना वारकरी संप्रदायामध्ये मान दिला जातो. पंढरपुरात नामदेवांच्या जवळ राहणाच्या परिसा भागवातांनी श्रीरुक्मिणी देवीचे मोठे अनुष्ठान केल्यामुळे, आराधना केल्याने श्रीरुक्मिणीदेवी त्यांना प्रसन्न झाली होती. प्रसन्न होऊन देवीने कोणताही वर माग, असे सांगितले. “माझे चित्त तुझ्याभजनी निरंतर रत असावे व माझा संसार सुखाने चालावा.” रुक्मिणी देवीकडे परीसाने वर मागून घेतला.
अशी प्रचलित कथा नामदेव-परिसा यांच्या संवादातून आली आहे. यासाठी देवीने त्यांना परीस दिला, परिसा भागवतांनी परीस आपली पत्नी ‘कमलजा’ हिच्याकडे काळजीपूर्वक दिला. तेव्हापासून परिसा भागवतास अहंकार झाला. परंतु पुढे संत नामदेवांच्या संयमी शांत स्वभावामुळे, परिसांचा अहंकार गळून पडला, व ते नामदेवाचे भक्त बनले.
संत नामदेवांच्या सहवासात राहून भजन कीर्तन करीत राहिले. परिसा भागवत हे उच्च मानल्या गेलेल्या ब्राह्मण समाजातील, तर नामदेव हे शिंपी. एका ब्राह्मणाने एका शिंप्याकडून शिष्यत्व पत्करावे, याचे आश्वर्य तत्कालीन समाजाला वाटणे साहजिकच होते. समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था चौकटबद्ध स्वरूपात होती; कर्मठ वृत्ती ग्रंथप्रामाण्य मोठ्या स्वरूपात होते. अर्थात परिसाला निजबोध झाला होता. एका अलौकिक अनुभवाने त्यांनी संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारले. परिसा म्हणतात,
“तू शिंपी न माना। आम्ही उत्तम याती। वाया अहंमती पडलो देखा॥”
उच्च जातीमध्ये जन्मल्याने अहंकार वाढला, हे परिसाने कबूल केले. यातच परिसा भागवताची विनम्र वृत्ती लक्षात येते.
संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारण्यास नामदेवांचे परमतसहिण्णुतेने भारावलेले व्यक्तिमत्त्व कारणीभूत ठरते. नामदेवांसारख्या प्रभावी व प्रतिभास व्यक्तिमत्त्वाच्या व संगतीत, सोबतीत असणाऱ्या परिसा भागवताने नामदेवांचे अनुयायित्व सहज स्वीकारले. ज्ञानेदव-नामदेवांच्या लोकविलक्षण स्वभावाचा व वागण्याचा प्रभाव पडला. त्यांच्या समकालीन संतांच्या मनावर समतेतून वैचारिक प्रगल्भतेचा खूप मोठा परिणाम झालेला दिसतो.
नामदेवकालीन अनेक संतांना तसे स्वतंत्र अस्तित्व दिसत नाही. त्यांच्या आचार विचारांवर, सामाजिक जीवन जगण्यावर नामदेवांचे सखोल संस्कार झालेले दिसतात, ज्ञानदेव-नामदेवांच्या सहवासात, सान्निध्यात त्यांचे जीवनादर्श स्वीकारण्यात, अनेक बहुजन समाजातील संत स्वतःचे अंतर्बाह्य जीवन घडविण्यात अतिशय आनंदाने संगत, सोबत करीत होते.
संत परिसा भागवतांचे पूर्वायुष्य अतिशय प्रखर अहंकारात गेले; पण नामदेवांच्या सहज संवादात आल्यानंतर मनाची पवित्रता, विचाराची नम्रता आचरणात आली. समतेचा सहजभाव, भक्तीच्या माध्यमातून जन्माला आला आणि वाळवंटी नामदेव कीर्तनासाठी हाती टाळ घेऊन रामकृष्णहरी म्हणण्यासाठी उभे राहिले.[१]
समकालीन संत व परिसा भागवत
श्रीज्ञानदेव-नामदेव यांच्या काळातच परिसा भागवतांचे आयुष्य वारकरी संप्रदायात प्रवाहित झाले. त्यांच्या जीवनाच्या उत्तरायुष्यात त्यांना संत नामदेवांचा सहवास लाभला. समकालीन कोणत्याही संतांनी परिसा भागवतांचा आपल्या अभंगात उल्लेख केलेला सापडत नाही; परंतु नामदेवांच्या सोबत चार प्रदीर्घ अभंगात संत नामदेव-परिसा भागवत यांचे संवाद दिलेले आहेत. परिसा भागवतांचा गर्वपरिहार, परिसा भागवतांनी केलेली नामदेवस्तुती, एकूण श्री संत ज्ञानदेव, चांगदेव याशिवाय इतर संतांच्या संदर्भात परिसा भागवतांनी अभंग
रचनेतून नामनिर्देश केला. श्रीज्ञानदेव, चांगदेव व नामदेव यांच्या संदर्भात अपरंपार आदराची भावना परिसांनी व्यक्त केली आहे.
“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव। भक्ती चांगदेव पुढारले॥
या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती। यांची काही भांती न घरावी।।
परिसा म्हणे जैसी सरिता सागरी। ते ते श्रीहरी मिळोनि गेले॥”
ज्ञानात, चिंतनात आणि भक्तीत श्रेष्ठ असणाऱ्या तीनही संतांना ईश्वराची एकच रूपे आहेत, अशी भक्तिमय श्रेष्ठ भावना संत परिसा भागवतांनी समकालीन संतांच्या संदर्भात विनम्रपणे व्यक्त केली. वारकरी संप्रदायाचे योग-मार्गातील. भान आणि ध्यान यांचे अद्वैत तत्त्व परिसांनी ज्ञानदेव, नामदेव व चांगदेव या तीनही संतांच्या संदर्भात सांगितले आहे. तीनही संतांचे दर्शन त्यांनी अंतर्मनाने घेतले.
अलंकापुरीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या वेळी परिसा भागवत समकालीन संतांच्या मांदियाळीत उपस्थित होते. संत नामदेवांच्या अभंगात (अ० 20 १०९८, १०९९) समाधीसोहळ्याच्या प्रसंगी कोणकोण संत उपस्थित होते. याचा उल्लेख आहे. नामदेवांची मुले, चांगा वटेश्वर, विसोबा खेचर, सांवता माळी, गोरा कुंभार इत्यादी संत होते. या सर्वांसमवेत ‘नामा तळमळी मत्सा ऐसे।’ अशी नामदेवांची अवस्था संजीवन समाधीच्या वेळी झाली होती. नामदेवांचा पहिला शिष्य परिसांबद्दल समाधी प्रसंगी नामदेव म्हणतात.
“परिसा भागवताने केला नमस्कार। सारे लहान थोर जमा झाले॥”
या वेळी संतांचा मोठा समुदाय अतिशय व्याकूळ अवस्थेमध्ये समाधीप्रसंगी उपस्थित होता. यामध्ये नामदेव शिष्य परिसाही उपस्थित होते. याचा संदर्भ नामदेव वरीलप्रमाणे देतात.
जीवनकाल
मध्ययुगीन काळातील दस्तऐवजामध्ये किंवा इतिहासामध्ये संत परिसा भागवत यांचा जन्म व निर्वाणकाळाचा उल्लेख कोठेही सापडत नाही. ते पंढरपूर येथील असल्याने त्यांचे जन्म ठिकाण पंढरपूरच असावे. त्यांचा ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता. तत्कालीन समाजाच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे ते ब्राह्मण कुटुंबासारख्या उच्चवर्णात जन्माला आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजात प्रतिष्ठा असावी. वेद, उपनिषदांचा व इतरही धर्मग्रंथांचा त्यांचा सखोल अभ्यास असावा. कारण तत्कालीन समाजाला ते अभ्यासपूर्ण भागवत कथा सांगत होते. त्याची विद्वत्ता व ब्राह्मण्य त्यांच्या एका चमत्कार कथेवरून स्पष्ट होते.
परिसा अन्वयार्थ- पंढरपूरच्या श्रीरुक्मिणी देवीचे परिसा भागवत हे। निःसीम उपासक होते. या उपासनेतून देवी त्यांना प्रसन्न झाली. देवीने त्यांना वर । दिला. काय हवे ते भक्ताला मागावयास सांगितले, सुखाने संसार चालावा म्हणून देवीकडे ‘परीस’ मागितला.
“परिस गेऊन लोहासी लावुनि।
सुवर्ण ते करी। सुखेश संसार रहातसे॥”
हे पंढरीच्या सर्व समाजाला माहीत होते. परिसा भागवत एक विद्वत्ता असणारा ब्राह्मण असल्याने ते पंढरीवासीयांना ‘भागवत’ सांगत होते. कदाचित परिमा म्हणजे ‘ऐका या शब्दावरून ‘भागवत ऐका असे म्हणत. म्हणून त्यांना पंढरीतील सर्व जण ‘परिसा भागवत’ संबोधू लागले किंवा काही विद्वान संशोधकांच्या मते श्रीरुक्मिणी देवीने त्यांना ‘परीस’ दिल्यामुळे भागवत सांगणाऱ्या ब्राह्मणाचे नाव परिसा भागवत’, असे प्रचलित झाले असावे.
संत परिसा भागवत –परिसाचा अहंकार
परिसा भागवत व संत नामदेव यांच्यामध्ये आलेल्या (अभंगरचना) संवादा मधून असे दिसते की, परिसा भागवतांचा अहंकार प्रचंड उफाळून आला. मंदिरामध्ये परिसा भागवत पुराण सांगत होते, त्यात लंकेचा उल्लेख आला, नामदेवांनी परिसाला लंका कशी आहे, असे विचारले, परिसाने शास्त्रात पाहून सांगतो असे म्हणले. परिसाने श्रीरुक्मिणीचे ध्यान केले; देवी समोर येताच नामदेव माझा अपमान करतो, परिसाने लंका पाहण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमृक्मिणी देवीने आपल्या सामान परिसास लंका दाखविली. लंकेत फिरताना विभीषणाच्या सदनी परिसा आला. त्याला मनापासून आनंद झाला. परिसाला प्रत्यक्ष नामदेव सदनासमोर कीर्तन करताना दिसले.
सांगा कैसी आहे लंकेची रचना। कोण-कोणत्या स्थानी राहताती।
बाबा तेचि सांगा मजलागी खूण। बोलत प्रमाण नामा त्यासी।
दोघांचा संवाद होता महाद्वारी। विस्मय अंतरी करिती संत।
परसोबा सांगत रुक्मिणी। हातावरी दाविली नगरी बिभिषणाची।
पाहूनिया लंका आनंदला मनी। पाहतो तो नामा उभा कीर्तनासी।
गुणगान असे देवाजिचे।