परामर्श (मराठी नियतकालिक)
परामर्श (आयएसएसएन:ISSN 2320-4478) हे एक मराठी त्रैमासिक आहे. याची स्थापना डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांनी इ.स. १९७७मध्ये केली. या त्रैमासिकाचे आधीचे नाव 'तत्त्वज्ञान मंदिर' असे होते. नाव बदलण्यापूरवी ते पुणे विद्यापीठाचा तत्त्वज्ञान विभाग व अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र यांचे संयुक्त प्रकाशन होते. या नियतकालिकात तत्त्वज्ञानाशी संबंधित अशा कोणत्याही स्वरूपाच्या लिखाण असते. त्रैमासिकात योगदान देणाऱ्या लेखकांना लेखनस्वातंत्र्य असून त्यांचे संपादकाशी एकमत असणे आवश्यक नाही, असे सांगितले जाते.[१]
पहिला अंक
त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात महाराष्ट्राचे तत्कालीन गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. आय आय. टी. कानपूर येथील तत्त्वज्ञानाचे सिनिअर प्रोफेसर डॉ. राजेंद्र प्रसाद हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. अमळनेरचे महापौर श्री. देसराज अगरवाल, सौ. सुधा वर्दे (समाजवादी कार्यकर्त्या) व डॉ. सुरेंद्र बारलिंगे (परामर्शचे संपादक) प्रकाशन समारंभाला उपस्थित होते. कार्यकारी संपादक म्हणून डॉ. शरद देशपांडे त्रैमासिकाच्या उद्दिष्टाबद्दल बोलले. 'परामर्श'चे प्रकाशन अमळनेर येथे करण्याचा निर्णय सुरेंद्र बारलिंगे यांनी घेतला होता. अमळनेरचे श्रीमंत प्रताप शेठ यांनी स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलोसॉफीतर्फे "तत्त्वज्ञान मंदिर" या नावाचे मराठी आणि हिंदी या भाषांतून प्रसिद्ध होणारे त्रैमासिक बंद पडले होते. त्यानिमित्त तत्त्वज्ञान विषयक हे नवे त्रैमासिक सुरू केल्याची माहिती डॉ. शरद देशपांडे यांनी दिली.
पहिला अंक एप्रिल-जुलै १९७९ला प्रसिद्ध झाला. (खंड १ अंक १-२, संपादक - सुरेंद्र शिवदास बारलिंगे, कायर्कारी संपादक - शरद देशपांडे व शंकर रामचंद्र तळघट्टी). या अंकात प्रसिद्ध भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांचा प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा, अरविंद देशपांडे यांचा इतिहास लेखन व ललित साहित्य, संपादक बारलिंगे यांचा कर्म, कर्मबंध आणि मोक्ष आणि यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचा भामतीप्रकाश भाग १, हे लेख आहेत. प्रारंभी त्रैमासिकाला 'परामर्श' हे नाव ठेवण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली.[२]
प्रकाशन
- प्रकाशक : तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ)
- प्रकाशन काल : त्रैमासिक – जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर.
- स्थापना : १९७९
- संस्थापक संपादक : प्रा. डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे
- वर्गणीचे दर (रु.) : त्रैमासिक : व्यक्ति-३००, संस्था-४००; सभसदांची संख्या -वार्षिक : व्यक्ति-१२५, संस्था-१५०.
विद्यमान संपादक मंडळ रचना
- मुख्य संपादक: डॉ. सदानंद मोरे, माजी विभाग प्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
- कायर्कारी संपादक: डॉ. लता छत्रे, विभाग प्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
- संपादकीय सहाय्यकः सुनील राऊत.
'परामर्श'ची प्रकाशने
- परम लघुमंजूषा (दोन भाग) – पं. वा.बा. भागवत मूल्य – प्रत्येकी रु. २५/- (व्याकरणकार नागोजीभट्ट यांच्या "परमलघुमंजूषा" या ग्रंथाचा सटीप अनुवाद)
- चार्वाकमंथन : संपादन व अनुवाद – उदय कुमठेकर मूल्य रु. १२०/- ("लोकायत" या प्रा. देवीप्रसाद यांच्या ग्रंथातील निवडक निबंध)
- आचार्य सिद्धसेन दिवाकर प्रणीत "न्यायावतार" : अनुवाद व स्पष्टीकरण – प्रा. के. वा. आपटे, मूल्य रु. २५/-
- प्रो. जी. ई. मूर : व्यक्ती व तत्त्वज्ञान – वामन शिवदास बारलिंगे मूल्य – रु. ४०/-
'परामर्श'चे निवडक विशेषांक
- मार्क्स आणि भारतीय विचारवंत (१) मे १९८५ खंड ७, अंक १
- विज्ञानाचे तत्त्वज्ञान (१)- ऑगस्ट १९८६, खंड ८, अंक २
- ए. जे. एर यांचे तत्त्वज्ञान मे १९९० खंड १२ : अंक १
- नीतिविमर्श - कै. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक - मे-जुलै २००२ खंड २४, अंक १
- विट्गेन्स्टाइनचे तत्त्वज्ञान - नोव्हेंबर - जानेवारी २००२-०३
- इमान्युएल कांण्ट नोव्हेंबर २००३ ते एप्रिल २००४ खंड २५ अंक ३
- मूर, रसेल, फ्रेगे - प्रा. दि.य. देशपांडे, फेब्रुवारी-एप्रिल २००६ ,खंड २७ : अंक ४
एका क्लिकवर घ्या ‘परामर्श’
तत्त्वज्ञान विभागातर्फे 'परामर्श' हे मराठी आणि हिंदी भाषांतून, तर इंग्रजीतून 'इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली' अशी तीन त्रैमासिके प्रकाशित करण्यात येतात. तत्त्वज्ञान विषयक साहित्यामध्ये या त्रैमासिकांना महत्त्वाचे स्थान आहे. १९७९ ते २००६ या कालावधीतील अंक डिजिटालाइज करून पीडीएफ स्वरूपात विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. गेली दोन वर्षे ही डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू होती. या त्रैमासिकांच्या जगभरातील सदस्यांकडून मिळालेले शुल्क आणि विद्यापीठाकडून मिळालेला निधीचा वापर करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पात मराठी आणि इंग्रजी त्रैमासिकाचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. २००६ नंतरचे अंक ऑनलाइन आणण्यासाठी आता दर पाच वर्षांनी ही डिजिटलायझेशनची प्रक्रिया करण्यात येणार आहे.[३] सर्व अंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिकृत संकेतस्थळ
www.unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/Cover03.html'परामर्श' मराठी
संदर्भ
- ^ "प्रस्तावना". unipune.ac.in. 2018-03-21 रोजी पाहिले.
- ^ "Field Works : Department of Philosophy, University of Pune". www.unipune.ac.in. 2018-03-21 रोजी पाहिले.
- ^ "एका क्लिकवर घ्या 'परामर्श' -Maharashtra Times". Maharashtra Times. 2014-03-10. 2018-03-21 रोजी पाहिले.[permanent dead link]