Jump to content

परशुराम मंदिर

परशुराम मंदिर

प्रास्ताविक

भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवांची मंंदिरे आहेत. विशेषतः परमेश्वराने घेतलेल्या दहा अवताराची मंदिरे वेगवेगळ्या विशिष्ट भागात बांधलेली आहेत.विष्णूचा सहावा अवतार भार्गवराम म्हणजेच परशुरामाचे असेच एक मंदिर कोकणात आहे.

भौगोलिक स्थान

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोटे औद्योगिक भागात डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने परशुराम मंदिराकडे जाता येते. चिपळूण शहरातूनसुद्धा रिक्षाने मंदिराकडे जाता येते. चिपळूण शहराच्या अलीकडे दहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

इतिहास

पूर्वी कोकणभूमी ही परशुरामभूमी म्हणून नावाजलेली होती. सतराव्या शतकातील कागदपत्रांतून या मंदिराची जीर्ण अवस्था होती.मंदिराचा जीर्णोद्धार ब्रह्मेंद्रस्वामी यांनी इसवी सन १६९८ ते १७२० दरम्यान केला. त्यांचा जन्म वऱ्हाडातील राजुरी नजीकच्या दुधेवाडीला इसवी सन १६४९ मध्ये झाला होता. त्याकाळी चिपळूण बंदर जंजिऱ्याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होते. ब्रह्मेंद्रस्वामीवर सिद्दिक कासीम आणि सिद्दी याकूद (सिद्दी सुरूर) यांची श्रद्धा होती. इसवी सन १७०८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामींनी सिद्दीकडून पेढे व आंबडस या दोन गांवाच्या सनदा प्राप्त केल्या. आंबडस हे गाव अर्धे सिद्दीच्या आणि अर्धे छत्रपती शाहूंच्या ताब्यात होते. इसवी सन १७२० मध्ये शाहू महाराजांच्या मुद्रेनिशी आंबडस,डोरले व महाळुंगे तर्फे पावस ही गावे परशुराम मंदिरासाठी इनाम मिळाली. खेड तालुक्यातील महिपतगडावरून बांधकामासाठी चुना आणला होता. परशुराम मंदिराचे देवालय, सभामंडप, रेणुका मंदिर, गणपती मंदिर धर्मशाळा, पोंवळी आणि सुंदर सुबक दीपमाळांचे बांधकाम केले.जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिरात धार्मिक सण-उत्सव साजरे होत असत. ब्रह्मेंद्रस्वामी दरवर्षी श्रावण महिन्यात समाधीस्त होऊन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला समाधी समाप्त करीत असत. समाधीसमाप्तीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येत असे. सरखेल कान्होजी आंग्रे आणि जंजिऱ्याचा सिद्धी हे दोघेही स्वामींचे भक्त होते आणि एकमेकांचे कट्टर वैरी असूनसुद्धा उत्सवात एकत्र उपस्थित असत.आंग्रे यांच्याकडील दोन तीनशे बर्कंदाज आणि सिद्दी यांचे शिपाई स्वामींना बंदुकीची सलामी देत असत. इसवी सन १७२६ मध्ये सिद्दी याकूदखानचा गोवळकोटचा सुभेदार सिद्दी सात आणि कान्होजी यांच्यात स्वामींना दिलेल्या एका हत्तींच्या जकातीवरून वाद झाल्यानंतर सिद्दी सातने शिवरात्रीच्या दिवशी परशुराम देवस्थानावर ३०० माणसे पाठवून हल्ला केला आणि देवस्थानाचा विध्वंस केला. नंतर ब्रम्हेंद्रस्वामींनी हा वाद मिटविला आणि मंदिराची दुरूस्ती केली.

मंदिर स्थापत्य शैली

मंदिराच्या बांधकामासाठी काळा (बेसाॅल्ट), जांभा (लॅटराइट) दगड आणि चुना यांचा वापर केलेला आहे. मंदिराभोवताली जांभ्या दगडांची पोंवळी ( संरक्षक भिंत) आहे. पोंवळीत प्रवेश करताक्षणीच नगारखाना दृष्टीस पडतो. मंदिराच्या आवारात जांभ्या दगडाची फरसबंदी केलेली आहे. मंदिराला दोन सभामंडप आणि गाभारा असे स्वरूप दिलेले आहे. गाभाऱ्यावरील घुमटाच्या अष्टकोनी तलविन्यास असून त्यावर वृत्तगोल कळस आहे,तर सभामंडपावर आयताकृती तलविन्यास असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण महिरपी वृत्त-घुमट केलेले आहेत.छतावर दर्शनी बाजूस कोपऱ्यावर सिंहांचे युग्मशिल्प बनविले आहे.मंदिर उत्तराभिमुख आहे. दारातच दक्षिणमुखी मारूतीचे छोटे मंदिर आहे. मारूती मंदिराच्या शेजारी धातूची गरूड मूर्ती स्थापन केलेली आहे. गाभाऱ्यात काम, परशुराम आणि काळ अशा तीन चतुर्भुज मूर्ती आहेत. परशुरामाच्या हातात धनुष्य-बाण,परशु अशी आयुधे आहेत. कामदेवतेच्या हातात दंड व कमंडलू आहे,तर काळदेवता परशु व मृग धारण केलेली आहे. मंदिरातील प्राचीन मूर्ती बदलून २५ एप्रिल १९९३ रोजी नव्या मूर्ती बसविलेल्या आहेत. मूळ मूर्ती विश्वस्त समितीने जतन करून ठेवल्या आहेत. मूर्तींच्या मागे सोनेरी प्रभावळ आहे. गाभाऱ्याजवळ एका शेजमंदिरात सुबक कलाकुसर केलेला लाकडी पलंग आहे. पलंगावर परशुरामाच्या पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील प्रांगणात उजव्या सिद्धिविनायकाचे मंदिर बांधलेले आहे. त्यामध्ये उजव्या सोंडेची संगमरवरी गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस परशुरामाची आई रेणुका मातेचे मंदिर आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. हातात गदा, डमरू, पात्र आणि सहस्त्रार्जुनाचे शीर आहे रेणुकामंदिराच्या दर्शनी भागात आकर्षक नक्षीचे दगडी खांब आहेत.रेणुका मंदिराच्या गणेशपट्टी वर देवनागरी लिपी मध्ये एक शिलालेख आहे. रेणुकामंदिर व परशुराम मंदिर यांच्या मध्ये आयताकृती बाणगंगा कुंड आहे. कुंडाच्या पलीकडे गंगामातेचे मंदिर आहे.परशुराम मंदिराच्या आवारात एकूण पाच दीपमाळा आहेत. त्यापैकी चार जांभ्या दगडाच्या असून मुख्य मंदिराजवळची दीपमाळ काळ्या दगडापासून बनविलेली आहे. नेऋत्य कोपऱ्यात ब्रम्हेंद्रस्वामींचे स्मृतिकेंद्र आहे. परशुराम मंदिराच्या परिसरात वरील बाजूस नवीन दत्त मंदिर बांधलेले आहे. तेथे पेशवेकालीन विहीर आहे. या मंदिराजवळ कुंड आणि गुहा आहे. दत्त मंदिराकडे जाताना ग्रामदेवता धावजीदेवाचे मंदिर आहे. परशुराम मंदिराच्या जवळच ग्रामदेवी जाखमातेचे ( जागणारा) मंदिर आहे. त्याच्याजवळ पाण्याचा झरा असलेले टाके आहे.मंदिरावर चार मिनार आहेत.

संदर्भ

महाराष्ट्र टाईम्स, शनिवार,१४ ऑगस्ट २०२१.