परवर
आधारावर चढून वाढणाऱ्या या वनस्पतीची अपक्व फळे भाजीसाठी वापरतात. हिची सामान्य लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फुले विभक्तलिंगी (नर व मादी फुले निरनिराळ्या झाडांवर) असून नर फुले मादी फुलांपेक्षा मोठी व देठ लांब असतो. मादी फुले टोकाला फुगीर असतात. पाने आणि कोवळे देठ सार करण्यासाठी वापरतात. खोडाचा काढा कफ सुटून येण्यासाठी देतात. भाजी पाचक, सारक, मूत्रल (लघवी साफ करणारी), हृ़दय व मेंदू उत्तेजित करणारी आणि रुधिराभिसरणाच्या तक्रारींवर उपयुक्त आहे, असे मानतात.
उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू व केरळ या राज्यांत या पिकाची लागवड केली जाते.
दमट व उष्ण हवामान आणि भरपूर पाऊस असल्यास हे पीक चांगले येते. भारताच्या ईशान्येकडील भागात ते उन्हाळी पीक असून उत्तर प्रदेशाचा पश्चिमेकडील भाग, दिल्ली व पंजाबात ते पावसाळी हंगामातील पीक आहे. पीक जमिनीतच ठेवल्यास हिवाळ्यात जमिनीवरचा भाग वाढतो व मुळे सुप्तावस्थेत राहतात. हिवाळा संपल्यावर नवीन कोंब फुटून येतात.
फार भारी जमीन वगळल्यास चांगल्या निचऱ्याच्या कोणत्याही जमिनीत हे पीक येते. बिहारमध्ये पुराच्या पाण्याने वाहून आलेला गाळ असलेली जमीन या पिकासाठी पसंत करतात.
या पिकाचे सुधारित प्रकार उपलब्ध नाहीत परंतु निरनिराळ्या भागांत आकर्षक फळांचे चांगले प्रकार आढळून येतात. लहान व गोलपासून लांब व दोन्ही टोकांकडे निमुळती फिकट रंगापासून गडद हिरव्या रंगाची पट्टे असलेली आणि पट्टे नसलेली फळे निरनिराळ्या प्रकारांत आढळून येतात. मुख्यत्वेकरून पुढील तीन तऱ्हांचे प्रकार आढळून येतात : (१) लहान, गोलसर, गडद हिरवी व पट्टे असलेली फळे (२) लांब, जाड व दोन्ही टोकांना निमुळती, गडद हिरवी व पांढरे पट्टे असलेली फळे आणि (३) लांब, जाड, फिकट हिरव्या रंगाची पट्टे नसलेली फळे.
लागवडीसाठी खोडाचे सु. ९० सेंमी. लांब तुकडे बेणे म्हणून वापरतात. नर वा मादी वेलांमधून १ : १५ या प्रमाणात बेणे घेतात. बेण्याचा वेल मातीच्या गोळ्याभोवती गुंडाळून वेलाची दोन्ही टोके जमिनीवर राहतील अशा तऱ्हेने तो खड्ड्यात पुरतात. बिहारमध्ये दोन्ही बाजूंना २·४ ते ३ मी. अंतर सोडून जमिनीत खड्डे करतात व त्यांत ३० सेमी. लांबीचे वेलाचे तुकडे गुंडाळी करून पुरतात. वेलाचे एक टोक जमिनीवर असते. लागवड जुलै-ऑगस्ट अथवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करतात. बी लावूनही लागवड करता येते परंतु खोडाचे तुकडे लावण्याची पद्धत जास्त फायद्याची आहे. हेक्टरी ८,००० ते १०,००० किग्रॅ. शेणखत अगर कंपोस्ट जमिनीच्या मशागतीच्या वेळी मिसळतात. ५६ ते ८० किग्रॅ. नायट्रोजन वरखताच्या रूपाने देतात. पावसाळ्यात लावलेल्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नसते मात्र फेब्रुवारी-मार्चमध्ये लावलेल्या पिकाला ५ ते ६ वेळा पाणी द्यावे लागते.
पोसलेली परंतु कोवळी फळे विक्रीसाठी काढतात. पहिल्या वर्षी हेक्टरी ५,६०० ते ७,२०० किग्रॅ. उत्पन्न मिळते. त्यापुढील वर्षी ते ९,३०० ते १३,८०० किग्रॅ. पर्यंत जाते.
या पिकावरील रोग व किडी आणि त्यांच्यावरील उपाय हे कुकर्बिटेसी कुलातील इतर पिकांप्रमाणेच असतात