Jump to content

परदेशी भांडवल

राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले व परराष्ट्रांकडून मिळविलेले पूरक भांडवल. जगातील राष्ट्रांच्या आर्थिक विकासाची पातळी पाहता स्थूलपणे त्यांचे दोन गट दिसून येतात : एक विकसित राष्ट्रांचा व दुसरा अविकसित आणि विकसनशील देशांचा. या दुसऱ्या गटातील राष्ट्रांना आपल्या आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते; परंतु त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे तेथील लोकांचे राहणीमान आणि सरासरी दरडोई उत्पन्न निकृष्ट पातळीवरच असते. साहजिकच त्यांची बचतशक्ती कमी असल्यामुळे आर्थिक उन्नतीसाठी लागणारे भांडवल त्यांना अपुरे पडते.

उत्पादन कमी म्हणून दरडोई उत्पन्न कमी; उत्पन्न कमी म्हणून बचतशक्ती मर्यादित; बचतशक्ती मर्यादित म्हणून भांडवलाची कमतरता व भांडवल कमी म्हणून उत्पादन व उत्पन्न अल्प प्रमाणावर, असे हे दुष्ट चक्र त्या राष्ट्रांच्या अनुभवास येते. तशातच त्यांना जर अन्नधान्ये, खनिज तेल, यंत्रसामग्री व अवजोर किंवा कच्चा माल यांची मोठ्या प्रमाणावर आयात करणे अपरिहार्य झाले व त्यांची निर्यात क्षमता बेताचीच असली, तर त्यांना परकीय चलनाचा तुटवडा भासू लागतो. त्यांच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदात असमतोल निर्माण होतो, वरील प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावयाचा एकच मार्ग त्यांना उपलब्ध असतो; तो म्हणजे परदेशी भांडवल मिळविण्याचा प्रयत्न करणे. केवळ परदेशी भांडवल मिळाले म्हणजे त्या इतर गोष्टी आपोआप उपलब्ध होऊन विकासाची फळे मिळू लागतील, असे म्हणने चुकीचे आहे. कसबी श्रमिक, कुशल आणि अनुभवी व्यवस्थापक, पुरेसा व दर्जेदार कच्चा माल, कार्यक्षम प्रेरक शक्तीची आणि वाहतुकीची व्यवस्था इ. घटक योग्य प्रमाणात व योग्य वेळी वापरले, तरच भांडवलाच्या साहाय्याने उत्पदानात पुरेशी भर पडू शकेल. याचाच अर्थ विकासाकडे केवळ भांडवलाच्या दृष्टिकोनातून पाहणे बरोबर नाही.

एका पाळीच्या ऐवजी कारखान्यात दोन किंवा तीन पाळ्या चालवून, अपशिष्ट मालाचे प्रमाण कमी करून, वाहतुकीचे व प्रेरकशक्तीचे योग्य पूर्वनियोजन करून आणि उत्पादन प्रक्रियांची शास्त्रशुद्ध आखणी करून भांडवलात भर न टाकतासुद्धा उत्पादन वाढविता येते. परदेशी भांडवल वापरण्यापूर्वी गरजू राष्ट्रांनी उत्पादनवाढीचे व विकासाचे असे मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.