पद्माकर कुलकर्णी
पद्माकर शंकर कुलकर्णी (इ.स. १९३३ - ६ जानेवारी, इ.स. २०१५:चिंचवड, महाराष्ट्र, भारत) हे एक शास्त्रीय संगीताचे गायक होते.
पद्माकर कुलकर्णी हे देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयात ह्स्तकला शिक्षक होते. पद्माकर कुलकर्णी यांनी त्र्यंबकराव जानोरीकर, वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य म्हणून ओळखले जात. त्यांचे शास्त्रीय गायन दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही होत असे. ते तेथील ’ए’ ग्रेडचे कलावंत होते.
वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान
आपल्या गुरुंच्या स्मृतीप्रीत्यर्थ कुलकर्णींनी चिंचवडमध्ये इ.स. १६६मध्ये संगीत कलोपासक मंडळाची स्थापना केली. संस्थेचे ते संस्थापक-विश्वस्त होते.या कलोपासक मंडळाचे इ.स. १९८६मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनमध्ये रूपांतर झाले. पद्माकर कुलकर्णी याही फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त होते.
संगीतविषयक अन्य कार्य
पंडित पद्माकर कुलकर्णी हे चार वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीचे मानद संचालक व सल्लागार होते. शहरात ते पिंपरी-चिंचवड महोत्सवासह ’स्वरसागर संगीत महोत्सव’ही भरवत. चिंचवडमध्ये पाद्माकर कुलकर्णी यांनी ’शतजन्म शोधिताना’ या सावरकरांवरील कार्यक्रम, ’भक्तिगंगा’ हा स्वरचित कार्यक्रम आणि वसंतराव देशपांडे यांच्यावरील ’वसंतबानी’ हे कार्यक्रम केले होते.
सवाई गंधर्व महोत्सव
पुण्यात भरणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी इ.स. १९६७ आणि १९८१मध्ये आपले गायन सादर केले होते.
कट्यार काळजात घुसली
डॉ. वसंतराव देशपांडे वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी कट्यार काळजात घुसली ह्या नाटकात काम केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र घांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर(?) प्रयोग केले. ’मंदारमाला’, आणि ’स्वरमुक्त मी’ या संगीत नाटकांतही त्यांनी काम केले होते.
पुरस्कार आणि सन्मान
- वसंतराव मेमोरियल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पद्माकर कुलकर्णी यांना, त्यांनी संगीतक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे व पं. तळवलकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले (ऑगस्ट २०१२).
- कुलकर्णींच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिंवचडमधे ‘पंडित पद्माकर कुलकर्णी संगीत वर्ग’ सुरू झाला आहे. (७ जानेवारी, २०१७).
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पुरस्कार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे २०१५(?) सालापासून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गाणाऱ्या युवा गायकाला पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार देण्यात येतो. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- २०१६ साली हा पं.पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार रावेत येथे राहणाऱ्या अश्विनी तळेगावकर यांना प्रदान झाला. [ संदर्भ हवा ]