पंडित भीमसेन जोशी कलामंदिर
पंडित भीमसेन जोशी कलामंदिर हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील नाट्यगृह संकुल आहे. पुण्याच्या औंध भागात पुणे विद्यापीठ रस्त्यावर उभ्या असलेल्या या कलामंदिराचे उद्घाटन २ जून, इ.स. २०१३ रोजी झाले [१].
उपलब्ध सुविधा
पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात ५०० प्रेक्षकक्षमतेचे नाट्यगृह [१], तसेच एक कलादालन समाविष्ट आहे. कलामंदिराच्या शेजारी महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योगभवन त्याच सामायिक आवारात उभे आहे.
इतिहास
औंध, बाणेर, पाषाण या पुण्याच्या विकास पावणाऱ्या भागांतल्या नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्याकरता औंध येथील जागा निश्चित करून इ.स. २००१ साली भूमिपूजन करण्यात आले [१]. भूमिपूजनानंतर दीर्घकाळ लांबलेले बांधकाम पूर्ण होऊन २ जून, इ.स. २०१३ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक पार पडले. भारतरत्न किताबाने गौरवले गेलेले हिंदुस्तानी गायक भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ कलामंदिराला त्यांचे नाव देण्यात आले. पंडित भीमसेन जोशी कलामंदिर व शेजारील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योगभवन या दोन्ही योजनांसाठी एकत्रित २० कोटी रुपये खर्च आला [१].
७ जुलै, इ.स. २०१३ रोजी "आई रिटायर होतेय" या नाटकाच्या प्रयोगाद्वारे कलामंदिरातल्या नाट्यगृहात नाटकाचा पहिला प्रयोग रंगला.
संदर्भ व नोंदी
- ^ a b c d "पं. भीमसेन जोशी कलामंदिर उद्यापासून रसिकांच्या सेवेत." २०१३-०८-१५ रोजी पाहिले.