पंजाब मेल
१२१३७/१२१३८ पंजाब मेल ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी पंजाब मेल मुंबई ते पंजाबच्या फिरोजपूर दरम्यान दररोज धावते.[१] मुंबई ते फिरोजपुर ती १२१३७ या क्रमांकाने धावते तर १२१३८ या क्रमांकाने विरुद्ध दिशेला धावते. ही मुंबई ते फिरोझपूर दरम्यान रोज धावणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक आहे, तर दुसरी फिरोजपुर जनता एक्सप्रेस आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते फिरोझपूर रेल्वे स्थानकांदरम्यानचे १९३२ किमी अंतर पंजाब मेल ३४ तासांत पूर्ण करते.
ही गाडी पहिल्यांदा १ जून, १९१२ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पिअर मोल स्थानकातून सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरकडे जायची. २,४९६ किलोमीटरचा दीर्घ पल्ला असलेली त्या काळची ती पहिली आणि सर्वात जलद गाडी होती. हे अंतर पार करण्यास तिला ४७ तास लागत. सुरुवातीला ही गाडी रोज सुटत नसे; टपाल नेण्याच्या दिवशीच ही प्रवासाला निघे. गाडीला तीन डबे होते आणि त्यांत एकूण ९६ उतारू सामावले जात. दि पंजाब लिमिटेड हे या गाडीचे सुरुवातीचे नाव होते. जेव्हा ही गाडी मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसवरून सुटू लागली, तेव्हा हिचे नाव पंजाब मेल झाले.
पंजाब मेलला पॅंट्री कार धरून २३ डबे आहेत. ही गाडी आता मुंबई छ.शि.ट.वरून सुटून भारताच्या पंजाब प्रांतातील फिरोझपूर कॅंटॉनमेन्ट रेल्वे स्थानक या स्टेशनापर्यंत धावते. या गाडीचा नंबर १२१३७/१२१३८ असा आहे.
इतिहास
हि भारतातील सगळ्यात जुनी रेल्वे आहे जी १९१२ (१०५ वर्ष जुनी) पासून धावते आहे.[२] ह्या गाडीचे उद्घाटन १ जून १९१२ रोजी झाल्याचे मानले जाते. त्या काळी पंजाब लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी ही गाडी ब्रिटिश अधिकारी, सरकारी नोकर आणि त्यांच्या परिवारांना त्यांच्या जहाजांपासून सरळ दिल्ली तसेच उत्तर पश्चिमी भागात सोडण्यासाठी, बलार्ड पायर ते पेशावरदरम्यान धावत होती. ही गाडी १ जानेवारी १९२९साली सुरू झालेल्या ग्रँड ट्रंक एक्सप्रेस पेक्षाही जुनी आहे.
१९१४ला हिचे सुरुवातीचे स्थानक विक्टोरिया टर्मिनस करण्यात आले तसेच १९४७साली भारताच्या विभाजनानंतर ट्रेनचे टर्मिनस भारत पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोझपूर येथे हलविण्यात आले.[३]
कोचेस
१२१३७ / १२१३८ला सध्या१ एसी फर्स्टक्लास कम एसी २ टायर कोच, १ एसी २ टायर कोच, १ एसी २ कम एसी ३ टायर कोच, ५ एसी ३ टायर कोचेस, १० स्लीपर क्लास कोचेस, ३ सामान्य अनारक्षित कोचेस आणि १ पॅन्टरी कार आहे.
भारतातील इतर बहुतांश ट्रेन्सप्रमाणे या गाडीचेही कोच भारतीय रेल्वेच्या आदेशानुसार मागणीप्रमाणे बदलू शकतात. तसेच तिला एक रेल्वे मेल कोच जोडण्यात आलेला आहे.
सेवा
१२१३७ पंजाब मेल, १९३० किमीचे अंतर ३४ तासात पार करते तर १२१३८ पंजाब मेल ३३ तास ५५ मिनिटात पार करते.[४] या गाडीचा वेग ५५ किमी प्रतितास पेक्षा अधिक असल्याने, भारतीय रेल्वेच्या नियमनानुसार तिला सुपरफास्टचे भाडे आकारले जाते.
प्रमुख थांबे
- छत्रपती शिवाजी टर्मिनस
- दादर
- कल्याण
- मनमाड
- भुसावळ
- इटारसी
- भोपाळ
- झांशी
- ग्वाल्हेर
- आग्रा
- हजरत निजामुद्दीन
- नवी दिल्ली
- रोहतक
- भटिंडा
- फरीदकोट
- फिरोजपूर
इंजिन
सुरुवातीला ही गाडी ३ इंजिन्सद्वारे चालविण्यात येत होती. कल्याण शेडमधील डबल ट्रॅक्शन वाला डब्लूसीएएम ३ इंजिन गाडीला मुंबई पासून ते इगतपुरी स्थानकापर्यंत घेऊन जाते. तेथून पुढे गाजियाबाद येथील डब्लूएपी ४ हे दिल्ली पर्यंत वापरले जाते जेथून पुढे उर्वरित फिरोझपूर कॅन्टोन्मेंट पर्यंतच्या प्रवासासाठी भगत कि कोठी येथील डब्लूडीपी ४ हे इंजिन वापरले जाते.[५]
आता ६ जून २०१५ पासून मध्य रेल्वेचे एसी ते डीसी रूपांतरणचे काम संपल्याने मुंबई ते दिलीपर्यंतच्या प्रवासासाठी गाजियाबादचे डब्लूएपी ४ हे इंजिन वापरले जाते आणि पुढे फिरोझपूर कॅन्टोन्मेंट पर्यंतच्या प्रवासासाठी भगत कि कोठी येथील डब्लूडीपी ४ हे इंजिन वापरले जाते.