Jump to content

न्गुगी वा थिअंगो

न्गुगी वा थिअंगो (५ जानेवारी १९३८). जेम्स थिअंगो न्गुगी. जागतिक कीर्तिचे पूर्व आफ्रिकेतील केनियन लेखक आणि शिक्षणतज्ञ. कादंबरी, नाटक, लघुकथा,  निबंध, बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. आफ्रिकेतील विशेषतः केन्या (केन्या) या देशातील समाज आणि संस्कृती, भाषिक संपन्नता, वसाहतवाद, मानवीय विपन्नता आणि सामाजिक दंभ आणि अंधश्रद्धा हे विषय त्यांच्या साहित्यकृतीतून अभिव्यक्त झाले आहेत. २०१६ साली सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. त्यांचा जन्म लीमारू, केन्या येथे झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जन्मगावीच झाले. पुढे युगांडा देशाची राजधानी कांपाला येथील मॅकरेरे विद्यापीठ (१९६३) आणि इंग्लंडमधील यार्कशर या शहरातील लीड्स विद्यापीठ (१९६४) येथून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. नंतरच्या काळात केन्यातील नैरोबी येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. १९७२ ते १९७७ या काळात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इलिनॉय येथील इवास्टन येथील विद्यापीठात वरिष्ठ व्याख्याते म्हणून ते कार्यरत होते. नैरोबी येथील विद्यापीठात साहित्य या विषयाचे अधिष्ठाता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या बरोबरच जागतिक दर्जाच्या विद्यापीठात त्यांनी अतिथी आणि गुणश्री प्राध्यापक म्हणूनही कार्य केले आहे. आफ्रिकेतील वसाहतवादाबद्दल जागरूक झाल्यावर न्गुगी यांनी आपले पारंपरिक नाव धारण केले आहे. भाषा ही संस्कृतीचा व स्वत्वाचा अविभाज्य भाग आहे असा जोरदार पुरस्कार करून १९८० पासून सर्व लिखाण ते किकुयू भाषेमध्ये करत आहेत.

न्गुगी वा थिअंगो यांची साहित्यसंपदा : कादंबरी – विप नॉट, चाइल्ड (१९६४), द रिव्हर बिटविन (१९६५), ए ग्रेन ऑफ व्हीट (१९६७), पेटल्स ऑफ ब्लड (१९७७), कैतानी मुथाराबा इनी (डेव्हिल ऑन द क्रास इं.१९८०), मातिगरी वा निरुंगी (१९८६), मुरोगी वां कागोगो (विझार्ड ऑफ द क्रो इं.२००४); नाटक – द ब्लॅक हरमिट (१९६८), द ट्रायल ऑफ डीडान कीमाथी (१९७६), गाहिका डींडा (आय विल मॅरी व्हेन आय वॉन्ट इं.१९७७);  समीक्षा आणि निबंध – होमकमिंग (१९७२), बॅरल ऑफ अ पेन (१९८३), रायटर्स इन पॉलिटिक्स (१९८७), पेन पॉईंट्स, गन पॉईंट्स, ड्रीम्स (१९८८), मुव्हीन्ग द सेंटर (१९९३) आणि डीकॉलोनाईसिंग द माईंड : द पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज इन आफ्रिकन लिटरेचर (१९८६) इत्यादी.

न्गुगी यांची विप नॉट, चाइल्ड ही कादंबरी पहिली पूर्व आफ्रिकन कादंबरी समजली जाते. ही कादंबरी एका किकुयू कुटुंबाची कथा सांगते. केन्यातील स्वातंत्र्यलढा व माऊ माऊ उठावाच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील घटना घडतात. केन्यामधील हिंसाचार, राजकीय घडामोडी यांच्या पार्श्वभूमीवर जोरोंगो या मध्यवर्ती पात्राच्या आयुष्यातील घटनांचे चित्रण यात आले आहे. इंग्रजी शिक्षण घेऊन आपल्या देशाचा उद्धार करण्याचे व एक ख्रिश्चन बनण्याचे जोरोंगोचे स्वप्न यातून न्गुगी यांनी वसाहतवादाने लोकांवर काबू मिळवण्यासाठी वापरलेली शिक्षण आणि धर्म ही साधने स्पष्ट केली आहेत. त्यांची ए ग्रेन ऑफ व्हीट ही वाङ्मयमूल्यांच्या दृष्टीने अधिक श्रेष्ठ समजली जाणारी कादंबरी आहे. स्वातंत्र्यलढ्यात व नंतरच्या काळाशी निगडित अनेक सामाजिक, वांशिक व नैतिक प्रश्न या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. द रिव्हर बिटविन ही कादंबरी ख्रिश्चन धर्म व पारंपरिक रूढी यातील संघर्ष व त्यामुळे दोन प्रेमी जीवांची झालेली फारकत हा विषय मांडते. पेटल्स ऑफ ब्लड ही कादंबरी पूर्व आफ्रिकेतील कामगार व कष्टकरी वर्गाचे शोषण, इतर सामाजिक व आर्थिक प्रश्न यांचे प्रभावी चित्रण करते. कैतानी मुथाराबा इनी ही किकुयू या भाषेत प्रकाशित झालेली कादंबरी डेव्हिल ऑन द क्रास या शीर्षकाने इंग्रजी भाषेतही प्रकाशित झाली आहे. गरिबांना लुबाडणाऱ्या खलनायकी प्रवृत्तीचे वर्णन यात आहे.

न्गुगी यांची नाट्यसंपदाही लक्षणीय आहे. टीकाकारांच्या मते त्यांचे सर्वोत्तम नाटक द ट्रायल ऑफ डीडान कीमाथी हे होय. गाहिका डींडा हे त्यांचे किकुयू भाषेतील पहिले नाटक होय. या नाटकामध्ये केन्यातील नवश्रीमंत वर्गातील धार्मिक भोंदूगिरी, भ्रष्ट कारभार व भांडवलशाही यावर भाष्य आहे. या नाटकाच्या प्रयोगानंतर सरकारने त्यावर बंदी घातली होती. डीकॉलोनाईसिंग द माईंड : द पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज इन आफ्रिकन लिटरेचर (१९८६) या ग्रंथातून आफ्रिकन भाषेतूनच आफ्रिकन जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात असे न्गुगी यांनी आग्रहाने प्रतिपादन केले आहे. ड्रीम्स इन टाईम ऑफ वॉर (२०१०) या ललितग्रंथात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. इन द हाऊस ऑफ द इंटरप्रिटर (२०१२) यामध्ये १९५० च्या काळातील ब्रिटिशविरोधी आंदोलनाचे वर्णन आहे. बर्थ ऑफ ए ड्रीमवीवर: ए रायटर्स अवेकनिंग (२०१६) यामध्ये न्गुगी यांच्या मॅकरेरे विद्यापीठामधील दिवसांचे चित्रण आहे.

बराच काळ बाहेरदेशी राहून २००४ मध्ये न्गुगी आपल्या पत्नीसोबत केन्या मध्ये परत आले. मुरोगी वां कागोगो या पुस्तकाचा ते प्रसार करत होते. त्यांना प्राणघातक हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्यातून वाचल्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीने देशाबाहेर या पुस्तकाचा प्रसार करणे चालूच ठेवले आहे. न्गुगी वा थिअंगो यांनी वसाहतवादातून मुक्तता या विषयी बोलताना मनाची वसाहतवादातून मुक्तता करणे, मातृभाषेचा वापर व स्वतःच्या संस्कृतीमध्ये घट्ट रोवलेली मुळे असण्याची गरज यांचा जोरदार पुरस्कार केला. १९७८ मध्ये त्यांना त्यांच्या राजकीय विचारांमुळे एक वर्ष कारावास भोगावा लागला होता. अनेक पुरस्कार व मानद पदवी प्रदान करून गुगी यांचा गौरव करण्यात आला आहे.