Jump to content

नृत्य समीक्षा

नृत्य समीक्षा

समीक्षेची व्याख्या विविध प्रकारे सांगता येईल. समीक्षा समीक्षा शब्दाची फोड – सम + ईक्ष = सर्व गोष्टींकडे समान दृष्टीने पाहणे.

•कलेच्या बाबतीत एखाद्या कलात्मक निर्मितीचे आस्वादक वृत्तीने केलेले तटस्थ अनुभवग्रहण,त्यावरील बहुआयामी चिंतन,त्याआधारे त्या कलाकृतीचे विवरण,परीक्षण,विश्लेषण,आस्वादन,स्तरीकरण आणि मूल्यांकन करणे म्हणजे समीक्षा होय.

•कलाकृतीच्या बृहत् निरीक्षण,चिंतनातून निष्पन्न होणारे सिद्धांत म्हणजे समीक्षा.

•व्यक्तीला येणारे अनुभव,पूर्वग्रहाचा प्रभाव न पाडता ग्रहण करून त्यांची तुलना त्या घटकाच्या मूळ तत्त्वाशी करून सादर केलेले विश्लेषण म्हणजे समीक्षा.

•समीक्षा म्हणजे कलाकृतीचा अभ्यास,तुलना आणि विश्लेषण.

समीक्षा हे आस्वादनात्मक मूल्यांकन करणारे साहित्य सदर आहे.

समीक्षा विविध प्रकारे व्यक्त केली जाते-- व्यक्तीगत, संस्था किंवा गटाकरता,विशिष्ट मुद्द्याला धरून विस्तृतपणे,सर्वसमावेशक,स्पष्ट किंवा ढोबळमानाने , शाब्दिक किंवा देहबोलीतून, तात्काळ प्रतिसादाच्या रूपात किंवा विचारपूर्वक विश्लेषण करून. समीक्षा ही अभिव्यक्तीच्या स्तरावर असावी.यात कलाकृतीचा सारासार विचार केलेला असावा. आणि समीक्षा रसग्रहणात्मक असावी. कोणत्याही प्रकारे समीक्षा करताना त्यात काही टप्पे असणे आवश्यक आहे.

समीक्षेचे टप्पे

  1. ग्रहण – ज्या कार्यक्रमाची समीक्षा लिहायची आहे त्याचे योग्य पद्धतीने ग्रहण होणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.ती कलाप्रस्तुती पूर्वग्रह न ठेवता संपूर्णपणे लक्षपूर्वक बघणे,जाणून घेणे गरजेचे आहे.योग्य-अयोग्यतेचे निकष न लावता वैचारिक पातळीवर त्याचा पुनर्विचार अपेक्षित आहे.
  2. पृथ:करण – ग्रहण केलेल्या नृत्याचा पुनर्विचार करून त्याचे वेगवेगळ्या निकषांवर पृथ:करण करणे हा दुसरा टप्पा होय.एखाद्या कार्यक्रमाबद्दल काय,कुठे,कसे आणि का? अशा विविध प्रश्नांच्या अंगाने विचार करणे अपेक्षित आहे.उदा.कार्यक्रम काय आहे?- नृत्यप्रस्तुती आहे की परिसंवाद,चर्चा आहे की सप्रयोग व्याख्यान इ. तो कोणासाठी आहे?-सामान्य रसिक,कलेचे विद्यार्थी,अभ्यासक की समीक्षक? त्याचे प्रयोजन काय?-सणसमारंभ,महोत्सव,गौरव,वर्धापनदिन इ. कार्यक्रमात सदर झालेल्या नृत्यरचनांचे संगीत,नृत्य,वेशभूषा,सादरीकरण,तंत्र,अभिनय,नेपथ्य इ. तत्त्वांवर पृथ:करण अपेक्षित आहे. येथे व्यक्तीसापेक्ष मतही विचारात घ्यावे.
  3. एकत्रीकरण – ग्रहण करून त्याचे पृथ:करण केलेल्या माहितीची पुनर्रचना करून ती पुन्हा एकत्र करणे हा तिसरा टप्पा.इथे विविध मुद्दे,त्यांचा प्राधान्यक्रम,ठळक गोष्टी यांचा विचार करणे आवश्यक आहे.
  4. मूल्यमापन – एकत्रीकरणातील विविध बाबींचे मुद्देसूद परीक्षण करणे हा चौथा टप्पा.इथे प्रत्येक बाब तिच्या मूळतत्त्वाशी पडताळून पाहणे,त्या तत्त्वाला ती पुरेपूर उतरली आहे की नाही हे पाहणे आणि त्यानुसार ती चांगली की वाईट हे ठरवणे म्हणजे मूल्यमापन. इथे चांगल्या गोष्टींचा उल्लेख तर आवश्यक आहेच पण वाईट गोष्टी सांगताना त्या नकारात्मक रीतीने न सांगता काय केले असता चांगले झाले असते अशा स्वरूपात सांगवे.नृत्यप्रस्तुती,तंत्रशुद्धता,अभिनय,गुणवत्ता,साथसंगत आणि कार्यक्रमाचा एकूण परिणाम या गोष्टी लक्षात घ्याव्या.
  5. निष्कर्ष – वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन कार्यक्रमाबद्दल निष्कर्ष /अनुमान लिहिणे.इथे कार्यक्रमाचा प्रेक्षकांवर काय प्रभाव झाला,त्यांचा प्रतिसाद कसा होता आणि काही त्रुटी उणीवा असूनही अंतिम परिणाम काय झाला याविषयी निष्कर्ष लिहावे.

समीक्षा लेखनाचे हे विविध टप्पे वेगवेगळ्या प्रकारच्या समीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रमाणात अवलंबले जातात.विश्लेषणात्मक समीक्षेत पृथ:करण जास्त तर सैद्धांतिक समीक्षेत मूल्यमापन अधिक असते.ग्रहण आणि पृथ:करण हे टप्पे वैचारिक पातळीवरचे असून एकत्रीकरण,मूल्यमापन आणि निष्कर्ष हे लिखाणात्मक पातळीचे आहेत.