Jump to content

नुजूद अली

नुजूद अली (जन्म : १९९८) ही येमेनमधली मुलगी येमेनमध्ये आणि पर्यायाने मुस्लिम जगामध्ये बालविवाहाच्या संदर्भात प्रसिद्धी पावलेली व्यक्ती आहे.

नुजूद अली ही येमेनमधल्या एका गावातली नऊ वर्षाची हसमुख, खेळकर मुलगी होती. शाळेत शिकत होती आणि शिकून तिला खूप मोठे व्हायचे होते. पण तिच्या बापाने खूपसे पैसे घेऊन तिचे एक ३० वर्षे वयाच्या माणसाशी लगन लावून दिले. नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिचा खूप छळ झाला, इतका की तिला तो सहन होईना. आपण येथून कसेही करून सुटका करून घ्यायची हे तिने मनाशी ठरवले. तिच्या लक्षात आले की आपले शेजारी, परिचित आणि सासरचे नातेवाईक कोणीही आपल्याला येथून सोडवू शकणार नाहीत. सुटका घ्यायचीच असेल तर फक्त कोर्टच करू शकेल. ती पैशाची नाणी जमवायला लागली. पुरेसे पैसे जमले आणि नुजूदने घरातून पळ काढला आणि टॅक्सीने जाऊन तिने कोर्ट गाठले.

कोर्टाच्या आवारात बसलेल्या या लहान वयाच्या, घाबरलेल्या चेहऱ्याच्या आणि गुमसुम बसलेल्या मुलीला शादां नासर नावाच्या महिला वकिलाने पाहिले आणि तिची चौकशी केली. आणि त्या क्षणापासून नुजूदचे दैव पालटले. शादांने तिची केस लढवली आणि तिला तलाक मिळवून दिला. वयाच्या १०व्या वर्षी तलाक मिळवणारी ती जगातली बहुधा पहिली मुलगी असावी. चीफ जस्टिसांमध्ये तिला आपले सच्चे वडील दिसले. रातोरात नुजूद अलीला प्रसिद्धी मिळाली आणि तिच्यावरती लेख लिहिले गेले. एका प्रकाशकाने तिची हकीकत विचारून विचारून तिच्यावर 'I am Nujood : Age 10 and Divorced' हे पुस्तक प्रकाशित केले. पुस्ताकाच्या राॅयल्टीची भली मोठी रक्कम मिळवून नुजूद अमीर झाली.

त्यानंतर नुजूद अलीने आपल्या भावा-बहिणींना आपल्या मिळकतीमध्ये सामावून घेतले. २००८ सालच्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील ग्लॅमर नावाच्या स्त्रीसाहित्याला वाहलेल्या एका मासिकात तिची हकीकत छापून आली. त्या मासिकाने तिला आणि तिच्या वकिलाला (शादांला) 'वूमन ऑफ द ईयर' म्हणून निवडले. ग्लॅमर मासिकामुळे तिला हिलरी क्लिंटन आणि तिच्यासारख्या अनेक लोकांच्या पंक्तीत बसायला मिळाले.

तलाकनंतर नुजूदने आपले शिक्षण नव्याने सुरू केले.