नी.वि. छत्रे
नीलकंठ विनायक छत्रे ऊर्फ कोंडोपंत छत्रे (१ नोव्हेंबर, इ.स. १८५० - ३० एप्रिल, इ.स. १९२९) हे व्यवसायाने डॉक्टर होते. सुप्रसिद्ध गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचे ते वंशज होते. शके १७८७ पासून चालू असलेले केरोपंती अथवा पटवर्धनी पचांग हे त्यांच्या देखरेखीखाली बनत असे.
कोंडोपंतांना मराठी व संस्कृत भाषेतील साहित्य वाचण्याची आवड असून, या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. कलाप्रांतातही त्यांना नाट्यशास्त्राची विशेष आवड होती. नाटक बसवताना व दिग्दर्शित करताना नटाने त्यातील संवाद म्हणताना आवाजाचे चढउतार कसे हेरावे, त्यांना आकार कसा द्यावा याचे ते जाणकार होते. कोंडोपंतांच्या या ज्ञानाचा रंगभूमीवर काम करणाऱ्या अनेकांना उपयोग झाला.
नी.वि. छत्रे हे नाटकांकडे प्रचाराचे आणि प्रसाराचे माध्यम म्हणून बघायचे. नाटकाचा कल्पकतेने वापर केला तर त्यातून जनजागृती साधून आपली मते लोकांपर्यंत पोहोचवता येतील यावर त्यांचा विश्वास होता. ते याच दृष्टीने नाटकांचा विचार करीत.
नाट्यलेखन
कोंडोपंत छत्रे यांनी ’दुर्योधन बलराम’ या नावाचे एक नाटक लिहिले होते.
सन्मान
नी.वि. छत्रे यांचा रंगभूमीचा अभ्यास, रंगभूमीवरील त्यांचे प्रेम आणि निष्ठा पाहून, तसेच रंगभूमीवर त्यांनी सोपविलेली जनजागृतीची जबाबदारी पार पाडण्यासाठीचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळावे म्हणून, त्यांना इ.स. १९०८ साली नाशिक येथे भरलेल्या ४थ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. [[वर्ग:मराठी नाटककार][]