निवृत्तिनाथ
निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गयिनीनाथे सोय दाखविली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले’ असे निवृत्तिनाथांबद्दल म्हणले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ त्यांच्या सोबत होतेच. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हणले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्री समर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते २३ जून १२९७.
संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला.
संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली. नंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली हे जरी सर्वांना ज्ञात होत तरीही संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी एवढया घनदाट जंगलात नक्की कुठे आहे हे कुणालाच ज्ञात नव्हतं.. नंतर इ स 1810-1825 च्या आसपास (नक्की वर्ष ज्ञात नाही) जोपुळ ता दिंडोरी येथील महान संत 'पाटीलबुवा रखमाजी उगले' महाराज यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने संत निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली. त्यामुळे संत पाटीलबाबा जोपुळ कर यांना संत निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधक म्हणून गौरवले जाते. संत पाटील बाबांनीच निवृत्तीनाथांचं छोटस मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधले. संत पाटीलबाबा महाराजांनी जोपुळहुन त्रंबकेश्वर पायी वारी पौष महिन्यात सुरू केली. हीच पौष वारी म्हणून प्रसिद्ध आहे.
निवृत्तिनाथांवरील मराठी पुस्तके
- श्री संत निवृत्तीनाथ चरित्र (बाळकृष्ण लळीत)
- परब्रह्म - (संत निवृत्तिनाथांवरील पहिली कादंबरी) लेखिका सौ. गायत्री मुळे, नागपूर -प्रकाशक - लोकव्रत प्रकाशन, पुणे
बाह्य दुवे
नवनाथ |
---|
मच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तृहरि • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ |