Jump to content

निवती किल्ला

निवती
नावनिवती
उंचीमी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणजिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गावनीवती
डोंगररांग
सध्याची अवस्थाचांगल्या स्वरूपात
स्थापना{{{स्थापना}}}


निवती किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

भौगोलिक स्थान

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला, मालवण पासून १० किमी व वेंगुर्ल्यापासून १५ किमी सागरी अंतरावर असलेल्या निवती गावातील समुद्रात शिरलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते.

कसे जाल ?

मालवण मार्गे:- मालवण बस स्थानकातून सागरी महामार्गाने जाणाऱ्या वास्को, पणजी, वेंगुर्ला इत्यादी बसने परुळे गावातील "परुळे बाजार" ह्या थांब्यावर उतरावे. तेथून किल्ले निवतीला जाणाऱ्या बसेस मिळू शकतात. परंतु किल्ले निवतीला जाणाऱ्या बसेस मोजक्याच असल्यामुळे परुळे बाजारातून रिक्षा करून ७ किमी वरील किल्ल्यापर्यंत जाणे सोयीस्कर पडते. मालवणहून निवती साधारण २५ किमी वर आहे.किल्ले निवती गावातील बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरून उजव्या बाजूच्या लालमातीच्या कच्च्या रस्त्याने १० मिनीटे चढाई केल्यावर निवती किल्ल्याजवळ पोहोचता येते.

इतिहास

सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावंतांकडे गेला. १७४८ साली पोर्तुगिजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करून तो जिंकून घेतला. १७८७ साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी किल्ला जिंकला. १८०३ मध्ये गडाचा ताबा परत सावंतांकडे आला. ४ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.

छायाचित्रे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

चिरेबंदी पायऱ्यांच्या वाटेने गड चढतांना आपल्याला प्रथम पायर्‍ऱ्यांच्या दोंन्ही बाजूस असलेला २० ×१० फूटी खोल खंदक दिसतो. सध्या तो झाडीने झाकलेला आहे. याच वाटेने आपण भग्न तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. येथे डाव्या बाजूला दोन भव्य बुरुजांमध्ये प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आहेत, पण प्रवेशद्वारापुढील मार्ग तुटल्यामुळे त्यातून प्रवेश करता येत नाही. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फूटतात. समोर जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास उजव्या बाजूस एक भव्य बुरुज दिसतो. तिथून पुढे गेल्यावर अजून एक भव्य़ बुरुज त्यावरील जंग्यासह पाहायला मिळतो. या बुरुजा जवळून खालच्या बाजूस अप्रतिम भोगवे बिच व कर्ली खाडी पर्यंतचा परिसर दिसतो. येथून डाव्या हाताला वळून समुद्राच्या दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकावरून पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक पहायला मिळतात. याच ठिकाणाहून उजव्या बाजूस समोर अरबी समुद्र व दूरवर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसते. येथे एक खड्डा व त्यात उतरणाऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. येथे खोदीव टाक असण्याचा संभव आहे. हे पाहून परत प्रवेशद्वारापाशी येऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. गडाचा बालेकिल्ला खंदक खोदून संरक्षित केलेला आहे. बालेकिल्ल्याची प्रवेशद्वारे, देवड्या, तटबंदी अजूनही शाबूत आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. बालेकिल्ल्यात जुन्या वास्तूंचे चौथरे आहेत. बालेकिल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याची भ्रमंती संपते. निवती किल्ल्यावर आपल्याला पाण्याची व्यवस्था कुठेही दिसत नाही, ती किल्ल्याखाली केलेली आहे त्याला स्थानिक लोक 'शिवाजीची तळी' या नावाने ओळखतात. ती पाहाण्यासाठी किल्ला उतरतांना सरळ रस्त्याने गावात न जाता, उजव्या बाजूला समुद्राकडे उतरणाऱ्या रस्त्याने खाली उतरावे. येथेच 'शिवाजीची तळी' नावाची पाण्याची टाकी आहेत. पुन्हा मुळ रस्त्याने निवती किनाऱ्यावर गेल्यास छोटीशी पुळण व त्यावरून समुद्रात घुसलेला २० फूटी खडक पाहायला मिळतो. याला 'जुनागड' म्हणतात. पुळणीच्या बाजूने त्यावर चढता येते. निवती पासून ८ किमी वरील परूळे गावात वेतोबा मंदिर संकुल आहे. त्यातील प्रमाणबद्ध कोरीव मूर्ती व वीरगळ पहाण्यासारखे आहेत.

गडावरील राहायची सोय

गडावर राहण्यास कोणतीही सोय नाही.

गडावरील खाण्याची सोय

गडावर खाण्याची सोय नाही जेवणाची सोय आपण स्वतः करावी.

गडावरील पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय नाही

गडावर जाण्याच्या वाटा

१) मालवण मार्गे:- मालवण बस स्थानकातून सागरी महामार्गाने जाणाऱ्या वास्को, पणजी, वेंगुर्ला इत्यादी बसने परुळे गावातील "परुळे बाजार" ह्या थांब्यावर उतरावे. तेथून किल्ले निवतीला जाणाऱ्या बसेस मिळू शकतात. परंतु किल्ले निवतीला जाणाऱ्या बसेस मोजक्याच असल्यामुळे परुळे बाजारातून रिक्षा करून ७ किमी वरील किल्ल्यापर्यंत जाणे सोयीस्कर पडते. मालवणहून निवती साधारण २५ किमी वर आहे. २) कुडाळ मार्गे:- कुडाळ बस स्थानकातून "किल्ले निवती" बसने निवती गावात थेट जाता येते. येथे "किल्ले निवती" व निवती अशी दोन गावे आहेत. किल्ला "किल्ले निवती" गावात आहे. ३) किल्ले निवती गावातील बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरून उजव्या बाजूच्या लालमातीच्या कच्च्या रस्त्याने १० मिनीटे चढाई केल्यावर निवती किल्ल्याजवळ पोहोचता येते.

मार्ग

जाण्यासाठी लागणारा वेळ

मालवणहून खाजगी वहानाने सकाळी निघून निवतीचा किल्ला(२५ किमी) + यशवंतगड रेडी(४० किमी) + तेरेखोलचा किल्ला(७ किमी) पाहून मालवणला परत येता येते किंवा तेरेखोलहून(४० किमी) पणजीला मुक्कामी जाता येते...!!!

संदर्भ

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले