निर्मल बाबा
निर्मलजीत सिंह नरूला तथा निर्मल बाबा हा एक हिंदू साधू आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने इतर १३ साधूं सह याला नकली म्हणून घोषित केले आहे.
जन्म, शिक्षण आणि झारखंडमध्ये प्रयाण
निर्मल बाबाचा जन्म १९५२ मध्ये पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील समाना गावात झाला. त्याचे शिक्षण समाना, दिल्ली आणि लुधियानात झाले. झारखंड राज्यातून निवडून गेलेले माजी खासदार इंदरसिंह नामधारीशी बाबांच्या एका बहिणीचे लग्न झाले. पित्याच्या मृत्यूनंतर ती बहीण निर्मलजीतला झारखंडमध्ये घेऊन आली.
विविध व्यवसायांमध्ये झालेले नुकसान आणि त्यानंतर बुवाबाजीला सुरुवात
झारखंडमध्ये आल्यावर निर्मलजीतने अनेक धंदे केले. गढवा गावात त्याने 'नामधारी क्लॉथ हाउस' नावाचे कापडाचे दुकान टाकले., पण ते न चालल्याने त्याने विटांची भट्टी सुरू केली. त्याच्यातही तोटा झाला. मग त्याने रांचीत राहून खाणींच्या लिलावांची कॉंट्रॅक्ट्स घ्यायला सुरुवात केली. तेही न जमल्याने शेवटी त्याने लोकांना जमवून त्यांच्यासमोर धार्मिक प्रवचने करायला आरंभ केला, आणि त्या धंद्यात त्याला अमाप यश मिळाले. लोक प्रवचने ऐकत आणि भरपूर दान-दक्षिणा देत. त्या पैशावर निर्मलजीतने रांचीत बरीच स्थावर मालमत्ता केली.
दिल्लीमध्ये बस्तान
१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि शीखविरोधी दंगे सुरू झाले त्यावेळी निर्मलजीत सिंह नरूला रांचीमधील सर्व इस्टेट विकून दिल्लीआला आणि तेथे ‘निर्मल दरबार’ भरवायला प्रारंभ केला. येथे त्याने अमाप संपत्ती मिळवली.
आपली पत्नी सुषमा नरूला आणि एका मुला-मुलीसह निर्मल बाबा दिल्लीत ग्रेटर कैलाश नावाच्या उच्चभ्रूंच्या इलाख्यात एका आलेशान बंगल्यात राहतो आहे.
निर्मलबाबाने दुःखनिवारणसाठी सुचवलेले नुस्खे
निर्मलबाबावर स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय लोकांमध्ये अंधविश्वास पैदा करून त्यांना गंडा घालण्याचेही आरोप आहेत. काही वर्षांपूर्वी निर्मलबाबा दूरचित्रवणीवर झळकत असत. दुःखे दूर करण्यासाठी बाबा लोकांना भजी-पिज्झा खा असा उपदेश करताना ते दिसत. काही लोक ही थट्टा समजत पण काही त्या युक्त्या मनोभावे आचरणात आणीत. इतकेच नाही तर अशा उपदेशांबद्दल आपल्या संपत्तीचा दहावा हिस्सा बाबाच्या पायावर अर्पण करीत.
बोगस बाबांच्या यादीत प्रवेश
अशा निर्मलबाबाला अखिल भारतीय आखाडा परिषदेने बोगस बाबा म्हणून घोषित केले आहे.