Jump to content

नियंत्रित-प्रवेश महामार्ग

ग्रेटर नोएडा-आग्रा यमुना द्रुतगतीमार्ग हा सध्याच्या घडीला भारतातील सर्वाधिक लांबीचा नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे.

नियंत्रित-प्रवेश महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग (controlled-access highway) हा द्रुतगती वाहतूकीसाठी वापरण्यात येत असलेला महामार्गाचा एक प्रकार आहे. ह्या प्रकारच्या महामार्गावरील सर्व प्रवेश व निकास नियंत्रित केलेले असतात. एक्सप्रेसवे, मोटरवे, फ्रीवे इत्यादी इंग्लिश शब्द नियंत्रित-प्रवेश महामार्गाचा उल्लेख करण्यासाठीच वापरले जातात. फ्रेंच: autoroute, जर्मन: Autobahn, किवा इटालियन: autostrada हे शब्द इतर भाषांमध्ये वापरात आहेत.

नियंत्रित-प्रवेश महामार्गावर वाहतूकीला येणारे सर्व अडथळे दूर केलेले असतात. येथे कोणत्याही प्रकारचे काटरस्ते, चौक, वाहतूक नियंत्रक सिग्नल नसून वाहनांना मुक्तपणे वेगाने प्रवास करण्याची मुभा असते. आडव्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी पूल किंवा बोगदे बांधलेले असतात. ह्या महामार्गावर केवळ ठराविक स्थानांवरूनच वाहनांना प्रवेश मिळतो व ठराविक स्थानांमध्येच महामार्ग सोडता येतो.

जगातील पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग इटलीमध्ये १९२५ साली मिलान येथे बांधला गेला. जर्मनीमध्ये ३० किमी लांबीचा पहिला ऑटोबान क्योल्नबॉनदरम्यान १९३२ साली खुला करण्यात आला. त्यानंतर नाझी राजवटीने दुसऱ्या महायुद्धाच्या आधी झपाट्याने जर्मनीभर ऑटोबानचे जाळे निर्माण केले. २००२ साली उघडण्यात आलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग होता. सध्या अहमदाबाद-वडोदरा दरम्यानचा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १, दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग, मुंबईमधील पूर्व मुक्त मार्ग इत्यादी अनेक नियंत्रित-प्रवेश महामार्ग भारतात कार्यरत आहेत.

अमेरिका देशामध्ये १९५६ साली राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टम सुरू केली. जगातील बहुतेक सर्व प्रमुख देशांमध्ये नियंत्रित-प्रवेश महामार्ग प्रणाल्या अस्तित्वात आहेत.

हे सुद्धा पहा