Jump to content

निगोशिएटिंग स्पेसेस

निगोशिएटिंग स्पेसेस हे २०१२ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे. हे पुस्तक फ्लॅव्हिया ॲग्नेस आणि शोभना घोष यांनी ‘मजलिस’या संस्थेच्या साहाय्याने संपादित केले आहे.

प्रस्तावना

स्त्रियांच्या हिताच्या दृष्टीने जे कायदे बनवले गेले त्या कायद्यांचा स्त्रियांच्या हक्कांवर काय परिणाम झाला व न्यायालयाची हस्तक्षेपी भूमिका आजवर काय राहिली आहे याची चिकित्सा हे पुस्तक करते. शासनाकडून येणारे औपचारिक कायदे व धर्मावर आधारलेले कायदे या दोन विसंगत कायद्यांना स्त्रिया कश्या पद्धतीने तोंड देतात याची मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे.

ठळक मुद्दे

या पुस्तकातील शोधनिबंधांमध्ये,लैंगिकता, समूह व राज्य या दोहोंचा हस्तक्षेप व विवाह, राज्यांच्या संरचनेतून येणारी हिंसा, समाज, राज्य आणि वारसा हक्क व वैवाहिक दर्जातून मिळणारी संपत्ती या सर्व क्षेत्रांत परस्पर निर्माण होणाऱ्या विसंगती व आयुष्य जगताना यांच्याशी स्त्रियांना सातत्याने करावी लागणारी तडजोड याचा वेध घेतला गेला आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये राज्य व नागरी समाजाच्या संरचनेतून निर्माण होणारी अनैतिकतेची, वाईटपणाची प्रतिमाने व लैंगिक तडजोडी याबाबत चर्चा केलेली आहे. पहिल्या शोधनिबंधामध्ये, बार डान्सरच्या अदृश्य होण्याच्या नागरी राजकारणाचा वेध घेण्यात आलेला आहे.दुसऱ्या शोधनिबंधामध्ये मीना शाहू यांनी VAMP (Voices of Asian Modernities Project)च्या साथीने सेक्स वर्करने उभा केलेला संघर्ष, एकीकडे राज्यसंस्था, पोलिस, वकील, मुख्यप्रवाही समाज व दुसरीकडे वेश्याव्यवसायाच्या जगातील दलाल, गुंड या दोहोंनाही सातत्याने द्यावे लागणारे तोंड व मानवी हक्कांपासूनची वंचितता याचा नेमका वेध घेतलेला आहे. लैंगिकतेच्या व लिंगभावाच्या राजकारणात अदृश्य व अनामिक राहिलेल्या वंचित घटकांना संदर्भ व संघर्षाच्या इतिहासाने कसा अवकाश मिळाला याचा वेध चायनिका शहा आपल्या शोधनिबंधात घेतात.पुस्तकाच्या दुसऱ्या भागात विवाह नावाच्या बाबीत समूह व राज्य या दोहोंकडून कसा हस्तक्षेप होतो याची मांडणी केलेली आहे. समिता सेन यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये धर्मांतरामुळे निर्माण झालेले वैवाहिक विवादांवर प्रकाश टाकणाऱ्या १९ व्या शतकांतील काही प्रकरणांचा आढावा घेतलेला आहे. यातील पाचवा शोधनिबंध हा मुख्यता AALI (Association For Advocacy and Legal Initiatives) या लखनौमध्ये मानवी हक्कांबाबत काम करणाऱ्या संघटनेच्या सामाजिक संशोधनावर आधारलेला आहे. कायदे हे नागरिकांच्या मानवी हक्कांचा संकोच कसे करतात याचा वेध घेतलेला आहे.

योगदान

या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये असीमा साहू यांनी Muslim Women and Gender Justice in India: An Analysis of Muslim Women Act of 1986 या विषयावरील लेख प्रसिद्ध केलेला आहे. भारतातील मुस्लिम स्त्रियांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील स्थान यावर हा लेख प्रकाश टाकतो. या लेखाच्या मांडणीकरता निगोशिएटिंग स्पेसेस पुस्तकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.http://ajms.co.in/sites/ajms2015/index.php/ajms/article/view/1615

महत्त्वाच्या संकल्पना

मानवी हक्क, नागरी समाज