निकोबारी लोक
निकोबारी लोक हे निकोबार बेटांतील ऑस्ट्रोएशियाटिक भाषिक लोक आहेत. निकोबर बेटे ही सुमात्राच्या उत्तरेस, बंगालच्या उपसागरातील बेटांची साखळी आहे. ही बेटे भारतातील अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. या द्वीपसमूहातील सर्वात मोठे आणि मुख्य बेट ग्रेट निकोबार आहे. या द्वीपसमूहात एकूण १९ बेटे आहेत, त्यापैकी फक्त १२ बेटांवर लोकवस्ती आहे. निकोबार बेटावरील प्रमुख जमातींना सूचित करण्यासाठी निकोबारी हा शब्द वापरण्यात येतो. प्रत्येक बेटावर, लोकांना / जमातींना विशिष्ट नावे आहेत, परंतु एकत्रितपणे ते निकोबारी म्हणून ओळखले जातात. येथील लोकं, स्वतःला होल्चू म्हणतात, या शब्दाचा अर्थ "मित्र" असा आहे. </link>[ <span title="This claim needs references to reliable sources. (August 2011)">संदर्भ हवा</span> ]
निकोबारी लोकांचा समावेश भारतीय संविधानानुसार अनुसूचित जमातीं मध्ये केलेला आहे. [१]
इतिहास
सध्याचे निकोबारी हे बेटांवर राहणारे पहिले लोक नसावेत; यांच्या आधीपासून येथे शॉम्पेन लोकं रहात होती. ह्या दोन्ही जमाती या बेटांवर सामायिकपणे रहात असावीत असा अदमास आहे.
१६व्या शतकात ही बेटे डेन्मार्क साम्राज्यांचा भाग झाली. १७५४ ते १८६९ या काळात येथे डेन्मार्क ची सत्ता होती. १८६९ मध्ये ही बेटे ब्रिटिश साम्राज्याचा भाग झाली. १९४७ साली भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही बेटे भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहेत.
भाषा
निकोबारी भाषा ही ऑस्ट्रोएशियाटिक भाषा कुटुंबाचा भाग आहे. सर्व बेटांवर निकोबारी भाषेच्या वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. निकोबार बेटांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते, परंतु येथील बहुतेक लोकांना कार निकोबार बोली समजते. निकोबार द्वीपसमूहात, उत्तरेपासून दक्षिणेकडे पहिले असता खालीलप्रमाणे बोलीभाषा आढळतात.
- कार: कार (Pū)
- चौरा-तेरेसा: चौरा (टुटेट/सॅन्यो), तेरेसा (ताई-लाँग/लुरो)
- मध्य : नानकोवरी (नांग-कौरी/मुट), कामोर्टा, कच्छल (तेह्नू)
- दक्षिण: दक्षिण निकोबारी (सॅम्बेलॉन्ग)
धर्म
बेटांवरील बहुतेक लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत. याचे श्रेय जॉन रिचर्डसन नावाच्या माणसाकडे जाते. याने न्यू टेस्टामेंटचे निकोबारी मध्ये भाषांतर केले होते. ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त, इतर निकोबारी लोक बेटांच्या पारंपारिक धर्माचे पालन करतात. हा धर्म प्राथमिक स्वरूपाचा, निसर्गातील शक्तींना, आत्म्याचे व भूतांचे अस्तित्व मानणारा असा आहे. या धर्माचे उपासक आत्मे, भूते आणि चैतन्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. माणसाच्या मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडतो व त्या व्यक्तीचे भूत बनते असा त्यांचा विश्वास आहे. तेव्हा मृत निकोबारी लोकांची भुते सर्व बेटांभोवती आहेत असा त्यांचा विश्वास आहे. बेटांवरील सर्व दुर्दैवी घटनांसाठी ते या मृत आत्म्यांना जबाबदार धरतात व अशा परिस्थितीत 'शमनांना' वाईट आत्म्यांना हाताळण्यासाठी बोलावले जाते.
कला
त्यांची चित्र व शिल्पे मौखिक परंपरेतून जपलेल्या मूळ निकोबारी मिथकांशी संबंधित आहेत. जगाच्या त्यांच्या संकल्पनेत, ते समुद्र, पृथ्वी आणि आकाशाच्या राज्यांमध्ये राहतात, व या राज्यांमध्ये ते जादू- धार्मिक माध्यमातून संचार करतात.
त्यांच्या कलाकृति अनेकदा सजीवांचा आत्मा, नैसर्गिक घटक किंवा अगदी रोजच्या वस्तू यातील चैतन्याचे प्रतीक असतात. अशा प्रतिमांद्वारे त्यांच्या घरांमध्ये, कुटुंबातील पूर्वजांचे आत्मे राहतात अशी त्यांची श्रद्धा आहे, आणि घरगुती वातावरणाचा ते अविभाज्य भाग असतात. अशाप्रकारे प्रतिमांद्वारे परलोकातील रहिवासी इहलोकतील रहिवाश्यांबरोबर सुसंगतपणे राहतात.
समाज
निकोबारी लोकांमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. १९४१-४२ मध्ये तेव्हाच्या कुटुंब प्रमुख इस्लॉन यांनी नॅनकोवरीचे तहसीलदार मेवालाल यांच्याशी लग्न केले व त्यामुळे निकोबार बेटांमधील त्या सर्वात प्रभावशाली नेत्या झाल्या.
निकोबार बेटांवर, पुरुष आणि महिलांना साधारणपणे समान दर्जा आहे. स्त्रिया त्यांचे पती निवडू शकतात आणि लग्नानंतर त्या स्वतःच्या किंवा पतीच्या पालकांबरोबर राहण्याचा निर्णय करु शकतात. निकोबारी पुरुष महिलांच्या आर्थिक सामर्थ्याला ओळखून असतात, कारण महिला केवळ घरगुती कर्तव्येच सांभाळत नाहीत, तर शेती, मळे आणि बागेकडेही लक्ष देतात.
बेटांवरील नियोजित भागातील गावांमध्ये यांच्या झोपड्या तुरळकपणे विखुरलेल्या असतात. झोपड्या साधारणपणे गोल आकाराच्या व घुमटा सारख्या छपराच्या असतात. या झोपड्या जमिनीपासून उंचीवर असतात व आत जाण्यासाठी शिड्यांचा वापर करावा लागतो. सुरक्षेच्या दृष्टीने त्यातील रहिवासी रात्री झोपड्यांमध्ये चढल्यावर शिड्या वर ओढून घेतात.
अर्थव्यवस्था
निकोबारी लोकांची पारंपारिक बागायती अर्थव्यवस्था आहे; नारळ, पांडनस, सुपारी, केळी, आंबा आणि इतर फळे यांचे उत्पादन हा त्यांचा प्रमुख आर्थिक आधार आहेत. या शिवाय शिकार करणे, मासेमारी, डुकरांना पाळणे, मातीची भांडी आणि कनू बनवणे इत्यादी व्यवसाय ते करतात.
अनेक वृद्ध निकोबारी निरक्षर आहेत, तथापि आज तरुण निकोबारींना सरकारमार्फत मोफत शिक्षण मिळते. निकोबारी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार होत आहे आणि आता ते अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये डॉक्टर, शिक्षक, पोलीस आणि कारकून यासारख्या इतर व्यवसायांमध्ये दिसतात. [२] [३]
उल्लेखनीय लोक
- डेबोरा हरॉल्ड - सायकल पटू
- जॉन रिचर्डसन - बिषप व राजकारणी, अंदमान निकोबार द्वीपसमूहाचे लोकसभेतील पहिले खासदार
हे सुद्धा पहा
- अंदमानी लोक
संदर्भ
- ^ "List of notified Scheduled Tribes" (PDF). Census India. p. 27. 7 November 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 15 December 2013 रोजी पाहिले.
- ^ Saini, Ajay (24 October 2015). "Post-Tsunami Humanitarian Aid: A Trojan Horse in the Southern Nicobar Islands". Economic and Political Weekly. 50 (43): 52–59.
- ^ Saini, Ajay (1 August 2015). "A Decade of Disaster and Aid in Nicobar". Economic and Political Weekly. 50 (31).