नारायणराव घोरपडे
बाबासाहेब घोरपडे ऊर्फ नारायणराव घोरपडे (इ.स. १८७०:करकंब, महाराष्ट्र - इ.स. १९४३) याचे पाळण्यातले नाव गोपाळ जोशी करकंबकर होत. इचलकरंजीचे तत्कालीन संस्थानिक गोविंदराव ऊर्फ आबासाहेब घोरपडे हे निपुत्रिक होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पद्मावती बाई यांनी संस्थानाच्या गादीला वारसा म्हणून पंधरा मुलांमधून देखण्या व चुणचुणीत गोपाळ जोशीची निवड केली आणि त्याला १० ऑगस्ट १८७६ रोजी दत्तक घेतले आणि गोपाळ जोशी हे नारायणराव (बाबासाहेब) घोरपडे झाले व पुढील काळात इचलकरंजीचे संस्थानिक झाले.
घोरपडे घराण्याच्या परंपरेनुसार बाबासाहेब घोरपडे यांनी रीतसर शिक्षण घेतले. आधी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात व नंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. लहान वयांतच त्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथांच्या वाचनाची आवड होती. कॉलेजात गेल्यानंतर त्यांचे वाचन अधिक प्रगल्भ झाले. तसेच पुढे त्यांनी एल.एल.बी.ची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर १८ जून १८९२ रोजी त्यांना संस्थानाची मुखत्यारी देण्यात आली.
विद्यार्थिदशेत असताना बाबासाहेब घोरपड्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले होते. लोकमान्य टिळकांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. इचलकरंजीच्या संस्थानिकपदाची सूत्रे हाती पडल्यावर त्यांनी आपल्या प्रजाजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक उन्नतीकडे लक्ष दिले.
शिक्षणप्रसार
त्यांच्या कारकिर्दीत संस्थानच्या खर्चाने चालणाऱ्या शाळांची संख्या त्यांनी १७ वरून ४७ पर्यंत नेली. त्यात ५ शाळा मुलींसाठी होत्या. होतकरू विद्यार्थ्यांना / विद्यार्थिनींना विविध कॉलेजात शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी शिष्यवृत्त्या ठेवल्या. त्याचा लाभ घेऊन इचलकरंजीतील अनेक विद्यार्थी पुण्यातील विविध कॉलेजात शिकले. अनेक मुली हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत शिकल्या. आजही ह्या संस्थेत 'इचलकरंजी' सभागृह आहे.पुणे येथील महाराष्ट्र मंडळात कुस्ती शिकण्यासाठी सुद्धा ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन पाठवत असत.१९१४ साली पहिली परदेश सफर करून आल्यावर त्यांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याकरता 'इचलकरंजी एज्युकेशन एन्डोमेंट फंड' स्थापन केला. त्यातून विद्यार्थ्यांना कर्जाऊ शिष्यवृत्त्या देण्यात येत असत. भारतातील निरनिराळ्या शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांना दिलेल्या देणग्या आपल्या पश्चातसुद्धा सुरू राहाव्यात म्हणून १९३१ साली 'इचलकरंजी एज्युकेशन अँड चॅरीटेबल ट्रस्ट' हा दुसरा ट्रस्ट रजिस्टर केला. त्यांनी इचलकरंजीमध्ये वाचनालये सुरू केली. वेदशाळा स्थापन केली. आर्यवैद्यक शिकणाऱ्यांना ते शिष्यवृत्या देत असत.[१] अशाच शिष्यवृती धारकांपैकी एक गोविंद आप्पाजी फडके पुढे सातारा येथील आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.
विवाह
अहमदनगरचे वकील मोहनीराज मोरेश्वर परांजपे यांची कन्या दुर्गाबाई यांच्याशी बाबासाहेबांचा विवाह फाल्गुन वद्य ८ शके १८०७ ता. २८ मार्च सन १८८६ या दिवशी झाला. दुर्गाबाईंचे सासरचे नांव गंगाबाई असे ठेवण्यात आले. त्या माईसाहेब किंवा गंगामाई साहेब म्हणून ओळखल्या जात. त्यांनी इचलकरंजीमध्ये स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. इचलकरंजी येथे गंगामाई विद्यामंदिर आणि श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल या दोन शाळांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे.[२]
आरोग्यसुविधा
लोकांना फुकट औषधे मिळावीत म्हणून नारायणरावांनी इचलकरंजी आणि आजरा येथे दवाखाने काढले.
संगीतशिक्षणास प्रोत्साहन
बाबासाहेबांना संगीतात विशेष रुची होती. संगीतातले बारकावेही त्यांना कळत असत. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व महाविद्यालयास बाबासाहेबांनी आर्थिक मदत केली.तसेच इचलकरंजीतील काही मुलांना गायन शिकण्यासाठी या संस्थेत पाठवले. उत्तर हिंदुस्थानी गायकी महाराष्ट्रात आणणारे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांना बाबासाहेबांनी राजाश्रय दिला.इचलकरंजीला स्थायिक झाल्यावर पंडित बाळकृष्णबुवांनी त्यांचे चिरंजीव अण्णाबुवा, मिर्शीबुवा,भाटेबुवा, दत्तोपंत काळे असे अनेक शिष्य तयार केले. सुप्रसिद्ध गायक अब्दुल करीम खॉं साहेब यांना इचलकरंजी संस्थानातील नवरात्रोत्सव कार्यक्रमात दरवर्षी गाण्यासाठी आमंत्रण असे.
बाबासाहेबांनी इचलकरंजी संस्थानात सर्व प्रकारच्या कलावंतांना उदार आश्रय दिला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शाहूनगरवासी मंडळी, महाराष्ट्र नाटक मंडळी, किर्लोस्कर, गंधर्व या नाटक मंडळ्या अतिशय जोमात होत्या. या नाटक मंडळींना इचलकरंजी संस्थानात आग्रहाचे आमंत्रण देऊन बोलावण्यात येत असे, व त्यांची नाटके जनतेसाठी म्हणून लावली जात.
बालगंधर्वांची सिंधूची भूमिका असलेले गडकऱ्यांचे एकच प्याला हे घोरपड्यांचे आवडते नाटक होते. शोकपर्यवसायी असले तरी बालगंधर्वांचा स्वर ऐकण्यासाठी बाबासाहेब ते नाटक पुन्हा पुन्हा पहात. बाबासाहेबांनी जर प्रत्यक्ष नाटकात अभिनय केला नसला तरी ते एक मर्मज्ञ प्रेक्षक होते.
उद्योगांना प्रोत्साहन
इचलकरंजी येथे बाबासाहेबांनी काही कोष्टी कुटुंबे आणली. त्यांना राहायला जागा आणि प्रारंभी आर्थिक मदत देऊन कापड विणण्याचा त्यांचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले.विठ्ठलराव दातार यांना कापडगिरणी काढण्यासाठी मदत केली. पुढे काही उद्योजकांना जिनिंग फॅक्टरी सुरू करण्यासाठी जागा दिली.यानंतर पुढे अनेक लोकांनी यंत्रमागावर कापड विणण्यासाठी कारखाने काढली आणि इचलकरंजी 'वस्त्रनगरी' म्हणून नावारूपास आली. एखादा उद्योग सुरू केल्याशिवाय इचलकरंजीची भरभराट होणार नाही, असा विचार करून त्या दृष्टीने उद्योजकांना मदत करण्याच्या बाबासाहेबांच्या धोरणामुळेच वस्त्रोद्योगाचा पाया बाबासाहेबांच्या कारकिर्दीत रचला गेला.
बाबासाहेब घोरपडे उत्तम वक्ते नव्हते, तरी ते अनेक संस्थांच्या कार्यक्रमांत अध्यक्ष असत. कायदे कौन्सिलचे मेंबर म्हणून त्यांनी १४-१५ वर्षे चांगले काम केले. त्यांनी फारसे लेखन केले नसले तरी, उतारवयात बाबासाहेबांनी काही इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे केली; किर्लोस्कर, सह्याद्री इत्यादी नामवंत मासिकांमधून त्यांनी थोडेफार स्फुट लेखन केले. त्याच बरोबर ब्रिटिश संस्कृतीने प्रभावित होऊन तिचे गुणगान करणारे एक स्वतंत्र पुस्तकही लिहिले.
नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी लिहिलेली पुस्तके
- ब्रिटनने हिंदुस्थानासाठी काय केले आहे? - (सन १९१३ मध्ये पुण्यातील आर्यभूषण छापखान्यात रा.नटेश अप्पाजी द्रविड यांनी छापून प्रसिद्ध केले.)
- श्रीमंत नामदार नारायणराव बाबासाहेब यांनी तारीख २० जून १९०८ रोजीच्या कायदेकौन्सिलच्या बैठकीत केलेले भाषण आणि विचारलेले प्रश्न आणि त्यास मिळालेली उत्तरे
- प.लो.मिस व्हायओलेट क्लार्क यांच्या Leaves पुस्तकाचे भाषांतर - (सन १९१३ मध्ये मुंबईतील निर्णयसागर छापखान्यात छापले)
ही पुस्तके आपटे वाचन मंदिर या इचलकरंजी येथील वाचनालयाच्या संदर्भ विभागात उपलब्ध आहेत.
सन्मान
बाबासाहेब घोरपड्यांसारख्या अशा एका कलाप्रेमी व नाट्यप्रेमी संस्थानिकाला सांगली येथे १९२४ साली झालेल्या २०व्या मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचे सद्भाग्य लाभले.
स्मारके
नारायणरावांच्या दहनस्थळी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या घाटावर स्मृतीस्थळ बांधण्यात आले आहे. इचलकरंजी नगरपालिकेने बांधलेल्या नाट्यगृहाला त्यांच्या स्मृत्यर्थ नारायणराव बाबासाहेब नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९५ - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-09-15 रोजी पाहिले.
- ^ "पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९४ - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-09-15 रोजी पाहिले.