Jump to content

नारायण भिकाजी परुळेकर

नारायण भिकाजी परुळेकर
जन्मसप्टेंबर २०, इ.स. १८९७
मृत्यूजानेवारी ८, इ.स. १९७३
प्रसिद्ध कामेसकाळ

डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, (सप्टेंबर २०, इ.स. १८९७ - जानेवारी ८, इ.स. १९७३) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते.
'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

जीवन

भारतात आगमन

इ.स. १९२९ साली नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले.

नानासाहेबांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली.

खरे तर भारतात परतल्यावर तेव्हा सुरू असलेल्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घ्यायचा विचारही त्यांच्या मनात होता; पण पत्रकारितेकडे वळाण्याची काही खास कारणे होती. आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती, आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते. दुसरे म्हणजे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते. लोकमान्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि 'केसरी'मार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा नानासाहेबांवर प्रभाव होता. त्यांचा पिंड हा सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता. त्यामुळे नानासाहेबांची पत्रकारिताच करण्याचे निश्चित केले.

नानासाहेब भारतात परतले तो काळ राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हते. मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती. इंग्रजीला सरकारदरबारीही महत्त्व होते. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते; कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते. समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती.आपले व्रतपत्र सुरू करण्यासाठीसूचना मागवल्या व या व्रतपत्राचे नाव सुचवण्यासाठी स्पर्धा घेतली.लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची ४००० नावे सुचवली. त्यातून परुळेकरानी फग्युसनच्या काशिनाथ लक्षमन भिडे या विध्यार्थाने सुचविलेले सकाळ हे नाव स्वीकारले.

दैनिक सुरू करण्यामागील भूमिका

दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्त्विक चर्चा न करता, त्यावर बोजड भाषेत लेख न लिहिता, आसपास घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. असे केल्याने ते दैनिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले तरच आगामी काळात तगणार होते.

नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले. त्यांना असे दिसून आले की, वाचकांना तपशीलवार तर सोडाच, ताज्या बातम्याही मिळत नाहीत. मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचे होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या नानासाहेबांच्या उद्देशाला हा हेतू पूरकच होता. वृत्तपत्र सुरू करताना पारंपरिक वाचकवर्गाकडे न वळता ते नवीन वाचकवर्ग तयार करण्याच्या कामी लागले. त्यासाठी धोरण आखतानाच त्यांनी वृत्तपत्राचे स्वरूप वार्ताभिमुख ठेवले. दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले. वाचकांना ताज्या बातम्या देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे; शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त; न्यायालये, पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यांवर नानासाहेबांनी भर दिला. ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांमध्ये वार्ताहर नेमले. मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधीची नेमणूक केली. वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासाहेबांनी त्याच्या रचनेत, मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. आजची पत्रकारिता ही अशाप्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी राहिली.

उत्तरोत्तर प्रगती करताना त्यांच्या 'सकाळ'ने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परदेशांतील निवडणुका, ऑलिम्पिक सामने, घोड्यांच्या शर्यती, बाजार, ललित कला, संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ' लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाचा मित्र झाला.

सुरुवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ नानासाहेबांना नव्हते. त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मानली नाही; त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती. काही स्नेहीजनांनी मदतीचा हात पुढे केला, तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले. केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे त्यांना खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागले. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोके वर काढत. नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी केला.

'सकाळ'नंतर

'सकाळ' सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसांतच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले.

मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस-चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले; मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करीत असत. या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला.

नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले. अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असे मानून त्यांनी नव्याने व्यवसायाची नौका हाकारली; म्हणूनच त्यांचे नाव आज यशस्वी संपादकांच्या मांदियाळीत घेतले जाते.

पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता! त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले, तरी त्यात व्यावसायिकता आणली. त्याचबरोबर धंदेवाईकपणा दूर ठेवला. बांधावरच्या शेतमजुरालाही त्याच्या अस्तित्वाशी निगडित बातम्या पुरवून त्यांनी आपले दैनिक सर्वव्यापी केले. ते स्वतः वृत्तपत्राचे चालक, मालक, व्यवस्थापक आणि संपादक होतेच, पण आपला वृत्तसंपादकाचा बाणा त्यांनी कायम जागता ठेवला. आलेली प्रत्येक बातमी डोळ्यात तेल घालून तपासली आणि बातमीदारांमध्ये बातम्यांसंदर्भातली विशेष जाण विकसित केली. नानासाहेब हे यशस्वी संपादक तर होतेच, पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे, त्यातील अनावश्यक भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला कालसुसंगत तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते. नानासाहेब परुळेकर यांना अमेरिकेत अनेक नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या. मात्र वृत्तपत्र काढून मला माझ्या देशाची सेवा करायची आहे. या भावनेतून नानासाहेब परुळेकर यांनी भारतात परतून सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.