नारायण आश्रम
नारायण आश्रम ही ग्रामीण पुनर्रचना व शिक्षण यांसाठी काम करणारी कोकणातील कोळोशी गावातली स्वयंसेवी संस्था आहे. याची स्थापना १९९४ साली झाली.
स्थळ
राष्ट्रीय महामार्गा ६६ वरून नांदगाव तिठ्यावरून देवगडच्या दिशेत प्रवास सुरू केला की ७-८ कि.मी.वर कोळोशी हे गाव लागते.
स्थापना
डॉ. शरदचंद्र शंकर कुळकर्णी तथा भाईकाका यांचे कोळोशी हे जन्मगाव. डॉ. कुळकर्णी हे नारायण आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष होत. एम.ए. एल्एल.बी.झाल्यावर कुळकर्णी यांनी १९६२ मध्ये अमेरिकेतील पेरू विद्यापीठातून मानससंख्याशास्त्र (Psycometry) या विषयातील पीएच.डी. प्राप्त केली. NIBM (पूर्वीचे IBPS) या संस्थांमध्ये ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून कार्य केलेले डॉ. कुळकर्णी दिल्लीतील एनसीईआरटीतही प्राध्यापक होते. UNESCO, UNICEF, IMF या आंतरराष्ट्रीय संस्थांमधूनही त्यांनी अध्यापन व संशोधनाचे कार्य केले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व मानाची पदे उपभोगून झाल्यावर वयाच्या सहासष्टाव्या वर्षी डॉ. कुळकर्णी त्यांच्या पत्नी सौ. सुधाबरोबर कोळोशीत परत आले.
जलसंधारणाचा प्रयोग
पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वैद्यकीय सेवांची कमतरता हे कोळोशीपुढील प्रमुख प्रश्न. १९९२ च्या मे महिन्यात भाईकाका कोळोशीत आले तेव्हा कोकणातल्या बहुसंख्य गावांप्रमाणेच इथलेही जलाशय आटलेले होते. पाणी हे जीवन आहे व हा जटिल प्रश्न सोडवला तर अनेक प्रश्न सोपे होतील हे जाणून नारायण आश्रमाने प्रथम या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. स्थानिक पातळीवर टोपोग्राफिक्स मॅप्स उपलब्ध होत नाहीत हे लक्षात आल्यावर भाईकाकांनी हैद्राबाद येथील केंद्रीय संस्थेतून कोळोशी गावाचा टोपोग्राफिक्स नकाशा मिळवला. जलसंवर्धनासाठी प्रयत्नकेले. पाझर तलाव अस्तित्वात आला आणि याचे दृश्य परिणाम दिसू लागले. विहिरींची भूजल पातळी वाढली, नाल्यांना पाणी दिसू लागले. पुढील वर्षांत कोळोशीतल्या स्त्रियांना कुठल्याही एप्रिल-मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही.
आरोग्यविषयक काम
आरोग्य क्षेत्रात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, अपंगांसाठी कृत्रिम पाय बसविण्याचे शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी/ स्त्रियांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर, महिलांसाठी बाल-माता संगोपन शिबिर असे अनेक उपक्रम नारायण आश्रमाने आयोजित केले.
शिक्षण आणि स्त्रीशक्ती जागरण
जलसंवर्धन आणि आरोग्य याबरोबरच शिक्षण आणि स्त्री-शक्ती जागरण या आणखी दोन महत्त्वाच्या क्षेत्रांना आश्रमाने प्राधान्य दिले. महाविद्यालयीन युवक-युवतींची श्रम-शिबिरे, शिरगाव हायस्कूलसाठी NITIच्या सहकार्याने ’Hole in the wall’ Archived 2007-10-13 at the Wayback Machine.हा अनौपचारिक संगणकीय शिक्षणाचा उपक्रम, मुलामुलींसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, शिक्षकांसाठी पर्यावरण कार्यशाळा आदींचे आयोजनही नारायण आश्रमाने सातत्याने केले आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्लीचेही नारायण आश्रम हे केंद्र आहे.
नारायण आश्रमातर्फे विज्ञान जाणिवा विकसित करण्यासाठी ‘लोक-विज्ञान मंच’ व शालाबाह्य विकासासाठी ‘स्वाध्यायगृह’ ही नवीन संकल्पनाही राबवली जात आहे.
महिला सबलीकरण हा भाईकाकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. स्त्रीच्या अंगभूत व्यवस्थापन कौशल्यावर व सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या तिच्या क्षमतेवर भाईकाका संपूर्ण विश्वास टाकतात. अंगणवाडी शिक्षिकांसाठीचा अभ्यासक्रम, आरोग्यसेविका अभ्यासक्रम, शिलाई वर्ग नारायण आश्रमाने सुरू केले. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रुग्णसाहाय्यक व आरोग्यमित्र अभ्यासक्रमांसाठी नारायण आश्रम हे अभ्यासकेंद्र आहे.