Jump to content

नामदेव ढसाळ

नामदेव ढसाळ
जन्म नाव नामदेव लक्ष्मण ढसाळ
जन्मफेब्रुवारी १५, इ.स. १९४९
पुणे जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू १५ जानेवारी, २०१४ (वय ६४)
बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म नवयान बौद्ध धर्म
कार्यक्षेत्र कवी, लेखक, समाजसुधारक, दलित बौद्ध चळवळ
साहित्य प्रकारकविता
विषयविद्रोही कविता
चळवळ दलित पॅंथर
प्रसिद्ध साहित्यकृती गोलपिठा
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध
वडील लक्ष्मण ढसाळ
पत्नीमल्लिका अमर शेख
अपत्ये पुत्र:
कन्या:
पुरस्कार

महाराष्ट्र राज्य पुरस्कार - (गोलपीठा) १९७२

  • सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार - १९७५-७६
  • महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार - १९८३
  • पद्मश्री पुरस्कार - १९९९
  • बहिणाबाई चौधरी पुरस्कार
  • पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार
  • साहित्य अकादमी स्वर्णजयंती: जीवनगौरव पुरस्कार - २००५
  • गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार - २००६
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
  • बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९

नामदेव लक्ष्मण ढसाळ (फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ - जानेवारी १५, इ.स. २०१४) हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली.

जीवन

नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी इ.स. १९४९ रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेरसरशेजारच्या पूर या खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपीठा या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.

इ.स. १९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित झाला. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित, तर प्रियदर्शिनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तसेच खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.

दलित चळवळ

ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धी दिली. महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या 'दलित पॅंथर' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेची स्थापना त्यांनी इ.स. १९७२ मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांसह केली. या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीचा प्रभाव होता. या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले. कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ हे दलित पॅंथरमध्येच राहिले मराठवाडा विद्धयापीठ नाम विस्तारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दलित चळवळीला त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.

साहित्यशैली

नामदेव ढसाळ हे इ.स. १९६० नंतरच्या मराठी कवींमधील प्रमुख कवी समजले जातात. त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली. त्यांनी भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या कृतींमध्ये वेदना,विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव आहे.

निधन

नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. सोमवार जानेवारी १३, इ.स.२०१४ रोजी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवार, १५ जानेवारी इ.स. २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गुरुवार,१६ जानेवारी २०१४ सकाळी ११ वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[]

साहित्यकृती

नामदेव ढसाळ यांच्या साहित्यकृती खालीलप्रमाणे आहेत.

कविता संग्रह

  1. आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी (१९७६)
  2. खेळ (१९८३)
  3. गोलपिठा (१९७२)
  4. तुझे बोट धरून चाललो आहे मी
  5. तुही इयत्ता कंची (१९८१)
  6. मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे
  7. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
  8. या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
  9. मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
  10. गांडू बगीचा
  11. निर्वाणा अगोदरची पीडा

चिंतनपर लेखन

  1. सर्व काही समष्टीसाठी
  2. बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न
  3. आंबेडकरी चळवळ
  4. आंधळे शतक
  5. दलित पॅंथर- एक संघर्ष (हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्‍यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झाले.)


कादंबरी

  1. निगेटिव्ह स्पेस
  2. हाडकी हाडवळा
  3. उजेडाची काळी दुनिया


नाटक

  • अंधार यात्रा

ढसाळांवरील पुस्तके

ढसाळ यांच्या जन्मदिनी दरवर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरुनगर, (पुणे) व ग्रामपंचायत पूर यांच्या संयुक्त विद्यमाने "पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळा, काव्यप्रतिभा पुरस्कार व कविसंमेलन..." आदी भरगच्च कार्यक्रम जन्मभूमी खेड तालुक्यात आयोजित केले जातात.मसापचे कार्यवाह व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने दरसाल किमान २५०००/— रु. निधी कायमस्वरुपी मंजूर करून घेतला आहे.

स्मृती गौरव समिती

नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने वैभव छाया आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती'ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकूण आयुष्याला सलाम करणारा सारे काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी मुंबई येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाट्यरूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, त्यांची शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट-लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सारं काही समष्टीसाठी

सारं काही समष्टीसाठी हा ढसाळांच्या सन्मानार्थ आयोजित केला जाणारा एक महोत्सव आहे. समष्टीचा ढोबळ अर्थ म्हणजे सर्वांसाठी. परंतु कवी वैभव छाया हे नामदेव ढसाळांच्या काव्य पंक्तीतून अर्थ सांगतात, ती हीच खरी समष्टी या संकल्पनेची उत्पत्ती, व्युत्पत्ती आणि व्याख्या असावी.

हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे.

अनामवेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये
काळा गोरा म्हणू नये तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी कांडून खावा माणसावरच सुक्त रचावे

माणसाचेच गाणे गावे माणसाने.

पुरस्कार व सन्मान

  • महाराष्ट्र राज्य पुरस्कार - (गोलपीठा) १९७२
  • सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार - १९७५-७६
  • महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार - १९८३
  • पद्मश्री पुरस्कार - १९९९
  • बहिणाबाई चौधरी पुरस्कार
  • पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार
  • साहित्य अकादमी स्वर्णजयंती: जीवनगौरव पुरस्कार - २००५
  • गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार - २००६
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
  • बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९

ढसाळांच्या नावाचे पुरस्कार

  • साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दर वर्षी ’द बुक गॅलरी’ आणि ’मुक्त शब्द’ यांच्या वतीने ’शब्द साहित्य पुरस्कार दिले जातात. इ.स. २०१४ सालापासून ’नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार दिला जातो. त्या सालचा पहिला ढसाळ शब्द पुरस्कार हिंदी कवी विष्णू खरे यांना जाहीर झाला आहे.
  • नामदेव ढसाळ स्मृती गौरव समितीच्या वार्षिक कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते. इ.स. २०१६ रोजी पहिला पुरस्कार आंबेडकरी कवी लोकनाथ यशवंत यांना मिळाला होता. हा पुरस्कार देण्यासाठी नागराज मंजुळे, उदय प्रकाश उपस्थित होते.[]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "नामदेव ढसाळ यांचं निधन -Maharashtra Times". Maharashtra Times. 2014-01-15. 2014-01-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-21 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, एबीपी माझा वेब. "सारं काही समष्टीसाठी, ढसाळांच्या आठवणींचा जागर". 2017-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-21 रोजी पाहिले.