Jump to content

नामदेव

संत नामदेव
मूळ नावनामदेव दामा रेळेकर
समाधिमंदिरपंढरपूर
संप्रदायनाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय
गुरूविसोबा खेचर
शिष्यचोखामेळा
भाषामराठी
साहित्यरचनाशब्दकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति कविता
व्यवसायशिंपी, समाजजागृती
वडीलदामा शेट्टी
आईगोणाई

संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ला झाला.

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी "पायरीचा दगड" होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.

नामदेवांसंबंधी आख्यायिका

  • नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला.
  • कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
  • एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.

नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य

  • घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)
  • संत नामदेव:समाजशास्त्रीय अभ्यास (श्यामसुंदर मिरजकर)
  • चिरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव (सुभाष कि. देशपांडे)
  • आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर)
  • नामदेव गाथा (संपादक : नाना महाराज साखरे)
  • नामदेव गाथा (संपादक : ह.श्री. शेणोलीकर)
  • संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग)
  • संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
  • श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
  • श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी)
  • श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत)
  • श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर)
  • श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)
  • संत नामदेव (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत नामदेव चरित्र (बालवाङ्‌मय, शैलजा वसेकर)
  • संत नामदेवांचे कवित्व आणि संतत्त्व (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • संत शिरोमणी बाबा नामदेव (दीपक बिचे)
  • नामदेवजी` ... 'शिरोमणी भगत नामदेवजी : संक्षिप्त इतिहास (हिंदी)
  • संत तुकाविप्र यांनी संत नामदेव यांच्यावर अनेक अभंग रचले आहेत त्यातील काही येथे दिले आहेत
  • नामदेव संत प्रसिद्ध प्रेमळ | विठ्ठल निर्मळ अवतार गोणाईच्या पोटी भक्तिसाठी देव | जाले संतराव जनतारू

तुकाविप्र म्हणे ऐसाची विठ्ठल | जन्म घेत आहे युगायुगी

  • नामदेव ऐसा भक्त कलयुगी | प्रमाण त्रिजगी दुजा नाही निरुपम नामा देवा आवडता | तयासी समता नाही दुजा शतकोटी ग्रंथ अभंग वदला | शिरोमणि जाला भक्त एक तुकाविप्र म्हणे धन्य नामदेव | कलीत वैष्णव ज्ञान सिंधु

नामदेवांची स्मारके

  • महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात.
  • पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
  • पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
  • पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
  • हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी संत नामदेवांचे एक मोठे स्मारक आहे.

काव्याचा नमुना

  • अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अकिला मी दास तुझा, सर्वेची झेपावे, पक्षिणी पिली पडताचि धरणी भुकेले वत्सरावे, धनु हुंबरत धावे वानदा नाग ...नामदेव

बाह्य दुवे