Jump to content

नानी पालखीवाला

नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला

जन्म१६ जानेवारी १९२०
मुंबई, भारत
मृत्यू११ डिसेंबर २००२
नागरिकत्वभारतीय
धर्मपारशी
कार्यक्षेत्रअर्थशास्त्र

बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला हे भारतातील कायदेपंडित, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्‍ज्ञ होते. त्यांची भारताच्या अर्थसंकल्पांवरची दरवर्षीची भाषणे अत्यंत लोकप्रिय होती. ही भाषणे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमसारख्या मोठ्या मैदानांवर व्हायची. भाषणे ऐकायला पांढरपेशा सुशिक्षित श्रोत्यांची गर्दी होत असे. नानी पालखीवाला यांनी इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या कालावधीत भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणूनही काम पाहिले. भारत सरकारने त्यांना १९९८ साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.

जीवन

नानींचा जन्म मुंबई येथे १९२० साली एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूल व सेंट झेविअर हायस्कूल येथे झाले. मुंबई विद्यापीठात लेक्चरर म्हणून नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती. पण तेथे त्यांची निवड झाली नाही. मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून त्यांनी पुढे शिकत राहण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत सगळीकडचे प्रवेश बंद झाल्यामुळे नाइलाजाने त्यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण लवकरच त्यांच्या लक्षात आले आपल्याला कायदा हा विषय आवडतो आहे. १९४४ साली त्यांनी कायद्याची सनद घेतली व नंतर ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले.