नाट्यशास्त्र
नाट्याची व्याख्या
"लोक- वृत्त-अनुकरणं नाट्यम" "नाटय म्हणजे अनुकरण" संदर्भ:- १.भरताचे नाट्यशास्त्र (इसवी सन पूर्व ५०० ते इसवी सन ३००)
अमरकोष(पाचवे शतक):- "तौर्य त्रिकं नृत्य- गीत - वाद्यं नाट्यम"
संदर्भ:- "श्रीमदभरतमुनिप्रणीतम नाट्यशास्त्रम"- (सं) मधुसूदन शास्त्री भाग-१ ,पृष्ठ.१८.
इतिहास
भारतातील नाट्य
भासाचे नाट्यशास्त्र
भरतमुनींचे नाट्यशास्त्र
भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राई निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे. त्यांच्याच नावामुळे भरताचे भारत हे या भूमीचे नामकरण झाले असावे असे म्हणतात.भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती केली, या ग्रंथाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की इसवी सनाच्या पूर्वार्धापासून भारतामद्धे नाट्यकला ही प्रगतीशील अवस्थेत पोहोचली होती, त्यामद्धे केलेले रंगमंचाचे व नाट्यगृहाचे वर्णन किंवा आराखडा आपण आजही वापरतो, ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून ज्ञान व अथर्ववेदातून रस घेऊन ब्रम्हदेवाने हा पाचवा वेद निर्माण केला आहे असे भरतमुनींनी लिहिले आहे, भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्य शास्त्रात अंगिक, वाचिक, भाविक व आहार्य या अभिनय प्रकारांची माहिती तर दिलेली आढळतेच पण सोबतच नृत्य शास्त्रावर देखील सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. रस, नाटकातील पात्रे, रंगमंदिराचे वर्णन, रंगमंचाचा आकार, प्रेक्षागृह, रंगभूषा व वेशभूषेसाठी जागा तसेच प्रवेश करण्यापूर्वी पात्रांना लागणारा आडोसा याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आढळतो, नाटकामद्धे काय काय वर्ज्य असावे याबाबतही भरत मुनींनी लिहून ठेवलेले आहे.
"भरतमुनीकृत अष्टनायिका":-
अष्टनायिकांची सर्वप्रथम चर्चा इसवी सनाच्या ५ व्या शतकात आचार्य भरतमुनींनी केली. नाट्यातील प्रमुख स्त्री-पात्र आणि प्रमुख पुरुष-पात्र यांना अनुक्रमे ‘नायिका’ व ‘नायक’ असे म्हणतात. ह्या नायिकेचे आपल्या प्रिय व्यक्तीशी मिलन अथवा वियोग यांतून निर्माण होणाऱ्या आठ अवस्था म्हणजे ‘अष्टनायिका’. हे नायिकांचे आठ प्रकार पुढीलप्रमाणे:-
1.वासकसज्जा:- अलंकार घालून प्रियकराच्या स्वागतास सज्ज अशी स्त्री म्हणजे ‘वासकसज्जा’. जी स्त्री कामक्रीडेसाठी आतुर होऊन वस्त्र-आभूषणांनी सुसज्ज होते आणि प्रसन्नतेने प्रियकराची वाट बघते (अथवा पतीची वाट बघते) स्वतः बरोबरच ती घरदेखील सजवून ठेवते. नायिकेच्या श्रुंगाराविषयी सांगताना भरतमुनी सांगतात,
“गन्धमाल्ये गृहीत्वा तु चूर्णवासस्तथैव च आदर्शो लीलया गृह्यश्छ्न्दतो वा पुनः पुनः”
म्हणजे- तिने आपल्या घरात चंदन, पुष्पमाला अथवा अबीर, सुगंधित पटवास नायकासाठी तयार ठेवून आपला शृंगार करावा.पद, जावळीतील वासकसज्जा नायिकेच्या अवस्था वर्णनांमध्ये ह्यांचा उल्लेख बरेचदा सापडतो.
2.विरहोत्कांठीता:- वियोगामुळे वेदनामय होणारी. जिचा पती अथवा प्रियकर अनेक कामांच्या व्यापांमुळे वेळेत न येऊ शकल्यामुळे दुःखी होते.
3.स्वाधीनभर्तृका:- ह्यातील ‘भर्तु’ शब्दाचा अर्थ- पती. यावरून,ज्या स्त्रीच्या रति आदि व्यवहारांनी आकर्षित होऊन जिचा पती तिच्या स्वाधीन असतो अशी हर्षभरीत, सौभाग्यशाली व अभिमानशाली नायिका असे स्वाधीनभर्तृकेचे वर्णन भरतांनी केले आहे. रति आदि व्यवहार म्हणजेच तिचे रूप, सौंदर्य आणि यौवन.
4.कलहान्तरिता:- कालाहाच्या अंती नायिकेची होणारी अवस्था.इर्षा आणि भांडण यांनी मनस्ताप-पश्चाताप होऊन जिचा प्रियकर दूर निघून जातो आणि तो परत न आल्याने रागाने जी संतप्त होते अशी नायिका.
5.खंडिता:- शब्दशः अर्थ लक्षात घेतल्यास, खंडित- पतीचे अखंड प्रेम नसल्याने रागावलेली स्त्री. ज्या अर्थी पतीचे आपल्या पत्नीवर अखंड प्रेम नाही त्याअर्थी तो तिच्याशी प्रामाणिक नाही आणि त्याच्या प्रेमाचा भागीदार दुसरी स्त्री असू शकते. म्हणूनच, जिचा पती अन्य स्त्रीशी रममाण होऊन योग्य वेळेत तो न आल्याने त्याची वाट पाहणारी दुःखी नायिका म्हणजे ‘खंडिता’.
6.विप्रलब्धा- विप्रलब्ध:- (फसविलेल्या) प्रियकराने संकेत न पाळल्याने फसवली गेलेली नायिका.विशिष्ट संदेश पाठवूनही किंवा संकेतस्थळावर येण्यास सांगूनही जिचा प्रियकर कोणत्यातरी कारणामुळे तिथे पोहोचू शकला नाही त्यामुळे अपमानित होणारी नायिका.
7.प्रोषितभर्तुका:- जिचा पती विदेशी गेला अशी स्त्री.जिचा पती कोणत्यातरी महत्त्वपूर्ण कामासाठी परदेशी गेलाय आणि त्यामुळे केश-शृंगार ण करता राहणारी ती ‘प्रोषितभर्तुका’.
8.अभिसारिका:- (अभिसार-) :- ठरविलेल्या जागी भेटण्यास जाणारी.मदनाच्या आवेगाने म्हणजेच प्रिय व्यक्तीच्या वियोगाने व्याकूळ होऊन जी कसलीही लाज न बाळगता प्रियकराला भेटण्यास संकेत स्थळावर जाते ती ‘अभिसारिका’.
संदर्भ:- 1. केतकर गोदावरी- भरतमुनींचे नाट्यशास्त्र(प्रथमावृत्ती).
2. त्रिपाठी राधावल्लभ- संक्षिप्तम नाटयशास्त्र,वाणी प्रकाशन, नवी दिल्ली.2009
"अष्टनायिका व प्रकृति भेद:- "
नाट्यशास्त्रातील २४ वा अध्याय ‘सामन्याभिनय’ नंतर भरताने स्त्रीच्या प्रकृतीनुसार भेद ‘वैशिकोपचार’ हा २५ वा अध्याय आणि ‘प्रकृतीविचाराध्याय’ ह्या ३४ व्या अध्यायात प्रस्तुत केले आहे.त्यातील प्रकृतिविचाराध्यायमधील स्वभावानुसार उत्तमा, मध्यमा आणि अधमा ह्या तीन प्रकृति पुढीलप्रमाणे:-
१."उत्तमा प्रकृति स्त्री":- कोमल स्वभाव, चंचलतारहित, हसून बोलणारी, अल्लड, ज्येष्ठांशी आदरपूर्वक बोलणारी, लज्जा व विनययुक्त, रूप, कुळ, शील तसेच माधुर्याने युक्त. गांभीर्य, धैर्य, तेज, विद्यमान आणि स्त्रियांचे सर्वसामान्य गुण असणारी.
२."मध्यमा प्रकृति स्त्री":- उत्तमा प्रकृतीच्या स्त्रीच्या सर्व गुणांनीयुक्त नसून जिच्यात काही दोषही असतात अशी.
३."अधमा प्रकृति स्त्री":- कठोर, दुष्ट स्वभाव, नीचवृत्ती, अपराधी स्वभाव, क्रोधी, घटक, क्रूर, उपकार न मानणारी, आळशी, कलहप्रिय, चुगलीखोर अशा दोषांनीयुक्त.
"नायिकांचे आणखी ४ भेद"-
१.देवी, २.महारानी, ३.कुलांगना आणि ४.गणिका
"गुण-लक्षणे":-
१.धीरा, २.ललिता, ३.उदात्ता, ४.निभृता
अशा प्रकृती, भेद व गुण-लक्षणे सांगितले आहेत.अशाप्रकारे नाट्यशास्त्रात मुख्यत्वे अष्टनायिका व प्रकृति भेद सांगितले गेले आहेत.
संदर्भ:
बाबूलाल शुक्ल शास्त्री-"नाट्यशास्त्र", चौखम्भा संस्कृत संस्थान, चौखम्भा पब्लिकेशन्स, वाराणसी, पृष्ठ क्र. २३८, श्लोक क्र. २३८.
= अनुरूपा
अनुरूपा ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपा व रूपानुसारिणी या तीन पद्धतींबद्दल सांगितले आहे. त्यातील एक पद्धत म्हणजे अनुरूपा होय.
ही संज्ञा सुयोग्य स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडी संदर्भात भरतमुनींनी वापरली आहे. नाटकातील देश, काल, वय, अवस्था आणि भाषेस अनुसरून तरुणाच्या भूमिकेकरिता तरुण, वृद्धाच्या भूमिकेकरिता वृद्ध, स्त्री पात्राकरिता स्त्री व पुरुष पात्राकरिता पुरुष अशी भूमिकेला अनुरूप व्यक्तींची निवड करणे हा उद्देश या पद्धतीत आहे; कारण ती त्या भूमिकेची नैसर्गिक गरज असते. अशा भूमिका वठविणाऱ्या स्त्री-पुरुष पात्रांना भरतमुनींनी अनुरूपता ही संज्ञा दिलेली आहे. त्याचे विवेचन नाट्यशास्त्र या ग्रंथातील पुढील श्लोकात आहे.
स्त्रियस्तु स्त्रीगते भावे पुरुषा: पौरुषे तथा ।
यथावयस्तथा तस्मिन्ननुरूपेति सा स्मृता ।।
(अध्याय ३५, श्लोक २९)
नायिकेची निवड करताना भरतमुनी असे म्हणतात की, ती सुस्वरूप, तरुण, विनयशील स्वभावाची असावी व तिला सुरांचे ज्ञान असावे. तर नटाच्या वा नायकाच्या बाबतीत ते म्हणतात की, नाटकातील पात्रांच्या शारीरिक गुणांना अनुरूप अशी भूमिका नटाला देणे योग्य आहे. त्याचे अंग, प्रत्यंग व्यवस्थित असतील. त्याला रोग नसेल, तो खूप अशक्त किंवा खूप लठ्ठ नसेल, खूप उंचही नसेल आणि खूप ठेंगणाही नसेल. दिसायला तेजस्वी, सुरांचे ज्ञान असणारा, सुंदर व प्रिय वाटावा असा असेल, अशा नटाला देवाची भूमिका योग्य होय आणि धिप्पाड, उंच, विशालकाय, गंभीर स्वराचा, रौद्र स्वभावाचा, भीतिदायक दिसणारा नट राक्षसाच्या भूमिकेसाठी निवडावा असे म्हणले आहे. म्हणजेच नटाच्या-नटीच्या नैसर्गिक गुणांना समोर ठेवून केलेली पात्र निवड ही अनुरूपा पद्धती होय. वर्तमानात ज्याला आपण शारीरिक निवड पद्धती म्हणतो तीच ही अनुरूपा पद्धती होय.
संदर्भ :
१. त्रिपाठी, राधावल्लभ:- 'संक्षिप्तनाट्यशास्त्रम्',
वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, द्वितीयावृत्ती – २००९.
२. शुक्ल, बाबूलाल शास्त्री,:- 'हिंदी नाट्यशास्त्र,' चौखंबा संस्कृत संस्थान, वाराणसी,
प्रथमावृत्ती – १९८५.
कालिदासाचे नाट्यशास्त्र
आधुनिक अभ्याक्रम
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा - नाट्यविषयक सखोल आणि अद्ययावत शिक्षण देणारी ही एक जागतिक दर्जाची नामांकित शिक्षण संस्था आहे.
- मुंबई विद्यापीठ - मुंबई विद्यापीठात ‘थिएटर ऑफ आर्टस्’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो.
- पुणे विद्यापीठ - ललित कला केंद्र अभ्यासक्रम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - या विद्यापीठात नाट्य विषयाचा एक वर्षीय तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा - नाट्यकलेत एम. ए. करण्याची सुविधा
- गोवा कला अकादमी
- भारतेंदू अकादमी ऑफ ड्रामाटिक आर्टस्, लखनौ
- सरस्वती भुवन महाविद्यालय , औरंगाबाद येथे बी.ए.ला ऐच्छिक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेता येतो हे महाविद्यालय बी.ए.ला नाट्यशास्त्र विषय सुरू करणारे पहिले महाविद्यालय
आहे.नाट्यविषयक अतिशय सखोल तसेच उपक्रम शील नाट्य विभाग म्हणून मराठवाड्यात परिचित .
हे सुद्धा पहा
सरस्वती भुवन महाविद्यालय , औरंगाबाद येथे बी.ए.ला ऐच्छिक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेता येतो.
बाह्य दुवे
- भरतमुनींचे नाट्यशास्त्र Archived 2011-11-29 at the Wayback Machine.
- नाट्यशास्त्र विदागारातील आवृत्ती