Jump to content

नाग्विब महफूझ

नाग्विब महफूझ

नाग्विब महफूझ (अरबी: نجيب محفوظ; १० डिसेंबर १९११ - ३० ऑगस्ट २००६, कैरो) हा एक इजिप्शियन लेखक होता. महफूझला १९८८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. महफूझला अरबी साहित्यामधील एक आघाडीचा साहित्यिक मानले जाते. त्याच्या ७० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीदरम्यान त्याने ३४ कादंबऱ्या, ३५० लघुकथा व अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या.

त्यांचा जन्म कैरोच्या अल – जमलीय्या जिल्ह्यात एका सनदी अधिकाऱ्याच्या घरात झाला. मेहफूझ कुटुंब धर्माभिमानी मुस्लिम होते आणि त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर पारंपारिक संस्कार घडवले. १९१९ च्या इजिप्शियन क्रांतीचा महफूझवर प्रभाव होता. महफूझ लहानपणापासून एक उत्सुक वाचक होता आणि हाफिज नाजीब, ताहा हुसेन आणि सलमा मूसा अशा क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वांचा त्याच्या विचारांवर आणि नंतर त्याच्या लिखाणावर प्रभाव होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून महफूझने साहित्यिक लिखाण करण्यास सुरुवात केली. त्याने इजिप्शियन विद्यापीठातून (कैरो युनिव्हर्सिटी) तत्त्वज्ञान ह्या विषयात पदवी मिळविली (१९३४). १९३४ पासून ते १९७१ पर्यंत महफूझ आपल्या वडिलांप्रमाणेच सनदी सेवक म्हणून कार्यरत होता. प्रथम मॉर्टमेन एंडॉवमेंट्स मंत्रालयात नंतर ब्युरो ऑफ आर्टमध्ये अभ्यवेक्षण (सेन्सॉरशिप) संचालक म्हणून, त्यानंतर सिनेमाच्या समर्थनासाठी फाऊंडेशन संचालक म्हणून आणि शेवटी सांस्कृतिक मंत्रालयाचे सांस्कृतिक कार्य सल्लागार म्हणून तो कार्यरत होता. इजिप्शियन नोकरशाहीमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या काळातही त्याच्या साहित्यात बरीच प्रायोगिक सृजनशीलता दिसून आली. तीसहून अधिक कादंबऱ्या, शंभरहून अधिक लघुकथा आणि दोनशेहून अधिक लेख त्याने लिहिले.

द चिल्ड्रेन ऑफ गेबेलावी  किंवा औलाद हारातिनी (१९५९) सह महफूझने एका नवीन दिशेने आपल्या लिखाणाची शैली सादर केली. ज्यातील रूपक आणि प्रतीकात्मक लिखाणात त्याने राजकीय विचार अध्याहृत केले. या कादंबरीवर इजिप्तमध्ये काही काळासाठी धर्मविवादास्पद चित्रणामुळे बंदी घालण्यात आली होती. या कादंबरीत मुहम्मद, मोशे आणि अन्य धार्मिक व्यक्तिमत्वांचा उल्लेख आहे. इतर साहित्यात देखील महफूझने समाजवाद, समलैंगिकता आणि इजिप्तमधील राजकारणासारख्या वादग्रस्त विषयांवर आपले मत मांडले. अशा काही विवादास्पद लिखाणामुळे त्याच्यावर जीवघेणे हल्लेही झाले. महफूजच्या इतर कादंबऱ्यांमध्ये अल-लिस-वा-अल-किलब (१९६१; द थीफ अंड द डॉग्स), अल-शहद (१९६५; द बेगर), आणि गमाल अब्देल नासेरच्या शासनाच्या काळात इजिप्शियन समाजाचे चित्रण असलेली मीरामार (१९६७), कैरो थिएटर कंपनीशी संबंधित अफ्री अल-कब्बा (१८९१; वेडिंग सॉंग) आणि रचनात्मक प्रयोग असलेली अशी हादिथ अल-साबा वा अल-मसा (१९८७) ही कादंबरी यांचा समावेश आहे. अरबी भाषिक जगात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात मान्यता मिळालेल्या त्यांच्या कादंबऱ्यांनी एकत्रितपणे अरबी साहित्यामध्ये शैलीतील परिपक्वता आणली. महफूझ ह्यांची लघुकथा लेखक म्हणून कामगिरी दुन्य अल्लाह (१९६३ ; गॉड्स वर्ल्ड) सारख्या संग्रहात दिसून येते. द टाइम अँड द प्लेस, अँड अदर स्टोरीज (१९९१) व द सेव्हन्थ हेव्हन (२००५) हे इंग्रजी भाषांतरातील त्यांच्या कथांचे संग्रह आहेत. त्या शिवाय अद्दा-अल-सारा अल-धतीय्या (१९९६; एकोस ऑफ अन् ऑटोबायोग्राफी) हा उपदेशात्मक गोष्टी आणि म्हणींचा एक संग्रह आहे.

महफूझचे साहित्य जुनी इजिप्शियन राजेशाही, ब्रिटिश वसाहतवाद आणि समकालीन इजिप्तवरील समालोचनासाठी प्रसिद्ध आहे. महफूझची नोंद अस्तित्त्ववादाच्या विषयांवर चर्चा करणाऱ्या अरबी साहित्यातील पहिल्या समकालीन साहित्यिकांपैकी एक म्हणून घेतली जाते. त्याच्या बऱ्याच उल्लेखनीय कादंबऱ्यांमध्ये महिला आणि राजकीय कैद्यांबद्दलच्या सामाजिक मुद्यांचा समावेश आहे.

१९८८ मध्ये त्याला साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्याला इजिप्त आणि इतर जगातल्या देशांमध्ये विविध पुरस्कार देण्यात आले. इजिप्शियन राज्य पुरस्काराचा तो दोन वेळा मानकरी ठरला. महफूझला १९८९ मध्ये कैरोमधील अमेरिकन विद्यापीठाकडून राष्ट्रपती पदक मिळाले आणि त्यांनी जून १९९५ मध्ये त्याला मानद डॉक्टरेट देखील प्रदान केले. १९९२ मध्ये महफूझची अमेरिकन अ‍ॅकॅडमी अंड इन्स्टिट्युट ऑफ आर्टस् अंड लेटर्सचा मानद सदस्य म्हणून निवड झाली. १९९६ मध्ये अरबी लेखकांच्या सन्मानार्थ साहित्यिकांसाठी नाजीब महफूज पुरस्कार निर्माण करण्यात आला आहे. इजिप्तमध्ये महफूझच्या प्रत्येक नवीन प्रकाशनाला एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मानले जात. महफूजच्या कादंबऱ्यांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली, जे आजही अरबी जगात प्रसारित आहेत. त्याच्या मृत्यूच्या पश्चात आजही जिब्राल्टर ते आखाती देशांमधील कोणत्याही साहित्यिक चर्चेत महफूझ ह्या नावाचा प्रथम उल्लेख केला जातो.

काइरो येथे त्याचे निधन झाले.

बाह्य दुवे