Jump to content

नागोरी गाय

नागौरी गाय
नागौरी बैल

नागोरी किंवा नागौरी (इंग्रजी:Nagori) हा शुद्ध भारतीय गोवंश असून, राजस्थानामधील एक उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. मुख्यतः नागौर जिल्हा, जोधपूर जिल्हा यांच्या परिसरात हा गोवंश आढळतो. या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान राजस्थानातील 'सुहालक प्रदेश' नागौर आहे.[]

शारीरिक रचना

या गोवंशाचा रंग संपूर्ण पांढरा असतो. क्वचितच काळा सापडतो म्हणजे १०० गायींमध्ये चुकून एखादी काळी गाय आढळते. जन्मापासून वासरे संपूर्णपणे पांढऱ्या रंगाची असतात. सर्वसामान्यपणे या गोवंशाच्या गायी मजबूत बांध्याच्या असतात; शरिराची ठेवण आटोपशीर असते. शिंगे मोठी काळी किंवा राखाडी असतात, शिंगे बहुतांशी आडवी चंद्रकोरी प्रमाणे असतात. शिंगाच्या जागची चेहऱ्याची ठेवण दोन्ही कानांना समांतर असते. डोळे काळेभोर शांत असतात. नाकपुडी संपूर्णपणे काळी फक्त तोंडाच्या जवळ किंचीत राखाडी असते. कान मध्यम आकाराचे आतून लालसर छोटेसे असतात. मान शरीराच्या मानाने थोडी आखूड असते; माने खालची पोळी आखीव रेखीव असते. गायींमध्ये कास छोटी व गोलाकार तांब्या सारखी असते. चारही सड गुलाबी रंगाचे व छोट्या आकाराचे असतात. खूर काळे उंच व टणक असतात. शेपूट पायापर्यंत येणारी असते व शेपूट गोंडा काळा व झुपकेदार असतो.[]

पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ३५० ते ४५० कि. ग्रॅ पर्यंत असते तर पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन २८० ते ३५० कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते.

बैलाच्या शरीराची उंची १२०ते १२५ सें. मी आणि लांबी १५० ते १५५ सें. मी. पर्यंत असते. गायीची उंची ११० ते १२० से.मी. आणि लांबी १४० ते १४५ सें.मी. पर्यंत असते.

वैशिष्ट्य

नागौरी गोवंश कष्टांच्या कामासाठी व भारवाहनासाठी वापरला जाणारा गोवंश आहे. शरीरातील चपळता व शक्तीमुळे ओढण्याच्या कामासाठीच तसेच प्रवासासाठी हा गोवंश वापरला जातो. या गोवंशाच्या गायी ह्या अल्प दूधारू असतात परंतु त्यांचे दूध मात्र अत्यंत बहूगुणी मानले जाते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Dairyknowledge - Nagori". Dairyknowledge India. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.