Jump to content

नागभीड तालुका

  ?नागभीड

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलनागभीड
पंचायत समितीनागभीड
घोडाझरी प्रकल्प

नागभीड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

नागभीड ऐतिहासिक आधार असल्याचे पुरावे सापडत नाहीत, पण आजच्या बाजार चौकातील जनता विद्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या दग्र्याजवळ व अन्य तीन ठिकाणी, असे एकूण चार बुरूज होते आणि त्याला धरून एक परकोट असावा. त्याचे अवशेष शिवटेकडीवरील बिनतारी संदेशाच्या टॉवरजवळ असल्याचे व टेकडीच्या पायथ्याशी गोंड राजा आणि राणीची समाधी असल्याचे सांगितले जाते. मृतदेह पुरल्यानंतर डोक्याच्या बाजूला मोठा दगड ठेवला जातो. तशा प्रचंड मोठय़ा शीळा वर्षांनुवर्षांपासून शिवटेकडीच्या परिसरात दिसतात.

नावांची व्युत्पत्ती

‘नागभीड’ या नावाला ‘नाग’ सापांची भीड (गर्दी) किंवा नाग लोकांची वस्ती वा नाग संस्कृतीची पाश्र्वभूमी, असा काही ऐतिहासिक संदर्भ असल्याचे सांगणारी व्यक्ती भेटली नाही वा हयात नाही, पण या भागात घनदाट जंगले होती. त्यात वन्यप्राण्यांप्रमाणेच नाग व सापांचाही सुळसुळाट असावा व त्यावरून या गावाला नागभीड हे नाव पडले असावे, असा तर्क व्यक्त करायला वाव आहे.

लोकजीवन

व्यवसाय

चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड हा प्रामुख्याने उच्चप्रतीच्या भातपिकाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या खेडय़ातील दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी एच.एम.टी. व डी.आर.के. यासारख्या उच्च प्रतीच्या भाताचे अनेक वाण संशोधित करून नागभीड तालुक्याला देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. हा परिसर धान, गहू, भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. दुग्ध व्यवसायातही या तालुक्याचा मोलाचा वाटा असुन,येथे शासकीय दूध शीतकरण केंद्र आहे.


नागभीड तालुक्यातील देवतलाव, पांडव तलाव, नवखळा तलाव, कसर्ला तलाव, घोडाझरी तलाव ओलीत, मासेमारी व सिंगाडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. येथे पूर्वी उत्कृष्ट घोंगडी व हातसडीचे पोहे हे गृहउद्योग होते, पण ते आता नामशेष झाले. तालुक्यात गिट्टी, दगडाच्या खाणी आहेत.

भौगोलिक

नागपूर, गडचिरोली जिल्हा, व जिल्हय़ाचे ठिकाण चंद्रपूर या सर्वांना शंभर किलोमीटरच्या परिघाने जोडणारे व गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्हय़ांच्या ठिकाणी जाण्यासाठी केंद्रस्थान आणि पूर्व विदर्भाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागभीड विकासाच्या प्रतिक्षेत गाव आहे.

नागभीडला ब्रिटिश काळापासून पोलीस ठाणे, वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सुतिकागृह, सरकारी सिनिअर बेसिक शाळा, आता उच्च श्रेणी जि.प. प्राथमिक शाळा, 6 हायस्कूल, ३ कनिष्ठ महाविद्यालये, 3 वरिष्ठ महाविद्यालये, 3 कॉन्व्हेंट, एक जि.प.प्राथमिक उर्दू शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंगणवाडय़ांनी संपन्न आहे.

सांस्कृतिक व धार्मिक

नागभीड तालुका व नागभीडला समृद्ध सांस्कृतिक धार्मिक वारसा आहे. पुरातन कालीन देवटकचा शिलालेख आता नागपूरच्या पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. तालुक्यातील मोहाळी-मोकासाजवळील कुनघाडा(चक)ची पांडव देणी, सातबहिणींचा डोंगर, लोहगड किल्ला, कान्पाजवळचे आंबाई-निंबाई मंदिर, बाळापूरचे गायमुख व हनुमान मंदिर तळोधीचे साईबाबा मंदिर, नागभीड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चवडेश्वरी मंदिर, टेकडीवरील महादेव मंदिर, प्रसिद्ध राममंदिर, महादेव टेकडीवरील अलीकडचे हनुमान मंदिर, कृडबाचे मारोती मंदिर, डोंगरगावचे कटाळय़ा मारुती मंदिर प्रसिद्ध आहेत.

रजा सुन्नी जामा मस्जिद ही मुस्लिम बांधवांची प्राथना स्थल आहे.तसेच खोजा समाजाचा एक जमातखाना आहे. एक बुद्धविहारही आहे. हिंदू, मुस्लिम व खोजा समाजाच्या वेगवेगळय़ा तीन स्मशान व दफनभूमी आहेत. येथील जनमानसात सर्वधर्म समभावाची भावना खोलवर रुजलेली आहे.

पर्यटनस्थळे

घोडाझरी प्रकल्प : हे निसर्गरम्य स्थळ क वर्ग पर्यटन स्थळाच्या यादीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ. किमी राहणार आहे.

रेल्वे जंक्शन

नागभीड दक्षिण-पूर्व रेल्वेचे ब्रिटिशकालीन नॅरोगेज रेल्वे जंक्शन म्हणून अतिशय व्यस्त रेल्वे स्थानक होते. येथे रेल्वे इंजिन दुरुस्तीचे लोकोशेड व बरेच कर्मचारी होते. इंजिनला लागणारे इंधन नागभीडच्याच रेल्वे स्थानकावरून भरून दिले जात असे. आज गोंदिया-नागभीड-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतरित झाला आहे व कोळशाऐवजी डिझेलचे इंजिन आल्यामुळे नागभीडचे लोकोशेड नामशेष झाले आहे. आता हे विशाल रेल्वे जंक्शन बिलासपूर मुख्यालयाला जोडण्यात आले असून दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेस जोडले गेले आहे. मात्र, जनप्रतिनिधींच्या आपसातील हेव्यादाव्यांमुळे नागभीड-नागपूर हा अधिक उत्पन्न देणारा नॅरोगेज रेल्वे मार्ग पुरेशा आणि एकसंघ पाठपुराव्याअभावी उपेक्षित आहे. या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये त्वरित रूपांतर होणे ही काळाची गरज आहे.

साहित्य

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका साहित्यविषयक बाबीमुळे अतिशय समृद्ध झालेला आहे. या तालुक्यात सर्वप्रथम १९४० च्या दशकात वामन विगम हे बालकवी होऊन गेले. त्यांच्या अनेक रचना महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ,'येरे येरे पावसा तुला देतो पैसा' ही गाजलेली बालकविता त्यांची मात्र त्यांची पुस्तके प्रसिद्ध असल्याचा कुठेही पुरावा आढळत नाही. यानंतर तु.ना. काटकर हे साहित्यिक नागभिड येथेच जन्म होऊन पुढे चंद्रपूर येथे स्थायिक झाले त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. यानंतर खरेतर प्राध्यापक डॉक्टर राजन जयस्वाल यांनी साहित्याचा मेरू उंचावर नेला आणि नागभीडचे नाव साहित्य दृष्टीने जगप्रसिद्ध प्रसिद्ध केले. ते विदर्भातील पहिले चारोळी कार म्हणून गणले जातात त्यांची तेरा कवितासंग्रह व इतर संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच तळोधी बाळापुर येथील वा.तु. गेडाम हे बहुजन वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. खरेतर आज नागभिड साहित्य प्रांतात अनेक नवोदित कवी व लेखक लिहिते झालेले आहेत.

मात्र मा. संजय वि. येरणे हे 21 व्या शतकातील नागभीडचा साहित्य वारसा चालवणारे समृद्ध वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची आजतागायत 21 पुस्तके प्रकाशित आहेत. कादंबरी, कथा, समीक्षा, स्फुटलेखन, वैचारिक लेखन, शैक्षणिक लेखन आधी सर्व क्षेत्रात त्यांची ग्रंथसंपदा देशभर गाजत आहे. त्यांची नोंद "महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये झाली आहे. संताजी जगनाडे महाराज एक योद्धा व संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना ह्या दोन कादंबऱ्या जगातील संताजी विषयावरील सर्वप्रथम कादंबरी म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. त्यांचा डफर कथासंग्रह खूप गाजलेला असून त्यांना साहित्याचे अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. विद्यार्थ्याकरिता इंग्रजी रेडींग पॅटर्न ह्याचे संशोधन त्यांनी केलेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके
चंद्रपूर तालुका | वरोरा तालुका | भद्रावती तालुका | चिमूर तालुका | नागभीड तालुका | ब्रह्मपुरी तालुका | सिंदेवाही तालुका | मूल तालुका | गोंडपिपरी तालुका | पोंभुर्णा तालुका | सावली तालुका | राजुरा तालुका | कोरपना तालुका | जिवती तालुका | बल्लारपूर तालुका