नागझिरा वन्यजीव अभयारण्य
संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फार पूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच 'नागझिरा' असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे.
यात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे. इतर अभयारण्यांच्या मानाने छोट्या अशा अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी व पक्षांची नोंद निसर्गप्रेमींनी घेतली आहे.[१]
या सोबतच नजीक असलेली स्थळे कोसमतोंडी, चोरखमारा,अंधारबन, नागदेव पहाडी इत्यादी प्रेक्षणीय आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतारावरील साकोली शहरापासून अंदाजे २२ कि. मी. अंतरावर एकीकडे नागझिरा अभयारण्य असून दुसरीकडे सुमारे ३० कि. मी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.
नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी 'पिटेझरी' व 'चोरखमारा' अशी २ गेटे आहेत. अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरिणे गवतामध्ये शांतपणे चरताना दिसतात.. पावलागणित दिसणारी हरिणे आणि त्यांच्या आजूबाजूला हुंदडणारी माकडे हे दृश्य मन मोहून टाकते. येथे ऐन, साग, बांबू, आवळा, बिब्बा, धावडा, तिवस, सप्तपर्णी यांसारखे असंख्य वृक्ष आहेत. अभयारण्यात गवताळ कुरणे मुबलक प्रमाणात असल्याने नीलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यांसारखे शेकडो तृणभक्षी आढळतात. येथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तसेच तुरेवाला सर्पगरुड, मत्स्यगरुड, व्हाईट आईड बझार्ड सारखे शिकारी पक्षी अणि अनेक प्रकारची फुलपाखरे तसेच ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे कोळी दिसून येतात. येथे हिंस्रक पशूंची संख्यादेखील काही कमी नाही. पट्टेरी वाघाचा नैसर्गिक अधिवास येथे उत्तम आहे. तेथील मार्गदर्शकांच्या सांगण्यानुसार तेथे सुमारे ८-१० वाघ, २०-२२ बिबट्या, जवळपास ५० अस्वले आणि रानकुत्रे मुक्तसंचार करीत असतात.
येथील नागझिरा तलाव अतिशय प्रसिद्ध तितकाच जंगलासाठी महत्त्वाचा आहे. या जंगलात पूर्वी हत्तींचे वास्तव्य असे. संस्कृतमधील नाग या शब्दाचा अर्थ हत्ती आणि तेथील लोक पाण्याच्या झऱ्याला झिरा असे म्हणत. हत्तींचे आवडते ठिकाण म्हणजे पाणी.. म्हणून या तलावास (नाग~हत्ती आणि झिरा~झरा) 'नागझिरा तलाव' असे नाव पडले. व्यंकटेश माडगूळकर यांनी ज्या झाडाखाली बसून त्या काळी लिखाण केले तो कुसुम वृक्ष आजही आपणास तेथे पहावयास मिळतो. या अभयारण्यातील रस्ते पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपाचे आहेत. येथे वाहन चालवण्याचे नियम अतिशय कडक आहेत. हॉर्न वाजवणे, रस्ता अडेल असे दुहेरी पार्किंग करणे तेथे चालत नाही. अभयारण्याच्या गेट बंद होण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. लंगूर (माकडे) व हरणांचे अलार्म कॉल्स ओळखून वाघाचा माग काढण्यात येथील मार्गदर्शक अतिशय तरबेज आहेत. हे लोक याच परिसरातील गोंड आदिवासी आहेत. पूर्वी हेच लोक विविध शस्त्रांचा वापर करून प्राण्यांची शिकार करत. तेव्हा हे वन्यजीवच आपल्या उपजीविकेचे साधन आहे, असे त्यांना वाटे. परंतु आज हेच वनवासी 'वाल्याचे वाल्मिकी' झाले आहेत. या लोकांमध्ये प्रचंड एकीचे बळ दिसून येते.
येथील मार्गदर्शक व वाहन चालक अतिशय चलाख आहेत.. त्यांची तीव्र निरीक्षण शक्ती, पावलांच्या ठशांवरून घेण्यात येणाऱ्या नोंदी, समयसूचकता ह्या त्यांच्या गुणांमुळे अभयारण्यास भेट देणाऱ्या लोकांना सहजतेने समृद्ध वनसृष्टीचे दर्शन घडते.अशा या जैवविविधतेने नटलेल्या नागझिरा जंगलाला दि. ३ जून १९७० रोजी 'नागझिरा वन्यजीव अभयारण्य' म्हणून घोषित केले गेले. उष्ण पानगळीचे हे अभयारण्य सध्या १५३ चौ.किमी. क्षेत्रावर वसलेले आहे. येत्या काही वर्षांतच जंगलाचा ६०० चौ.किमी. पर्यंत विस्तार करण्याचा तेथील वनविभागाचा मानस आहे.
नवीन नागझिरा अभयारण्य
या नवीन नागझिऱ्याच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील साकोली,लाखनी यातील काही भाग तसेच, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा काही भाग याचा समावेश आहे.या परिक्षेत्राला लागूनच नागझिरा अभयारण्य,नवेगाव राष्ट्रीय उद्यान,नवेगाव अभयारण्य आणि कोका अभयारण्य याचे क्षेत्र आहे.या क्षेत्रात १२ तलाव आहेत.ते वन्यजीवांना पोषक आहेत.येथील चांदीटिब्बा या परिसरात वन्य जीवांना पाहण्यासाठी 'मचाण' उभारण्यात आले आहे.[२]