नाइट वॉचमन (क्रिकेट)
नाइट वॉचमन हे कसोटी क्रिकेटमध्ये डावाच्या विशिष्ट वेळी फलंदाजी करण्यास उतरणाऱ्या खेळाडून दिले जाणारे नामाभिधान आहे. असा खेळाडू सहसा ६-७ बळी गेल्यानंतर फलंदाजी करणारा असतो पण दिवसाचा खेळ संपत आलेला असताना पहिल्या १-५ फलंदाजांचा बळी गेला तर हा फलंदाजीस येउन दिवस काढण्याचा प्रयत्न करतो. रात्रभर नाबाद राहून दुसऱ्या दिवशी परत फलंदाजी करण्याच्या या प्रयत्नामुळे अशा खेळाडूला नाइट वॉचमन (रात्रीचा राखणदार) म्हणतात. दिवसभराच्या खेळानंतर (खेळून किंवा आपली फलंदाजी यायची वाट पाहून) दमलेल्या चांगल्या प्रतीच्या फलंदाजांना होऊ घातलेल्या अंधारापासून किंवा लक्ष विचलित होउन आपली विकेट थोडक्यात घालवावी लागू नये म्हणून हा डावपेच वापरला जातो.