Jump to content

नलिनीबाला देवी

नलिनीबाला देवी या असमिया कवयित्री होत्या. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बारपेटा या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला. स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होते. नलिनीबाला देवींनी आपल्या वडिलांचे एक चरित्र लिहिले आहे. नलिनीबाला देवीं यांचे  शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. संधियार सूर (१९२८, म. शी. संध्यासंगीत)   हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता .त्यानंतर सपोनार सूर (१९४७, म. शी. स्वप्नसंगीत), स्मृतितीर्थ (१९४८), पारसमणि (१९५७), अलकनंदा (१९५७) असे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.

नलिनीबाला देवींना लहानपणीच वैधव्य आले, त्याची छाया त्यांच्या जीवनावर कायमची पडली.गीता, उपनिषदे, आसाममधील वैष्णव संतांचे साहित्य ह्यांच्या वाचनातून मानसिक समाधान मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातील व्यथा-वेदनांचा खोल ठसा नलिनीबाला देवीं यांच्या  कवितेवर उमटलेला आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवून आणण्याची तीव्र इच्छा, गूढगुंजनाची ओढ आणि निसर्गातील यच्चयावत वस्तूंमधील चिरंतन सौंदर्याची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि साहित्य ह्यांकडेही त्या ओढल्या गेल्या. ह्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो.काही उत्कट देशभक्तिपर कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी ‘भारती', ‘रवींद्र तर्पण’, ‘जन्मभूमी’ ह्या अशा काही कविता आहेत .स्वर्गापेक्षाही महान असलेल्या मातृभूमीची सेवा आपणास मृत्युनंतरही करता यावी, अशी इच्छा त्यांनी ‘जन्मभूमी’ ह्या कवितेत व्यक्त केली आहे. अलकनंदा ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास १९६८ रोजी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला.नलिनीबाला देवीं या आसाम मध्ये १९५४ रोजी झालेल्या साहित्य सभेच्या तेविसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या.भारत सरकारने १९५७ साली ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.२४ डिसेंबर १९७७ रोजी गौहाती येथे त्यांचे दुःखद निधन झाले.