Jump to content

नरहर व्यंकटेश पडसलगीकर

नरहर व्यंकटेश ऊर्फ भाऊसाहेब पडसलगीकर ( ४ जुलै १९१९ - ७ सप्टेंबर २००९) हे बुद्धिबळाचे ख्यातनाम मार्गदर्शक होते.[]

भाऊसाहेबांना वयाच्या सहाव्या वर्षीच बुद्धिबळाची गोडी लागली. गल्लीतील मुले एकत्र यायची आणि त्यांचा बुद्धिबळाचा डाव रंगायचा. तमण्णाचार्य पडसलगीकर, बाळशास्त्री फाटक, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विनायकराव खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबांनी बुद्धिबळाचे प्राथमिक धडे गिरविले. शालेय स्पर्धांतून त्यानी तब्बल ५० पारितोषिके पटकाविली. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ साली अशाच पद्धतीने सराव व स्पर्धा करणाऱ्या तरुण खेळाडूंनी नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना केली. भाऊसाहेबांसह नारायण कुलकर्णी, गोपाळराव केळकर, विष्णू पोंक्षे, शेषाचार्य सांगलीकर, दाजीसाहेब दीक्षित, डॉ. शंकरराव आठवले, एच. बी. करमरकर, शिवराम नातू, गजानन पेंडुरकर, सोपानराव शिंगारे, भाऊ राजवाडे या संस्थापक सदस्यांनी मंडळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कालांतराने भाऊसाहेबांच्या खांद्यावर सारी जबाबदारी आली, आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली. मंडळाचा विस्तार केला. ’बुद्धिबळ टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी गळ्यात झोळी बांधून भीक मागायला मला लाज वाटत नाही' असे ते नेहमी सांगायचे. अशा पद्धतीने त्यांनी मंडळाला आवश्‍यक ते सर्व साहित्य मदत स्वरूपात मिळविले. आज हे मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. ’माझ्या पश्‍चात्‌ हे मंडळ व्यवस्थित चालू शकेल अशी व्यवस्था मी केली आहे', हे भाऊसाहेब विश्‍वासाने सांगत. अखेरच्या क्षणापर्यंत ते बुद्धिबळासाठी जगले. २००९ सालची ए. डी. चराटे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची स्पर्धा ठरली.

भाऊसाहेबांना सांगलीच्या बुद्धिबळाचा भीष्माचार्य असे म्हणले जायचे. तेयांनी आठ राष्ट्रीय स्पर्धांत खेळले. येल्लूर, पुणे, दिल्ली, मुंबई, मद्रास, पुणे, बेंगलोर, भुवनेश्‍वर येथील स्पर्धा त्यांनी गाजविल्या.

७ सप्टेबर, २००९ या दिवशी नरहर व्यंकटेश ऊर्फ भाऊसाहेब पडसलगीकर यांचे वयाच्या नव्वदीत निधन झाले.

भाऊसाहेब पडसलगीकरांना मिळालेले पुरस्कार

  • दादोजी कोंडदेव पुरस्कार
  • शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
  • शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार


संदर्भ