नरसिंह चिंतामण केळकर
नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर (२४ ऑगस्ट, १८७२; मोडनिंब - १४ ऑक्टोबर, १९४७; पुणे) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हणले जाते.[१]
न.चिं. केळकर | |
---|---|
जन्म नाव | नरसिंह चिंतामण केळकर |
जन्म | २४ ऑगस्ट, इ.स. १८७२ मोडनिंब, सोलापूर |
मृत्यू | १४ ऑक्टोबर, इ.स. १९४७ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
कार्यक्षेत्र | इतिहास, नाटक, पत्रकारिता, राजकारण |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी, नाटक, चरित्र |
विषय | ऐतिहासिक, राजकीय |
चळवळ | असहकार चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती | लोकमान्य टिळक यांचे चरित्र मराठे आणि इंग्रज तोतयाचे बंड |
प्रभाव | लोकमान्य टिळक |
अपत्ये | काशिनाथ, कमलाबाई, यशवंत |
शिक्षण
तात्यासाहेबांचे घराणे रत्नागिरीजवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार, मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले.6 डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.[ संदर्भ हवा ]
राजकीय कारकीर्द
मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळक यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७ सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.[ संदर्भ हवा ]
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य पुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले.[ संदर्भ हवा ] केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.[ संदर्भ हवा ] बंगालच्या फाणीच्या धर्तीवर न.चिं.केळकर यांनी "मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोखासंख्या एका छत्राखाली असावी" असे मत व्यक्त केले.
सन्मान
- केळकर इ.स. १९२१मध्ये बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]
- ते इ.स. १९०६मध्ये नाशिक येथे भरलेल्या २ऱ्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]
न.चिं. केळकरांनी लिहिलेली पुस्तके[ संदर्भ हवा ]
- अमात्य माधव (नाटक)
- आयर्लंदचा इतिहास
- कृष्णार्जुनयुद्ध (नाटक)
- कोकणचा पोर (कादंबरी)
- ग्यारीबाल्डीचे चरित्र
- चंद्रगुप्त (नाटक)
- तोतयाचे बंड (नाटक)
- नवरदेवाची जोडगोळी (नाटक?)
- बलिदान (कादंबरी)
- भारतीय तत्त्वज्ञान (वैचारिक)
- मराठे आणि इंग्रज (ऐतिहासिक)
- लोकमान्यांचे चरित्र (२ खंड) -चरित्रलेखन
- वीर विडंबन (नाटक)
- संत भानुदास (नाटक)
- समग्र केळकर वाङ्मय- खंड १ ते १२ (१९३८)
- सरोजिनी (नाटक)
- सुभाषित आणि विनोद
- हास्य विनोद मीमांसा (ललित)
- ज्ञानेश्वरी सर्वस्व
न.चिं. केळकरांसंबंधी पुस्तके[ संदर्भ हवा ]
- केळकर-चरित्र आणि वाङ्मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा, १९४९) (लेखक - मा.का. देशपांडे
- साहित्यसम्राट न. चिं. केळकर (लेखक - अरविंद ताटके)
- साहित्यसम्राट न.चि.केळकर-एक अभ्यास (लेखक - पंडित आवळीकर)
न.चिं. केळकर पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- केसरी-मराठी संस्थेतर्फे दरवर्षी केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक मिळालेले लेखक आणि त्यांची पुस्तके : बाळ ज. पंडित (पुस्तक - लोकमान्यांचे मानसपुत्र : श्रीमंत जगन्नाथमहाराज पंडित),
- पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दरवर्षी न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक पुरस्कार देते. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळालेले लेखक - उत्तम कांबळे, मीना देशपांडे, वसंत आबाजी डहाके, प्र.के.घाणेकर, श्याम जोशी (२०१५)
- महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला न.चिं. केळकर यांच्या नावाचा एक लाख रुपयाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : बाबा भांड (२०१३), प्रा. निलकंठ पोलकर (२०१६),
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर. "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वतः २४ ऑगस्ट". ३१ ऑगस्ट २०१३ रोजी पाहिले.