Jump to content

ध्वनिसिद्धांत

ध्वनिसिद्धांत हा आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११ व्या शतकात त्याच्या ध्वन्यालोक या ग्रंथात हा सिद्धांत त्याने मांडला आहे. ध्वनिआत्मा काव्यस्य या अर्थातध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नाट्याचे अंतिम फलित रसनिष्पती होय असा भरतमुनीचा रससिद्धांत आनंदवर्धनाला मान्यच होता. मात्र काव्यात शब्दांच्या वाच्यार्थाला मुळीच महत्त्व नसल्याने त्या वेळी लक्षात आले होते. त्यामुळे

शब्दांची अमुखवृत्ती ( वाच्यार्थ नसलेली) हीच सर्व कविव्यापाराच्या मुळाशी आहे, (म्हणजे व्यंग्यार्थ) असे उद्भटांचे मत होते. ह्या व्यंग्यार्थ वृत्तीच्या विवेचनातूनच आनंदवर्धनाचा ध्वनिसिद्धांत निर्माण झाला आहे. अशाप्रकारे वाच्यार्थ आणि अलंकाराच्या पलीकडे जाऊन आनंदवर्धनाने आपला ध्वनिसिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून त्याने अलंकार, रीती, रस, औचित्य या काव्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संज्ञा नाकारल्या आहेत. वाच्यार्थाच्या पलीकडील व्यंग्यार्थ हाच ध्वनि असून आनंदवर्धानाने ध्वनि हाच श्रेष्ठ काव्याचा निकष मानला आहे. त्यामुळे तो श्रेष्ठ काव्याला ध्वनिकाव्य असे म्हणतो. त्याची ध्वनि ही काव्यातील अर्थाचा अर्थ अशा व्यंग्यार्थ संकल्पनेशी संबंधित आहे.

आनंदवर्धनाचे ध्वनिसूत्र

ध्वनिआत्मा काव्यस्य , म्हणजे ध्वनि हा काव्याचा आत्मा आहे हे आनंदवर्धनाने सांगितलेले सूत्र आहे. याचे स्पष्टीकरण करताना आनंदवर्धनाने पुढील उदाहरण दिले आहे. ज्या प्रमाणे स्त्रीच्या ठिकाणी तिच्या शरीराहून वेगळे असे लावण्य दिसून येते. त्या प्रमाणेच महाकवींच्या काव्यात वाच्यार्थाहून वेगळा असा अर्थ प्रतीयमान किंवा व्यंग्यार्थ म्हणून आनंदवर्धन मानतो. 

आनंदवर्धंनाच्या मते, वाचकाला रसानुभव येण्यासाठी कवि आपल्या प्रतिभा सामर्थ्याने शब्दार्थाची अशी काही योजना करतो की, त्यातून रसिकाच्या मनाला रसप्रतीति तत्काळ येते. त्यामुळे वाच्यार्थापलीकडे शब्दांना आणखी काही अर्थ असतात, तो अर्थ शब्दशक्तीमुळे प्रकट होतो. त्या तीन शब्दशक्ती आहेत. 

शब्द शक्ती

आनंदवर्धानाच्या मते, शब्दशक्ती, म्हणजे भाषेच्या शक्ती तीन प्रकारच्या आहेत.

  1. अभिधा
  2. लक्षणा
  3. व्यंजना

या तीन शक्तींनी भाषेत अनुक्रमे तीन प्रकारचे अर्थ प्रकट होतात.

  1. वाच्यार्थ, मुख्यार्थ किंवा संकेतार्थ
  2. लक्षार्थ
  3. व्यंग्यार्थ

आनंदवर्धंनाच्या मते, वाचकाला रसानुभव येण्यासाठी कवी आपल्या प्रतिभासामर्थ्याने शब्दार्थाची अशी काही योजना करतो की, त्यातून रसिकाच्या मनाला रसप्रतीति तत्काळ येते. त्यामुळे वाच्यार्थापलीकडे शब्दांना आणखी काही अर्थ असतात, तो अर्थ शब्दशक्तीमुळे प्रकट होतो. त्या या तीन शब्दशक्ती होत.

वाच्यार्थ, मुख्यार्थ किंवा संकेतार्थ

वाच्यार्थ : वाच्यार्थ म्हणजे संकेताने शब्दांना मिळालेला अर्थ तो संकेतार्थ म्हणजे वाच्यार्थ होय.

उदा : जर एखाद्या गाढवाला उद्देशून आपण तो गाढव आहे. असे म्हणले तर तो वाच्यार्थ झाला. म्हणजे 'गाढव' याचा अर्थ चार पायाचा प्राणी हा अर्थ आहे.

लक्ष्यार्थ

लक्ष्यार्थ :लक्ष्यार्थ हा शास्त्र, तत्त्वज्ञान या क्षेत्रात असतो. पण अनेक वेळा शब्दाच्या मुख्यार्थाचा त्याग करून त्याला लक्षनेने वापर केला जातो.

उदा :जर एखाद्या माणसाला उद्देशून आपण हेच वाक्य म्हणले तर त्याचा अर्थ बदलला. म्हणजे इथे लगेच 'गाढव' या शब्दाचा अर्थ ‘मूर्ख माणूस’ असा होतो. हा दूसरा अर्थ म्हणजेच लक्ष्यार्थ होय. इथे अर्थ चार पायाचा प्राणी हा अर्थ हा बाद होऊन लक्षणेने सूचित झालेला अर्थ घेतला जातो.

व्यंग्यार्थ

व्यंग्यार्थ : कविव्यापार व्यंजना शक्तीवर उभा असतो. या शक्तीमुळे शब्दांच्या वाच्यार्थाहून वेगळाच असा जो अर्थ रमणीय अर्थ सूचित होतो. तो व्यंग्यार्थ होय.

उदा : एखाद्या मुलीबद्दलची सौंदर्याची भावना प्रकट करणे, एवढाच त्याचा अर्थ घ्यावा लागतो म्हणजे व्यंग्यार्थ होय. इथे पहिले दोन्ही बाद होऊन तिसराच सूचित झालेला, अर्थाचा अर्थ म्हणजे व्यंग्यार्थ किंवा ध्वनि किंवा प्रतीयमान अर्थ होय.

ध्वनिकाव्य

कविव्यापारातून रसप्रतीती येते ती या व्यंग्यार्थामुळेच. या विशिष्ट अर्थाने आनंदवर्धंनाने ‘ध्वनि हाच काव्याचा आत्मा’ आहे हा सिद्धांत मांडला. या नंतर आनंदवर्धनाने ध्वनिची व्याख्या सांगितलेली आहे. त्याने अशा व्यंग्यार्थप्रधान काव्याला ध्वनि किंवा ध्वनिकाव्य म्हणले आहे. या ध्वनि काव्याची व्याख्या आनंदवर्धनाने अशी केली आहे.

व्याख्या : ज्या काव्यात अर्थ किंवा शब्द दोघे ही आपले स्वरूप म्हणजे आत्मा आणि आपला अर्थ यांना गौण करून व्यंग्यार्थाला म्हणजे तिसऱ्याच सूचित अर्थाला वनिचा अर्थ : शब्दांच्या व्यंजना व्यापाराने रसकाठासी एक विशिष्ट प्रकारची मनोवस्था निर्माण होते. ही अवस्था म्हणजे रसप्रतीती होय. आनंदवर्धनाच्या मते, रस हे प्रत्यक्ष तत्त्व नसून शब्दार्थी घडकांद्वारे ध्वनित होणारे तत्त्व आहे, यालाच तो रसध्वनी म्हणतो.

उदा : सूर्य अस्ताला गेला, म्हणजे सूर्य पश्चिम क्षितिजावर बुडाला हा त्याचा वाच्यार्थ होय. याच वाक्यतून भिन्न भिन्न अर्थ ध्वनित होतो. उदा : १. चोराला चोरी करण्याची वेळ झाली अशी सूचना मिळते. तर ब्राम्हणाला संध्या करण्याच्या वेळेची सूचना मिळते आणि प्रेमिकांना प्रिय व्यकीच्या भेटीची वेळ झाल्याचे सूचित होईल. असे सांगून हा ध्वन्यार्थ जास्त मोलाचा असतो. असे आनंदवर्धन म्हणतो. हा ध्वनि काव्यातच असतो. मात्र तो सर्वच कवीला व्यक्त करता येत नाही. त्यासाठी कवीजवळ असामान्य स्वरूपाची प्रतिभाशक्ती असणे आवश्यक आहे. अशा कवींना आनंदवर्धनाने महाकवी म्हणले आहे. ध्वनि काव्यातच असला मात्र तो सर्वच रसिकाला जाणवत नाही. त्यासाठी रसिकाजवळही असामान्य स्वरूपाची प्रतिभाशक्ती असणे आवश्यक आहे. त्याला 'विमलप्रज्ञा' असे म्हणतात.

 महाकवी

आनंदवर्धंनाच्या मते, महाकवींच्या काव्यात हा प्रतीयमान अर्थ म्हणजे ध्वनि असतो, आणि तो रसिकांना जाणवतोही. त्यामुळे तो अर्थ अनुभव सिद्ध आहे. त्याचे अस्तित्व कोणालाही नाकारता येत नाही. महाकवींच्या वाणीतून हा अर्थ जेव्हा प्रकट होतो. त्याचवेळी रसिकाला या ध्वनीचा आणि त्यातून प्रकट होणाऱ्या कवींच्या असामान्य प्रतिभेचा त्याचवेळी  प्रत्यय येतो, त्यामुळे रसिकाला महाकवी आणि सामान्य गदळ कवी यातील फरक जाणवतो.  

            आनंदवर्धंनाच्या मते,या ध्वनीचा प्रत्यय येण्यासाठी रसिकाजवळ विशिष्ट प्रकारची योग्यता लागते. केवळ शब्दार्थ ज्ञानाने तो कळत नाही. त्यासाठी वाचक. काव्यार्थ तत्त्वज्ञ हवा. कवीला महाकवित्व मिळते ते या ध्वनीच्या उचित वापरामुळेच.

            महाकवींच्या काव्यात अशा प्रकारे व्यंग्यार्थ म्हणजे ध्वनि आणि व्यंजना व्यापाराला प्राधान्य मिळत असते. यासाठी कवीजवळ विशेष प्रतिभा असावी लागते. त्यांच्या जवळ ही प्रतिभा असते, त्यांना ‘महाकवी’ म्हणतात. तर त्यांच्या जवळ अशी विशेष प्रतिभा नसते त्यांना गदळ कवी आनंदवर्धंनाने म्हणले आहे. यांचे काव्य वाच्यार्थ प्रधान असते.

            ध्वनीचा अनुभव केवळ शब्दज्ञांनानी येत नाही. तर रसिकाजवळ एक पात्रता असावी असे आनंदवर्धंन म्हणतो.

ध्वनीचे प्रकार :

आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोक या ग्रंथावर अभिनव गुप्ताने लोचन नावाची जी टीका केली आहे, त्यातून ध्वनीचे प्रकार स्पष्ट होतात.

१.      लौकिक ध्वनि : व्यंग्यर्थाचे अभिधान वाच्यार्थाच्या स्वरूपात करणे अशा व्यंग्यार्थाला लौकिक ध्वनि असे म्हणले जाते.

उदा : ‘कोसळणारा पाऊस पाहून,

      महा नेहमी एक प्रश्न पडतो

      माझे तर ठीक आहे. हा कोणासाठी रडतो.

२.      अलौकिक ध्वनि : कवितेतील व्यंग्यार्थ स्वशब्दांनी सांगता येऊ शकत नाही. तो केवळ आस्वादाच्या प्रतीतीचा विषय आहे, अशा व्यंग्यार्थाला अलौकिक ध्वनि असे म्हणतात.

उदा : ह्या गंगेमधी गगन

वितळले शुभाशुभाचा फिटे किनारा

  अध्या वाटेवरती उतरला

बुद्ध गयेचा पिवळा वारा.

येथे मर्ढेकरांनी गंगेची दर्शनाने प्राप्त झालेली आध्यात्मिक साक्षातकाराची अनुभूति व्यक्त केली आहे. गंगा, बुद्धगया, पिवळा वारा, गगन उतरले या शब्दांचे वाच्यार्थ घेऊन हा अर्थच स्पष्ट होत नाही. तर त्याची रसिकाला अनुभूतीच घ्यावी लागते. हे अलौकिक ध्वनीचे उदाहरण आहे.लौकिक ध्वनि शब्दात सांगता येतो, अलौकिक ध्वनि स्वप्नातही शब्दबद्ध करता येत नाही. या ध्वनीचे आणखी काही प्रकार सांगितले जातात. उदा : लौकिक आणि अलौकिक.

रसादिध्वनि

लौकिक ध्वनीचे वस्तुध्वनी आणि अलंकार ध्वनि असे दोन प्रकार सांगितले जातात. या दोन्ही प्रकारपेक्षा रसादिध्वनि अभिनवगुप्ताने महत्त्वाचा मानला आहे. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे :

रसादिध्वनी : रसादिध्वनीलाच आनंदवर्धन प्रतियमान किंवा व्यंग्यार्थ ध्वनि मानतो. हा ध्वनि वाच्यार्थाच्या अवस्थेत येऊ शकत नाही. तो लोकिक व्यवहाराच्या सुख:दुखाचा विषय होत नाही. उलट काव्यातील शब्दांनी रसिकाच्या ठिकाणी हद्यसंवाद निर्माण होतो. रसिकाला विभानुभवांचे सौंदर्य प्रतीत होते.

            शिवाय या अनुभवासोबतच रसिकांच्या मनात पूर्वीपासून असलेल्या विभानुभवांच्या हळुवार अशा उद्बोधांचे सौंदर्य प्रत्ययास येते आणि योग्य चर्वणा होऊन त्याचा आनंदमय आस्वाद रसिक होतो. या चर्वणा व्यापारामुळेच रस कवितेतील अर्थ, रसध्वनि प्रकट होतो. तो वाच्यार्थ प्रधान नसतो. म्हणून इतर कोणत्याही व्यवहाराचा तो विषय होत नाही. म्हणून रसादिध्वनीच हा काव्याचा आत्मा होय. या ध्वनीचा अनुभव करता येतो. यावरून आणखी दोन प्रकार सांगितलेलं आहेत.

१.     आस्वाद विभाव अनुभव आणि रस असा क्रमाने आला तर त्याला असंलक्ष्यक्रमध्वनि असे म्हणतात.

२.     आस्वाद अशा क्रमाने न येता एकदम प्रत्ययास आला तर त्याला संलक्ष्यक्रमध्वनि असे म्हणतात.

असा प्रकारे आनंदवर्धनाचा ध्वनिसिद्धांत सांगता येतो. 

संदर्भ

भारतीय साहित्यशास्त्र, ग. त्र्यं. देशपांडे, पॉप्युलर प्रकाशन,मुंबई

रा. श्री. जोग, अभिनव काव्यप्रकाश , व्हीनस प्रकाशन, पुणे

डॉ. देवानंद सोनटक्के, क. भा. पा. महाविद्यालय, पंढरपूर यांचे वर्गातील व्याख्यान १२ ऑगस्ट, २०१४