ध्वजदिन
ध्वजदिन हा भारतात दरवर्षी ७ डिसेंबर यादिवशी साजरा केला जातो.
पार्श्वभूमी
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ११ नोव्हेंबर हा दिवस स्मरण दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात असे. त्या दिवसाला पॉपी डे असे सुद्धा म्हणत. स्मरण दिनास निधी देणारास कागदी शोभेची फुलझाडे देण्यात येत असत. त्या काळातील माजी ब्रिटिश सैनिकांबरोबरच भारतीय सैनिकसुद्धा हा निधी वापरू शकत होते. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाला ही प्रथा अयोग्य वाटल्याने त्यांनी अशा निधीचे संकलन एका विशिष्ट दिवशी करण्यात यावे व त्याचा विनियोग माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी व्हावा असा निर्णय जुलै, इ.स. १९४८ मध्ये घेतला. २८ ऑगस्ट, इ.स. १९४९ या दिवशी संरक्षण मंत्रालयाच्या समितीने ७ डिसेंबर या दिवशी ध्वजदिन साजरा केला जाईल असे ठरविले.
ध्वज निधी
७ डिसेंबर यादिवशी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत.