धोडप
धोडप हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक या जिल्हयातील एक किल्ला आहे.
धोडप | |
[[Image:|250px| ]] धोडप किल्ला | |
धोडप | |
गुणक | 20°22′58″N 74°01′43″E / 20.382758°N 74.028496°E |
नाव | धोडप |
उंची | १४५१ मी / ४७५९ फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
जवळचे गाव | धोडांबे |
डोंगररांग | अजंठा-सातमाळा |
सध्याची अवस्था | जीर्ण |
स्थापना | १०४६ |
भौगोलिक स्थान
नाशिक जिल्हयातील व कळवण तालुक्यातील किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरून स्पष्टपणे ओळखू येतो.
इतिहास
राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती.छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्या नंतर खजिना पाहण्या साठी ह्या किल्ल्याला भेट दिली. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.
छायाचित्रे
शिलालेख क्र.३
हा शिलालेख धोडप किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या डावीकडील भिंतीवर आहे. शिलालेख फारशी लिपी व भाषेत असून हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख त्यात आहे, आणि “दुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख त्यात आहे. चौदा किल्ल्यात धोडप ,चांदोर (चांदवड), इंद्राई, राजदेहर, कोळदेहर, कांचना, मांचना , कण्हेरा, जोला (जवळ्या), रोला( रवळ्या), मार्कांड्या, अहिवंत, अचलगड, रामसेज यांचा समावेश आहे.[१]
गडावरील ठिकाणे
हा सुळका उजव्या बाजूला ठेवून आपण मळलेल्या वाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुसऱ्या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे. पन्नास फूट खोली आणि पस्तीस फुटांची लांबी असलेला मधला भाग छन्नीने कोरून काढलेला आहे. त्यामुळे त्या बाजूने कोणी शत्रू येथपर्यंत पोहचू नये अशी ही व्यवस्था आहे. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तश्रृंगी, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरून दिसतात. वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याची टाकी आहेत. सुळक्याला फेरी मारता येते.
सुविधा
धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र सरकारने वनविभागाच्या मदतीने पर्यटन केंद्र विकसित केले आहे. तेथे किल्ल्याविषयी माहीती देणार दालन आहे. शिवाय निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे व विविध धाडसी खेळ खेळण्यासाठी सोय अल्पदरात उपलब्ध आहे. स्थानिक रहिवासी सदर बाब हाताळतात.
जवळचे स्थानक
ओतूर, कळवण, धोडांबे.
राहण्याची सोय
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत.यात सुमारे २० लोकांची राहण्याची सोय होवू शकते.
जेवणाची सोय
हट्टी गावात जेवणाची सोय होवू शकते.
पिण्याचे पाणी
किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी उत्तम कालावधी
जून ते मार्च
गडावर जाण्याच्या वाटा
धोडप किल्ल्याच्या पायथ्याला धोडांबे नावाचे गाव आहे. हे किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असून ते नाशिकला गाडीमार्गाने जोडलेले आहे. नाशिककडून धुळ्याकडे आग्रा महामार्ग क्र. ३ जातो. या राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या अलिकडे वडाळीभोईचा थांबा आहे. या वडाळीभोई मधून धोडांबेकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे. धोडांबे हे नाशिकच्या उत्तरेकडे असलेल्या वणी या गावाशीही गाडीरस्त्याने जोडले गेले आहे. धोडपला येण्यासाठी कळवणहून ओतूर गाव गाठल्यास उत्तरेकडील डोंगरदांडाने धोडपवर चढाई करता येते. डोंगराच्या पठारावर धोडपचा माथा उंचावलेला आहे. उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडून आपण चढाई करून प्रथम या पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीझाडोप्यामध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये अनेक जोती, मंदिरे, पुष्करणी, मुर्ती, कबरी आढळतात.
पायथ्याशी पासूनचे अंतर
हट्टी गावापासून सुमारे तीन तास.
हे सुद्धा पहा
डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
- भारतातील किल्ले
संदर्भ
- ^ दुर्गभ्रमंती नाशिकची- अमित बोरोले(स्नेहल प्रकाशन,पुणे